For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शैक्षणिक वर्षारंभ

06:33 AM Jun 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
शैक्षणिक वर्षारंभ
Advertisement

महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. गुलाबपुष्प देऊन आणि नवा गणवेश, नवी पुस्तके आणि स्वागताला मुख्याध्यापक, मास्तर आणि मंत्री आमदार, जिल्हाधिकारी वगैरे असा खासा मेळ जमवून शाळेची घंटा वाजवली गेली आहे. एक काळ असा होता कशाला कशाचा मेळ नसायचा. पोत्याच्या पिशव्या दप्तर म्हणून आणि गोणपाट बस्कर म्हणून वापरायला लागायचं. थोरला भाऊ किंवा बहीण हिचा गणवेश वापरायला लागायचा. निम्म्या किमतीत घेतलेली पुस्तके, फुटकी पाटी, जमेल ते घ्यायचं आणि शाळा गाठायची, दंगा, आरडा ओरडा मजा, भीती, धाक अशा संमिश्र भावना असायच्या. त्या भावनाही नीट कळत नसत. गुरुजी मारकुटे असत. गुलाब फुल वगैरे कधी कुणी कल्पना पण केलेली नसे पण मुलं शिकत, चमकत आणि अनेक क्षेत्रात नाव काढत. फाटका गणवेश, जुनी पुस्तके आणि बायडिंगची वही यांचं कुणालाच काही वाटत नसे. गावच्या शाळा, हायस्कूल आणि गुरुजी यांना प्रतिष्ठा असायची. आता दिवस बदलले. पूर्वी वरतोंड करून बोलायची हिंमत नसलेले पाल्य ‘बास करा तुमच्या दारिद्र्या कथा’ असे सुनावू लागले आहे. शाळा नावापुरती खरे शिक्षण कोंचिंग क्लासमध्ये. शासनाच्या वतीने पुस्तके, गणवेश, शिष्यवृत्ती, शाळेला येण्याजाण्यासाठी विद्यार्थी वाहतूक रिक्षा, पॉकेट मनी, उंची नवे कपडे, वेगवेगळे डे आणि काही काही सर्व आहे. सारे मिळते आहे. आता गुरुजीचे सर झाले आहेत आणि मराठी शाळा वाचवा अशा आरोळ्या सुरु आहेत. गुलाब फुले आणि प्रेमभावे स्वागत वगैरे ठिक आहे पण शाळांच्या पडक्या इमारती, गंजलेले गळके पत्र्याचे छत आणि घामेघुम वर्गखोल्या यामुळे शाळांची पटसंख्या पटावरच दिसते आहे. झाडून सर्व विद्यार्थी कोचिंग क्लासला जातात. अलीकडे तर नववी, दहावीचे आणि बारावीचे विद्यार्थी शाळेत

Advertisement

अॅडमिशन घेतात आणि कोचिंग क्लासेस लाखांच्या फि भरुन अटेंड करतात. क्लासेसवाले लाखोंनी फि घेतातच पण कोणत्या क्लासचा विद्यार्थी बारावीला, दहावीला, स्पर्धा परीक्षेला सर्वप्रथम, ही वेगवेगळ्या क्लासमधील स्पर्धा खून, मारामारी इथपर्यंत पोहोचली आहे. काही कोंचिंग क्लासचा टर्न ओव्हर शंभर दोनशे कोटीचा आहे. शिक्षणसम्राट, संस्था चालक व त्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कधीच हाताबाहेर गेली आहे. काही नामांकित महाविद्यालये पंधरा ऑगस्टनंतर बंद पडतात व त्यांचे काम विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन व फॉर्म भरण्यापूरते उरले आहे, हे राज्यभर दिसते आहे. शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ गुलाबफुलांनी केला आणि गणवेश, पुस्तके मोफत वाटली, इव्हेंट साजरा केला म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील वास्तव बदलणारे नाही. मुलभूत शिक्षण, प्रेरणादायी शिक्षण, जीवनमूल्ये बिंबवणारे शिक्षण गरजेचे आहे पण पैशाला आणि पगाराला महत्त्व आले आहे आणि शिक्षणाची व्यवस्था कोलमडती आहे. जर लाखोंनी फि भरणारा आणि गुणवत्तेपेक्षा गुणात गुरफटलेला समाज सर्वदूर दिसत असेल तर सर्वच गोष्टींचा फेरविचार केला पाहिजे. गुलाब फुले नाही दिली तरी चालतील, गुरुजी हसतमुख स्वागताला उभारले नाहीत तरी हरकत नाही पण चांगले शिक्षण, चांगल्या शाळा आणि विना कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी घडवले गेले पाहिजेत. अजून काही गावात आणि संस्थांत इतका अंधार नाही. त्या गावातील जाणती माणसे, संस्था, दर्जा टिकवण्यासाठी आग्रही आहेत, गावकरी गावचे वाचनालय आणि शाळा सुंदर ठेवतात. शिक्षक व विद्यार्थी यांचेवर दक्ष राखतात आणि गुणाबरोबर गुणवत्तेला महत्त्व देतात. या गावचे विद्यार्थी उद्याच्या गुलाबपुष्पाचे मानकरी ठरतील हे वेगळे सांगायला नको. मागील पिढी ही अडचणीत, अपुऱ्या साधन सामुग्रीसह शिकली, सवरली तरी तिने चारित्र्य जपले होते. अपुरी साधने सोई सुविधा अशी वेळ नव्या पिढीवर येता कामा नये पण शिक्षण ही ज्ञानाची आराधना आहे. शिक्षण हे संस्कार, चारित्र्य घडवते हे विसरून चालणार नाही. आपण चांगली ज्ञानसाधना केली नाही तर सर्वच क्षेत्रात अधोगती हे वेगळे सांगायला नको.

आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा थोडा जरी धांडोळा घेतला तरी आपण कुठं उभे आहोत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माणसांना मागे वळून बघताना जितका अभिमान वाटेल तितकाच समोर बघताना वाटला पाहिजे. गावात सर्वात उत्तम, सुसज्ज वास्तू शाळेची आणि वाचनालयाची असली पाहिजे, गावात विद्वानांची उठबस व मार्गदर्शन हवे. शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांनाच, नव्याचा, चांगल्याचा ध्यास असला पाहिजे आणि शिक्षण, ज्ञान हे शाळेत, गावात, शेतीत मिळाले पाहिजे अन्यथा उद्या आम्ही घोटाळ्यात नंबर वन असू. पण जगात आम्ही अडाणी राहू. शेतीपासून स्पेसपर्यंत आणि संपर्कापासून आणि मानवी कल्याणापर्यंत सर्वच क्षेत्रात अव्वल स्थान मिळवायचे असेल, नवे तंत्रज्ञान आत्मसात करायचे असेल तर शाळा, महाविद्यालये, प्रयोगशाळा, शेती शाळा, संशोधन संस्था यांना विकासाची, ज्ञानाची केंद्रे ठरवून पावले टाकली पाहिजेत. भारत जगात अव्वल आणि विश्वगुरु हे ध्येय असेल तर पावले त्या दिशेनेच पडली पाहिजेत. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. प्राथमिक सोयीसुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. आणखी मिळतील पण ज्ञानसाधना विद्यार्थ्यांना करावी लागेल व जबाबदारी म्हणून गावातील शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, वाचनालये, संशोधन संस्था यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. बाकी गुलाब वगैरे वरवरचे इव्हेंट ठिक आहेत. गुलाबफुले सुकतील पण आपले इरादे मजबूत हवेत, सखोल, मूलभूत आणि सर्वांगीण विकासासाठी गतीने पावले टाकली पाहिजेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.