For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-बेंगळूर वंदे भारत रविवारपासून धावणार

12:12 PM Aug 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव बेंगळूर वंदे भारत रविवारपासून धावणार
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखविणार हिरवा झेंडा : नागरिकांच्या मागणीला यश 

Advertisement

बेळगाव : बेळगावातील रेल्वे प्रवाशांच्या मागणीला अखेर यश आले आहे. बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस रविवार दि. 10 पासून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी बेंगळूर दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या हस्ते या वंदे भारतचे उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वंदे भारत सुरू होणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेससाठी चाचणी घेण्यात आली होती. सुरूवातीला बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावपर्यंत वाढवावी अशी मागणी करण्यात येत होती. परंतु त्याला हुबळी-धारवाडच्या नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यास बराच विलंब लागला. अखेर रेल्वेबोर्डने या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक्स्प्रेस पहाटे 5.20 वा. बेळगावमधून निघणार असून दुपारी 1.30 वा. बेंगळूरला पोहचेल तर बेंगळूर येथून दुपारी 2.20 वा. निघालेली वंदे भारत रात्री 10.40 वा. बेळगावला पोहचणार आहे. वर्षभरापूर्वी पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली होती. त्यानंतर आता बेळगावमधून धावणारी दुसरी वंदे भारत सुरू होणार आहे. तर राज्यातील 11 वी वंदे भारत धावणार आहे.

बेळगावकरांना वंदे भारतचा उपयोग होईल का?

Advertisement

बऱ्याच प्रयत्नानंतर बेंगळूर-बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. परंतु वेळापत्रकामुळे लोकप्रतिनिधींसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पहाटे 5.15 वा. बेळगाव रेल्वेस्थानकावर प्रवासी पोहचतील का? तसेच रात्री 11 वा. बेळगावमध्ये आल्यावर शहरातील उपनगरांसह ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. सध्या असलेले वेळापत्रक पहाता प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार नाही आणि त्यामुळे लवकर एक्स्प्रेस बंद करण्यासाठीच हे प्रकार सुरू असल्याची चर्चा केली जात आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली जात आहे.

मागील अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार

बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारतचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांची मागील अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वेराज्य मंत्री व्ही. सोमण्णा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे सहकार्य मिळाले.

- जगदीश शेट्टर, खासदार

वंदे भारतचे जल्लोषात स्वागत करणार

बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होती. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याची माहिती माध्यमांमधून मिळाली. परंतु अद्याप रेल्वेकडून अधिकृत माहिती तसेच वेळापत्रक आपल्याकडे आले नाही. तरी देखील वंदे भारतचे स्वागत जल्लोषात केले जाईल.

- इराण्णा कडाडी,  खासदार

Advertisement
Tags :

.