कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दीराकडून वहिनीचा भीषण खून

11:56 AM Sep 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगावच्या टिळकवाडीतील घटनेने शहर हादरले : कर्जाच्या ओझ्याने उचलले टोकाचे पाऊल

Advertisement

बेळगाव : मिळकतीच्या वादातून दिराने आपल्या वहिनीचा जांबियाने वार करून भीषण खून केल्याची घटना बुधवारी बेळगाव शहरातील मंगळवार पेठ, टिळकवाडी येथे घडली. या घटनेने परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. गीता रणजित दावले ऊर्फ गवळी (वय 45) राहणार गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गीताचा दीर गणेश लक्ष्मण दावले ऊर्फ गवळी (वय 60) राहणार गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी याने जांबियाने सपासप वार करून घरासमोरच तिचा खून केला आहे. शेजारी सोडवण्यासाठी धावले, मात्र त्यांनाही जांबियाचा धाक दाखवत मागे परतवले.

Advertisement

घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरासमोरच रक्ताच्या थारोळ्यात गीताचा मृतदेह पडला होता. पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. गवळी गल्ली येथील महिला व नागरिकांनी शवागाराबाहेर गर्दी केली होती. आरोपी गणेश दावले याची गवळी गल्ली परिसरात आधीपासूनच दहशत होती. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी आधीच त्याच्यावर ठोस कारवाई केली असती तर तो असा माजला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया गल्लीतील नागरिकांनी व्यक्त केली.

खून झालेल्या गीता यांचा मुलगा भगतसिंग याने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश दावले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी गणेश हा गीता यांचा दीर आहे. तळमजला व पहिल्या मजल्यावर ही दोन्ही कुटुंबे वास्तव्य करून आहेत. गणेशने संपूर्ण घरावर 2016 मध्ये अठरा लाख रुपये कर्ज काढले होते. कर्जाची परतफेड न केल्यामुळे कर्ज थकले होते. बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 20 दिवसांपूर्वी वसुलीसाठी मंगळवार पेठला येऊन कर्जाची परतफेड केला नाहीतर मालमत्ता जप्त करावी लागणार, असा इशारा दिला होता. बुधवारीही बँकेतील अधिकारी येणार होते. प्रत्यक्षात गीता व त्यांच्या कुटुंबीयांना गणेशने घेतलेल्या कर्जाचा काही एक संबंध नव्हता. तरीही जप्तीसाठी अधिकारी येताच कर्ज भरायचे आहे, आठ लाख रुपये द्या, अशी गणेशने आपल्या वहिनीकडे मागणी केली होती. आम्ही कर्जच घेतले नाहीतर त्याची परतफेड आम्ही कशासाठी करायची? अशी भूमिका गीता व कुटुंबीयांनी घेतल्यामुळे गणेश संतप्त झाला होता.

गणेशने मंगळवारी आपली पत्नी-मुलांना पाठवले तुळजापूरला 

वहिनीचा खून करणारा गणेश दावले हा गावठी दारू विकतो. त्याच्यावर यापूर्वी बाराहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. गवळी गल्ली परिसरात त्याची दहशत होती. अनेकांना त्याने धमक्याही दिल्या होत्या, अशा तक्रारी बुधवारी स्थानिक नागरिकांनी केल्या. गणेशने मंगळवारी आपली पत्नी व मुलांना तुळजापूरला पाठवले आहे. त्यांना सुरक्षित ठेवण्याची काळजी घेऊनच बुधवारी सकाळी त्याने आपल्या वहिनीचा खून केला आहे. खुनाच्या या कटात कुटुंबीयांचाही सहभाग आहे का? याची चौकशी करण्याची मागणी गीताच्या कुटुंबीयांनी केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी बँक कर्मचारी जप्तीसाठी आले होते. त्यावेळीही त्याने राडा केला होता. जप्तीसाठी पुढे आलात तर हात कापून घेऊ, अशी धमकी दिली होती. परिसरात गावठी दारू विकण्यात त्याचे नाव पुढे आहे. पोलिसांनी त्याच्यावर वेळोवेळी कारवाई करायला हवी होती. कारवाई झाली असती तर तो इतका माजला नसता, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली. दरम्यान, गणेशला अटक करून पोलिसांनी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

जांबियाने सपासप वार...

बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8.40 वाजण्याच्या सुमारास गीता कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी गणेशने अचानक त्यांच्यावर जांबियाने सपासप वार केले. गीताची आरडाओरड ऐकून शेजारी व गल्लीतील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, जांबियाचा धाक दाखवत गणेशने त्यांना रोखून ठेवले. कामावर जाण्यासाठी घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावताना गणेशने गीता हिच्यावर हल्ला करत ठार केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article