सवयीचे गुलाम होताना... भाग-2
मॅडम तुम्हीच समजवा तिला. कुणाचेही ऐकत नाही ती. माझं तर हल्ली डोकं चालत नाही. वस्तू साठवायच्या म्हणजे किती? वस्तू साठवणूकीचा छंदच लागला आहे तिला! घराचे अक्षरश: गोडाऊन झाले आहे.बरं, तू असं का करतेस? असं विचारलं तर काही उत्तर नाही. माझ्या कुठच्याही वस्तूला हात लावायचा नाही एवढेच बजावते.
त्या वस्तुंचा उपयोग तर काही नाही. नुसतं साठवायचेच साठवायचे. छे? मला तर उबग आलाय सगळ्याचा. प्रमिला ताईंची मुलगी रीमा त्यांच्या ‘साठवणूकीच्या सवयीने’ अगदी हैराण झाली होती. तिने त्या दोन खोल्या आणि त्यांनी साठवलेल्या सामानाचे आणलेले फोटो पाहून मीही थक्क झाले.
खरंतर घरातील कोणतीही वस्तू टाकायची नाही, घर किंवा संसार आहे म्हटल्यानंतर केव्हा काय लागेल याचा नेम नाही हे अगदी खरं. काही वेळा अगदी बारीक टाचणी किंवा सुताच्या तुकड्यावाचूनही एखादे काम अडू शकते परंतु तारतम्य न बाळगता प्रत्येक गोष्टीचा संचय करत राहणं आणि एखादी गोष्ट हलवण्याचा प्रयत्न केला की अस्वस्थतेचे टोक गाठणे हे मात्र विकाराचे लक्षण झाले.
प्रमिला ताईंनी इतक्या वस्तू साठवल्या होत्या की घराच्या दोन खोल्या ‘भंगाराचे गोडाऊन’ झाल्या होत्या. असंख्य गंजलेले खिळे, पीना, जुने सेल, प्लास्टिकच्या बादल्या, मोडकी खेळणी, अनेक प्रकारची भांडी, वायर्स, रिकामा काड्यापेट्या अशा बिनकामी असंख्य वस्तू त्यामध्ये होत्या. ज्यावेळी प्रमिलाताईंची भेट झाली, सविस्तर बोलणं झालं त्यावेळी हे सारं कशासाठी? हा प्रश्न विचारल्यावर त्यांचे उत्तर होते.. संसार आहे ना.. कधी काय लागेल नेम नाही. इतकी वर्ष संसार झाला. समजा एखाद्या वेळी एखादी वस्तू मिळाली नाही तर इतके वर्षाचा संसार करुनही मी अपयशी ठरणार..कुणाला एखादी वस्तू हवी झाली आणि मी नाही देऊ शकले तर? हा विचार त्यांना अस्वस्थ करायचा..चिंता वाटायची, कधी अपराधीपणाची भावना मनाचा ताबा घ्यायची.
घरचे हरतऱ्हेने त्यांना समजवायचे पण या त्यांच्या साठवणूक केलेल्या या ‘इष्टेटीला’ हात लावून द्यायच्या नाहीत. अनेकदा कुणी काही उचललं नाही ना हे पाहण्यात तासन् तास निघून जायचे.
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ओसीडीग्रस्त व्यक्तीच्या मनात असलेले त्रासदायक विचार आणि त्या विचारांचा त्रास कमी व्हावा म्हणून ती करत असलेली कृती याचा अर्थाअर्थी काही संबध नसतो. ओसीडीग्रस्तांच्या विचार आणि कृतीमागे तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. आयुष्य पोखरणारी चिंता, काहीतरी वाईट घडेल अशी धास्ती, अपराधी भावना..म्हणजे समजा काही झाले तर त्या गोष्टीला मीच जबाबदार असल्याची धारणा. असे झाले तर,. या काल्पनिक विचाराने या व्यक्ती अस्वस्थ होत असतात. कुठल्याही विचाराचे वा कल्पनेचे मुल्यमापन अवास्तव किंवा अविवेकी पध्दतीने करणे हे या विकारात दिसून येते.
