बेळगाव-चोर्ला-गोवा वाहतूक पूर्णपणे बंद
कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी रस्ता गेला वाहून : दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यास बैलूर रस्तादेखील होणार बंद
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी बनवलेला रस्ता शनिवारी मध्यरात्री वाहून गेल्याने रविवार दि. 15 रोजी सकाळपासून बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मलप्रभा नदीच्या पात्रात बनवलेला पर्यायी रस्ता बंद होण्याची वीस दिवसांतील ही तिसरी घटना आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बेळगाव-चोर्ला-गोवा या रस्त्यापैकी रणकुंडये ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून याच निधीतून कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल काढून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहे. सदर पुलाचे बांधकाम हाती घेण्यापूर्वी मलप्रभा नदीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी दहा पाईप घालून पर्यायी रस्ता बनविण्यात आला होता.
जानेवारीपासून या पर्यायी रस्त्यावरूनच पूर्ण वाहतूक सुरू होती. परंतु मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रविवार दि. 25 मे रोजी नदीतील रस्ता खचला. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. दोन दिवसांनंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी दहा पाईप घालून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. परंतु पुन्हा पंधरा दिवसांनी (रविवार दि. 8 मे रोजी) पर्यायी मार्ग खचल्याने बेळगाव-चोर्ला-गोवा अशी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दुरुस्ती करून दोन दिवसांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला होता. यावेळी मात्र गेले चार दिवस कणकुंबी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रविवार दि. 15 रोजी पहाटे मलप्रभा नदीच्या पात्रात बनवलेला पर्यायी रस्ता वाहूनच गेला. त्यामुळे बेळगाव-चोर्ला-गोवा अशी वाहतूक आता पुन्हा एकदा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सदर वाहतूक खानापूर आणि बैलूर मार्गे वळविण्यात आल्याची माहिती कंत्राटदाराने दिली आहे.
कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी रस्ता आणि पूल वाहून गेल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बैलूर आणि खानापूर मार्गे वळविण्यात आली आहे. बैलूर रस्ता मुळातच पूर्णपणे उखडून गेला आहे. गेल्या चार वर्षांपासून बैलूर रस्त्याचे भिजत घोंगडे आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बैलूर ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वेळोवेळी अनेकवेळा निवेदन, अर्ज विनंत्या करूनही गेली चार-पाच वर्षे या रस्त्याकडे दुर्लक्ष केले गेले. बैलूर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. अशा परिस्थितीत बेळगाव, जांबोटी, कणकुंबी, चोर्ला, गोवा अशी वाहतूक बैलूरमार्गे वळविण्यात आल्याने बैलूर रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रस्त्याचे पूजनही केले आहे. मात्र सध्यस्थितीत या रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे असून दुर्लक्ष केले तर बैलूर रस्ता देखील बंद होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन कोणती उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.