महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सवयीचे गुलाम होताना...

06:40 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॅडम, मी अगदी विटलो आहे. कुणा कुणाचे तिच्यासोबत पटत नाही. घर कामाला एक माणूस टिकत नाही. स्वच्छता...स्वच्छता म्हणजे किती स्वच्छता? तिच्या स्वच्छतेच्या निकषात आमचे कोणतेच काम बसत नाही. सारखी कटकट. सारखं हात धुणे. कट्टा साफ करणे, सतत आवराआवर..लादीवर केराचा एक कण दिसता नये..खरंच कंटाळा आला आहे साऱ्याचा. हल्ली तर यावरून सतत भांडणे होतात. वेळेपरी वेळ जातो तरी तिची कृती काही थांबत नाही. काय करावे सुचत नाही. आलेले ते सद्गृहस्थ आपली व्यथा मांडत होते.

Advertisement

बालपणी नेहमी कानावर पडणारा शेजारच्या काका काकूंचा संवाद आठवला. काकू नेहमी वैतागत म्हणायच्या, या माणसाबरोबर राहणे म्हणजे नको वाटतं. मंत्रचळी माणूस हा. कोणाशी पटायचं नाही यांचे.

Advertisement

त्या काकांची तऱ्हा थोडीशी वेगळी होती. बाहेर पडताना घराला कुलूप लावले आहे ना, हे ते वारंवार तपासायचे. समजा घरात कोणत्या तसबिरीला नमस्कार करायचा राहिला असेल तर ते आठवून परत कुलूप काढून आत जायचे. स्कूटर कुठे उभी केली की हँडल नक्की नीट लॉक झाले ना हे अनेकदा तपासून पाहायचे. यामध्ये तासनतास जायचे आणि घरातील माणसे पार वैतागून जायची.

आपल्या आजूबाजूला अशा विचित्र सवयी असणारे किंवा त्या सवयीच्या विळख्यात अडकलेली अनेक माणसे आपण पाहत असतो. उगीच डोळे मिचकावणारे, सतत खांदे उडविणारे, केसांवरून हात फिरवणारे, येता-जाता सतत नमस्कार करणारे अशा सवयी असणारी अनेक माणसं पाहायला मिळतात. जोपर्यंत अशा सवयीमुळे त्या व्यक्तीचे रुटीन किंवा तिचा दैनंदिन परिपाठ विस्कळीत होत नाही तिच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत किंवा इतरांना त्याचा काही त्रास होत नाही तोपर्यंत त्या माणसांच्या अशा सवयींना महत्त्व दिले जात नाही किंवा काही वेळा दुर्लक्षही केले जाते. मात्र जेव्हा याचा अतिरेक होतो आणि व्यक्तीचे आयुष्य विस्कळीत होऊ लागते तेव्हा मात्र अशा सवयींची दखल घेणे भाग पडते कारण या सवयी, सवयी न राहता मनोविकारांचा भाग बनलेल्या असतात. अशा सवयींच्या मागे मनात सतत काहीतरी विचार घोळत असतो. या विचारामागे तीव्र भीती, चिंता यासारख्या त्रासदायक आणि नकारात्मक भावना दडलेल्या असतात. या सतत घोंगावणाऱ्या विचारांपासून क्षणिक का होईना परंतु सुटका मिळावी म्हणून ती व्यक्ती ती कृती/सवय पुन्हा-पुन्हा करत असते. चिंता विकृतीचा एक प्रकार असलेल्या या विकाराला ऑबसेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर म्हणतात. इंग्रजी OCD या आद्याक्षरांनी तो ओळखला जातो. चिवट आणि त्रासदायक असलेल्या या विकाराची ओळख वेळीच पटली तर सुरुवातीलाच त्याला लगाम घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात आणि आयुष्यातील वाया जाऊ पाहणारी वर्षे वाचविता येतात.

