बीसीजी लस देण्यात बेळगाव जिल्ह्याची आघाडी
तब्बल 67,277 जणांना टोचली लस
बेळगाव : क्षयरोगाशी लढण्यासाठी देशातील पहिल्या प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेत बेळगावने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. ही मोहीम तीन महिन्यांपूर्वी पंधरा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. गुलबर्गा, बेंगळूर शहर, विजापूर आणि दावणगिरी हे जिल्हे पहिल्या चार स्थानांवर आहेत. मंगळूर जिल्हा शेवटच्या स्थानावर आहे. राज्यात एकूण 4 लाख 16 हजार 524 हून अधिक जणांना क्षयरोगाविरुद्ध लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 2 लाख 21 हजार 204 महिला तर 1 लाख 94 हजार 758 पुरुष आणि 562 तृतीयपंथी आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी संबंधितांच्या लेखी संमतीशिवाय त्यांना लस देऊ शकत नाहीत. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात महिलांनी क्षयरोगाविरुद्ध लसीकरण करून घेण्यात पुरुषांना मागे टाकले आहे.
गेल्या पाच वर्षात क्षयरोगावर उपचार घेतलेले, क्षयरोगाच्या रुग्णांशी जवळचा असलेला संपर्क, 60 वर्षावरील व्यक्ती, मधुमेही, धूम्र्रपान करणारे आणि 18 वर्षांपेक्षा कमी अशा 6 श्रेणीमधील व्यक्तींना बीसीजी इंजेक्शन केले जात आहे. मात्र, ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा सध्याची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकट्या दावणगिरी जिल्ह्यात 2.5 लाख जण लसीकरणासाठी पात्र आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ 30,546 जणांनी लसीकरण करून घेतले आहे. इतर जिल्ह्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. एक ‘वाईल’ (लसीची छोटी कुपी) उघडल्यानंतर चार तासांच्या आत दहा लोकांना लसीकरण करावे लागते. क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रौढांना ही लस टोचली जात आहे. सध्या बेळगाव जिल्हा लसीकरण मोहिमेत आघाडीवर असून यानंतर इतर जिल्ह्यांमध्येही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर सरकारी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. बेळगाव जिल्ह्यात 67,277 जणांना बीसीजी लस टोचण्यात आली आहे.