Solapur News : महावीर चौकात उघड झाले भीक मागण्याचे रॅकेट; लहान मुलांचा जीव धोक्यात
सोलापूरमध्ये उघड झाले भीक मागण्याचे रॅकेट
सोलापूर : शहरातील महावीर चौक सिग्नलवर लहान बालकांच्या जीवावर चाललेला भीक मागण्याचा काळा धंदा सदर बझार पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करून कारवाई केली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व दामिनी पथक विभाग ०१ व ०२ यांचे स्वतंत्र पथक शहरातील सिग्नल चौक, रस्ते आणि दुभाजकांवर भीक मागणाऱ्या महिला व बालकांवर कारवाईसाठी तैनात करण्यात आले आहे.गुरुवारी सायंकाळी पाच वाजता महावीर चौक परिसरात पेट्रोलिंग करत असताना, सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांकडे एक महिला आणितिच्यासोबत तीन लहान मुले भीक मागताना आढळून आली. चौकशी केली असता, त्या महिलेचे नाव जैताबाई महादेव पवार (वय ४०, रा. पारधी बस्ती, आयटीआयजवळ, जुना विजापूर नाका, सोलापूर) असे निष्पन्न झाले.
संबंधित तीन बालकांना तत्काळ ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून त्यांना सुरक्षित बालगृहात दाखल करण्यात आले आहे. बालकांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी जैताबाई हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