खरंतर दैनंदिन जीवनाची वाटचाल करत असताना भीती, चिंता, ताण इत्यादी भावना थोड्याफार प्रमाणात असतातच. परंतु, त्या योग्य प्रमाणात असतात त्या वेळी कोणतेही काम काळजीपूर्वक, अधिक चांगले करण्याची प्रेरणा मिळते. ज्यावेळी नकारात्मक भावना अकारण निर्माण होतात आणि त्याची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी या गोष्टी वाढू लागतात, टोकाला जातात त्यावेळी मनोविकारांच्या दिशेने वाटचाल सुरू होते. काही वेळा भित्रा स्वभाव, काळजीखोरपणा, मनात सतत येणाऱ्या शंकाकुशंका, न्यूनगंड, अति भोळसटपणा, दुबळी निर्णय क्षमता या गोष्टी ‘ओसीडी’ विकाराला खतपाणी घालतात.

तसं पाहायला गेलं तर गॅस किंवा पंखा आपण नीट बंद केला आहे की नाही, पंपाचे बटण नीट बंद केले आहे ना? असे संभ्रम कधी ना कधी आपल्या सगळ्यांनाच होत असतात. कित्येकदा आपणही कुलूप लावल्यानंतर ते नीट लागले आहे ना याची खात्री करण्यासाठी ते कुलुप ओढून पाहतो. परंतु ते एकदा तपासल्यानंतर किंवा एकदा तशा पद्धतीची खात्री केल्यानंतर तो विचार मनातून निघूनही जातो. परंतु अशा त्रासाने ग्रस्त व्यक्तीच्या मनात मात्र ते इतके रुतून बसलेले असते की ती व्यक्ती त्या विचारांच्या आवर्तात फिरत राहते आणि अस्वस्थ होते.

 उदा. एखाद्या व्यक्तीला बक्षीस म्हणून पाकिटामधून पैसे दिले.

पाकीट दिले तर खरे परंतु ते पाकीट नीट चिकटवले होते ना? त्यातले पैसे पडले तर नसतील ना? अमुक एखाद्या व्यक्तीला चेक दिला आहे पण चेक क्रॉस करायचा तर राहिला नाही ना? घराला कुलूप घातले खरे पण लॉक नीट झालं का? अशी संदिग्धता या विकारातील लोकांना छळत राहते. आपण स्वत: केलेल्या गोष्टीवरून किंवा गोष्टीबाबत साशंकता वाटत राहिल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि आनंदही हरवतो. ओसीडीमधील ऑबसेसिव्ह आणि कंपल्सिव्ह या दोन संज्ञा महत्त्वाच्या आहेत. अनाहुतपणे मनात शिरणाऱ्या व मन व्यापून टाकणारा विचार किंवा आवेगांना  किंवा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर निर्माण होणाऱ्या त्रासदायक प्रतिमांना अनिवार्य विचार किंवा ऑब्सेशन म्हणतात. मनात येणारे हे विचार कितीही नकोसे वाटले तरी विकारग्रस्त व्यक्तीला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. विचारांमुळे व्यक्तीच्या मनात चिंता भीती अस्वस्थता व्याकुळता वगैरे नकारात्मक भावना निर्माण होतात आणि काहीतरी अप्रिय प्रसंग किंवा परिस्थिती उद्भवेल की काय अशी धास्ती त्यांच्या मनात घर करते.

आपले विचार व कृती अवास्तव आहे हे बाधित व्यक्तीला कळत असते पण त्यावरती अंकुश ठेवणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे तिला जमत नाही. ती व्यक्ती दु:खी होते. ते विचार दडपण्यासाठी ती दुसरा विचार किंवा क्रिया करत राहते. एखाद्या रिवाजाप्रमाणे पुन्हा पुन्हा केल्या जाणाऱ्या या क्रियांना म्हणजेच अनिवार्य कृतींना कंपल्सिव्ह म्हणतात. त्रस्त व्यक्तीच्या मनात असलेले विचार आणि त्या विचारांचा त्रास कमी होण्यासाठी ती पुन्हा पुन्हा करत असलेली कृती याचा अर्थाअर्थी संबंध नसतो. अनिवार्य  विचार हे अनेक विषयासंबंधीचे असू शकतात. अनेकदा विकाराच्या सुरुवातीला ते फारसे स्पष्ट नसतात. अर्थात या विषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात.

-अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article