बेळगाव जिल्हा विभाजनाची पुन्हा चर्चा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे संकेत : मंत्री, आमदारांशी करणार चर्चा : राजकीय वर्तुळात कुतूहल
बेंगळूर : राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाची सातत्याने आमदार व मंत्र्यांकडून मागणी होत आहे. त्यावर चर्चाही झाली आहे. राज्यात सध्या 31 जिल्हे आहेत. आता बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी आणि गोकाक हे स्वतंत्र जिल्हे बनविण्याची मागणी आहे. बुधवारी चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील गौरीबिदनूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, केवळ बेळगावमध्ये नवा जिल्हा निर्माण करण्याची मागणी आहे. याबाबत आमदार, मंत्री आणि खासदारांची बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले आहे. राज्यात 18 नोव्हेंबर 2020 रोजी बळ्ळारी जिल्ह्याचे विभाजन करून विजयनगर हा 31 वा जिल्हा अस्तित्वात आला होता.
आता नवा जिल्हा स्थापनेची मागणी जोर धरत असून मुख्यमंत्र्यांनी आमदार, खासदारांची बैठक बोलावून चर्चा करणार असल्याचे सांगितल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. दुसरीकडे तुमकूर जिल्ह्याचे विभाजन करून मधुगिरी, शिमोगा जिल्ह्याचे विभाजन करून शिकारीपूर, मंगळूर जिल्ह्याचे विभाजन करून पुत्तूर, कारवार जिल्ह्याचे विभाजन करून शिरसी जिल्हे निर्माण करावेत, अशी स्थानिक पातळीवर मागणी होत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 7 मार्च रोजी मांडलेल्या 2025-26 सालातील अर्थसंकल्पात नवनव्या योजनांसह नव्या जिल्ह्याची घोषणा होईल, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पात तशी कोणतीही घोषणा झाली नाही. आता काही आमदार आणि मंत्र्यांचा दबाव वाढल्याने नवा जिल्हा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार चालविल्याचे समजते.
मीच राज्यपालांना निमंत्रण दिले!
विधानसौधसमोर आरसीबीच्या खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला होता. त्याच दिवशी सायंकाळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. विधानसौधसमोरील कार्यक्रमात राज्यपाल थावरचंद गेहलोत सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी राज्यपालांना कोणी निमंत्रण दिले?, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सिद्धरामय्या यांनी मीच राज्यपालांना निमंत्रण दिले होते. ते स्वत:हून आले नाहीत, असे स्पष्ट केले.