बेळगाव-बेंगळूर सकाळची विमानफेरी होणार बंद
27 ऑक्टोबरपासूनचे बुकिंग थांबविले : प्रवाशांकडून संताप, उत्तम प्रतिसाद असतानाही अचानक फेरी बंद
बेळगाव : बेळगावच्या सांबरा विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या विमानफेऱ्या बंद होण्याचे प्रकार काही केल्या थांबताना दिसत नाहीत. बेळगाव-बेंगळूर दरम्यानची सकाळची विमानफेरी इंडिगो एअरलाईन्सने 27 ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बेळगावची आणखी एक विमानफेरी रद्द होणार असल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
कर्नाटकच्या राजधानीला म्हणजे बेंगळूरला बेळगावमधून दिवसातून दोन विमानफेऱ्या उपलब्ध होत्या. बेळगावमध्ये सुवर्णविधानसौध असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांसोबतच उद्योजक, व्यापारी व नागरिकांचीही नेहमीच ये-जा असल्याने या दोन्ही विमानफेऱ्यांना उत्तम प्रतिसाद मिळत होता. सकाळच्या विमानफेरीला दररोज 80 ते 85 टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत होता. 8 सप्टेंबर 2019 पासून बेंगळूर-बेळगाव मार्गावर इंडिगोने विमानफेरी सुरू केली होती.
प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असतानाही अचानक ही विमानफेरी बंद करण्यात आली आहे. इंडिगोने 27 ऑक्टोबरपासून बुकिंग बंद केले आहे. सकाळच्या सत्रात बेंगळूरहून बेळगावला येणे व बेळगावहून बेंगळूरला जाणे हे या विमानफेरीमुळे शक्य होत होते. प्रवासी संख्या महिन्याला 30 हजारांच्या घरात असताना विमानफेऱ्या रद्द झाल्यास याचा परिणाम पुन्हा एकदा विमानतळावर होणार आहे.
आतापर्यंत अनेक विमानफेऱ्या बंद
प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही बेळगावमधून अनेक विमानफेऱ्या टप्प्याटप्प्याने बंद झाल्या. यापूर्वी चेन्नई, पुणे, नाशिक, जोधपूर, सूरत, इंदूर या प्रमुख शहरांच्या विमानफेऱ्या बंद झाल्या आहेत. काही विमानफेऱ्या जवळील हुबळी विमानतळाला वळविण्यात आल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मोठ्या परिश्रमाने सुरू केलेल्या विमानफेऱ्या रद्द होत असतानाही लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प असल्याचे चित्र दिसून येत आहे.