विकारग्रस्त व्यक्तीला स्वत:ची कामे, जबाबदाऱ्या समाधानकारकरीत्या पार पाडता येत नाहीत. अनिवार्य कृतीत तासन् तास वेळ वाया जातो. ओसीडी वर्गात समाविष्ट असलेला आणखी एक विकार म्हणजे बॉडी डीसमॉर्फिक डिसॉर्डर किंवा बीडीडी. काहींच्या मते हा विकार म्हणजे भ्रमाचा भाग असून त्याची गणना ते डिल्युजन डिसॉर्डर या प्रकारात करतात. या विकाराने ग्रस्त गुणाला स्वत:च्या शारीरिक अवयवांमध्ये काही तरी दोष किंवा वैगुण्य आहे असे वाटत राहते आणि त्याचे सारे विचार त्या वैगुण्या भोवती फिरत राहतात. उदाहरणार्थ नेहाला आपले नाक खूप मोठे आहे असे वाटायचे. आणि तासन् तास ती आरशामध्ये स्वत:चा चेहरा न्याहाळत बसायची. तर कुणालला आपला एक हात दुसऱ्या हातापेक्षा बारीक आहे की काय असे वाटायचे. यांचे ‘वाटणे’ हा विकाराचा भाग असतो हे लक्षात घ्यायला हवे
अर्थात या सर्वांवरच इलाज करता येतो. एकदा त्या व्यक्तीशी बोलुन ओसीडीचे निदान पक्के झाले. विकाराची तीव्रता, कालावधी, प्रमाण कळले आणि ओसोडीसोबतच अन्य कोणता विकार आहे वा नाही याची शहानिशा झाली की उपचारांची योग्य दिशा ठरविता येते. गरजेअनुसार औषधोपचार आणि समुपदेशन या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. औषधोपचारांनी विकाराची लक्षणे कमी करता येतात. मात्र अनावर कृती करण्याची सवय दूर करणे हे रुग्णाच्या हाती असते. त्यासाठी त्याने मानसिक पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. त्यासाठी त्या व्यक्तीला काही मानसोपचार तंत्रे आत्मसात करण्यास उद्युक्त करणे संयुक्तिक ठरते.
खरंतर आपले वर्तन आणि सवयी या शिकवणुकीतून, संस्कारातून विकसित होत असतात. एखाद्या वर्तनाचा परिणाम सुखद असला की तसे वर्तन आपोआप पुन: पुन्हा घडते आणि ती सवय बनते. मात्र एखादी व्यक्ती सवयीचा गुलाम झाली की त्या वर्तनाचा अतिरेक होतो. विवेक संपुष्टात येतो, वास्तवाचे भान सुटु लागते आणि ओसीडीच्या दिशेने जाण्यास खतपाणी मिळते.
उदा. जेवणापूर्वी हात धुणे, टॉयलेटला जाऊन आल्यावर हातपाय धुणे हा स्वच्छतेचा भाग झाला किंवा रोज सकाळी वा संध्याकाळी देवाला नमस्कार करणे हा संस्काराचा भाग झाला. परंतु तासन् तास हात धुत बसणे किंवा काही विपरीत तर घडणार नाही ना म्हणून बाकी काहीही न करता तासनतास देवासमोर बसून राहणे हा विकाराचा भाग झाला.
आपण आपल्या सवयींच्या बाबतीत सजग असणे गरजेचे आहे. आपले मानसिक आरोग्य सृदृढ राखायचे असेल तर आपणच आपल्या मनात डोकावून पहायला शिकायला हवे. विचार आणि भावना यांची सजगता, त्यांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी याविषयीही सजग असणे गरजेचे आहे.
या सर्व गोष्टींचे भान राखले तर मानसिक आरोग्य आणि पर्यायाने शारिरिक आरोग्यही उत्तम राहील हे मात्र निािश्चतच!!
- अॅड. सुमेधा संजिव देसाई