बेळगाव, खानापूर दुष्काळग्रस्त
अतिरिक्त 43 तालुके दुष्काळग्रस्त घोषित : 21 तालुके तीव्र दुष्काळग्रस्त
बेंगळूर, बेळगाव : राज्य सरकारने सोमवारी बेळगाव, खानापूर, दांडेलीसह आणखी अतिरिक्त 43 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा केली आहेत. यापैकी 21 तालुके तीव्र दुष्काळग्रस्त तर 22 तालुके साधारण दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा करत महसूल खात्याचे आपत्ती व्यवस्थापन सहसचिव टी. सी. कांतराज यांनी सोमवारी आदेश जारी केला आहे. कारवार तालुक्याच्या साधारण दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने 195 तालुक्यांमध्ये दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी प्रसिद्ध केली होती. यापैकी 161 तालुके तीव्र दुष्काळग्रस्त तर 34 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. मात्र, बेळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी बेळगाव आणि खानापूर वगळता इतर 13 तालुक्यांना तीव्र दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले होते. मात्र, यानंतर बेळगाव आणि खानापूर तालुकाही दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी वाढली होती.
बेळगाव व खानापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असतानाही या तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. सदर दोन तालुक्यातील परिस्थितीची पाहणी करण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. यावरुन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृषी व बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्याची सूचना केली होती. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल दिला होता. यावरुन बेळगाव व खानापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला देण्यात आला होता. याची दखल घेऊन या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. नुकताच केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागाचा दौरा केला आहे. केंद्र व राज्यातील अधिकाऱ्यांची बेंगळूर येथे बैठक झाल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारचे महसुल खात्याचे आपत्ती व्यवस्थापन सहसचिव टी. सी. कांतराज यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे.
21 तालुके दुष्काळग्रस्त
बेळगाव, खानापूर, दांडेली, अळणावर, कलघटगी, चामराजनगर, यळंदूर, के. आर. नगर, मुंडरगी, ब्याडगी, हानगल, शिग्गाव, अण्णिगेरी, आलूर, अरसिकेरे, हासन, मुडिगेरे, तरिकेरे, पोन्नंपेठ, हेब्री, सिद्दापूर.
22 तालुके साधारण दुष्काळग्रस्त
कारवार, बेंगळूर उत्तर, चन्नपट्टण, मागडी, मालूर, तुमकूर, गुंडलूपेठ, हनूर, कोळ्ळेगाल, देवदुर्ग, मस्की, बेलूर, होळेनरसिपूर, सकलेशपूर, चन्नरायपट्टण, सोमवारपेठ, कोप्प, नरसिंहराजपूर, श्रृंगेरी, मंगळूर, मुडबिदरी, ब्रम्हावर,
खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याने शेतकऱ्यांना दिलासा
खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आल्याची माहिती उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत खानापूर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीचे सर्वेक्षण करून अहवालही देण्यात येणार असल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. शासनाने खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. यावर्षी एकूणच पाऊस कमी झाल्याने शेतकरी सुरुवातीपासूनच हवालदिल झाला होता. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली भात व इतर पिकांची पेरणी केली होती. त्यानंतर जुलैमध्ये थोडाफार पाऊस झाला होता. त्यानंतर गेल्या अडीच ते पावणेतीन महिन्यात अजिबात पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील सर्वच पिके उन्हाच्या तडाख्याने सुकून गेली होती. राज्य सरकारने राज्यात पाऊस नसल्याने दुष्काळ जाहीर केला होता. मात्र खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला नव्हता याबाबत शेतकऱ्यांनी, शेतकरी संघटनेने आणि विविध राजकीय पक्षांनी खानापूर तालुक्याचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी लावून धरली होती. आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही पाठपुरावा केला होता. मागील आठवड्यात जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायतचे कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी तालुक्यातील प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, असा अहवाल सरकारकडे पाठविला होता. त्याची दखल घेऊन नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कल्लाप्पा कोलकर यांनी दिली. येत्या दोन दिवसांत तालुक्यातील पीकहानीचा सर्व्हे करण्यात येणार असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकऱ्यांना 11 तारखेला सकाळी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या तालुक्यातील 60 ते 70 टक्के पिके वाया गेली