बेळगावनगरी शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज
मंदिरांना रोषणाई : दुर्गादेवीच्या प्रतिष्ठापनेसाठी मंडळांची जय्यत तयारी : मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांची धडपड
बेळगाव : शारदीय नवरात्रोत्सवासाठी बेळगावनगरी सज्ज झाली आहे. मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांच्या माळा लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे. काही मंडळांनी प्रथमदर्शन सोहळा केला असून सोमवारी काही मंडळांचे आगमन सोहळे होणार आहेत. याबरोबरच सौंदत्ती येथील यल्लम्मादेवीच्या दर्शनासाठी विशेष बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सोमवार दि. 22 रोजी घटस्थापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. पूजा साहित्यासह फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. मागील काही दिवसांपासून गडगडलेले फुलांचे दर रविवारी मात्र तेजीत होते. शेवंती, झेंडू, लहान गुलाब यासह इतर फुले विक्री केली जात आहेत. त्याचबरोबर पेरू, सफरचंद, डाळिंब, केळी, संत्री ही फळे मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत. त्याचबरोबर पूजेच्या साहित्याचीही खरेदी करण्यासाठी नागरिकांची रविवारी बाजारात गर्दी झाली होती.
बेळगाव शहरात गणेशोत्सवाप्रमाणेच आता दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे. या मूर्तींवर रविवारी मूर्तिकार शेवटचे हात फिरवत होते. सोमवारी आगमन सोहळे असल्याने त्यापूर्वी मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांची धडपड सुरू होती. मागील आठ दिवसांत झालेल्या पावसामुळे मूर्तिकारांना बराच त्रास सहन करावा लागला. परंतु, त्यातूनही त्यांनी वेळेत मूर्ती तयार केल्या आहेत. सुंदर व एकापेक्षा एक सरस अशा मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. बेळगावच्या नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने काढली जाणारी दुर्गामाता दौड. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत शहराच्या प्रत्येक भागातून दौड काढली जाते. सोमवारच्या दौडसाठी रविवारी सायंकाळपासून जय्यत तयारी करण्यात येत होती. शास्त्राrनगर, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, समर्थनगर या परिसरात भगव्या पताका, फुलांच्या माळांनी संपूर्ण परिसरात दुर्गादेवीच्या स्वागतासाठी तयारी केली जात होती.
मंगळवार दि. 23 रोजीचा दौडचा मार्ग
चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरापासून दुसऱ्या दिवशीच्या दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट परिसर, चव्हाट गल्ली, जुना पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, फोर्ट रोड, गांधीनगरमार्गे किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरात सांगता होणार आहे.