राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद
चिकोडी जिल्ह्याला उपविजेतेपद
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते, जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक व माध्यमिक राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने 16 सुवर्ण, 3 रौप्य व 4 कांस्य, एकूण 23 पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद तर चिकोडी जिल्ह्याने 6 सुवर्ण, 9 रौप्य व 5 कांस्य पदकांसह दुसरे उपविजेतेपद पटकाविले. सिद्धरामेश्वर हायस्कूलच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू सेठ, सिद्धरामेश्वर मठाचे स्वामीजी, गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा शारीरीक शिक्षणाधिकारी ज्युनेदा पटेलसह इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जवळपास 25 जिल्ह्यातून 600 स्पर्धेकांचा सहभाग होता. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील विजेते स्पर्धेकांची राजस्थान व मणिपूर येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जवळपास 20 विविध जिल्ह्यातून पंचांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेत बेळगाव जिल्हा युवजन क्रीडा खात्याच्या ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मूलतानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.