पेटीवरचा भिकारी
आटपाट नगर होते, त्या नगरात एक राजा राज्य करत होता. हा राजा धनधान्याने अतिशय संपन्न होता. परंतु त्यांनी राज्यामध्ये एक नियम केला होता. ‘कमवा आणि जगा’ त्यासाठी काय लागेल ती मदत मी तुम्हाला करेन पण ज्यानी त्यानी आपापलं कमवून खाल्लं पाहिजे, शिकलं पाहिजे. त्याच्याकडे कोणीही आलं तरी तो रिकाम्या हाताने जात नसे. एक दिवस त्याच्याकडे एक अतिशय फाटक्या कपड्यातला दरीद्री भिकारी आला. राजाने त्याला एक पेटी दिली. भिकाऱ्याला खूप आनंद झाला. त्याला वाटलं आता आपले दिवस बदलतील. आळशी प्रवृत्तीचा हा भिकारी घरी येऊन पेटी बघू लागला. परंतु पेटीत त्याला काहीही मिळालं नाही. आता त्याला खूप राग आला कारण त्याला ऐश्वर्यामध्ये राहण्यासाठी धन मिळणार या कल्पनेला पूर्ण तडा गेलेला होता. शेवटी त्यांनी ती पेटी बसायला घेतली आणि रोज रस्त्याच्या कडेला बसून भीक मागू लागला. जे पैसे मिळतील ते जमा करू लागला. असं करता करता एक दिवस या भिकाऱ्याला रस्त्यातच मृत्यू आला. इकडे राजाने या भिकाऱ्याची अंतिम क्रिया करण्यासाठी माणसं पाठवली आणि त्याचं सामान गोळा करून आणायला सांगितलं. राजाने त्याला जी पेटी दिली होती ह्या पेटीला तळाशी मोठ्ठा चोरकप्पा होता. वरचा कप्पा रिकामा जरी असला तरी या आतल्या कप्प्यामध्ये भरपूर सोन्याची नाणी दिलेली होती. बिचारा दुर्दैवी भिकारी नीट न बघितल्यामुळे सोन्याच्या पेटीवर बसून आयुष्यभर त्याला भीक मागायला लागली. हे ऐकल्यानंतर त्या राज्यातल्या काही लोकांनी विचार केला की अशा प्रकारचे नशीब घेऊन जन्माला आलेले किती बरं लोक असतील? त्यांनी सर्वत्र आजूबाजूला शोधायला सुरुवात केली आणि त्यांना 99 टक्के लोक अशा सोन्याच्या पेट्यांवर बसून काही ना काहीतरी कमवतायेत किंवा भीक मागताहेत, दुसऱ्याकडे हात पसरताहेत, अशा प्रवृत्तीचे लोक जास्त प्रमाणात दिसले.
मोठ्या मोठ्या हुद्यावर काम करणारे, लाखो रुपये पगार मिळवतात, मोठी घरं घेतात, गाड्या घेतात पण दोनवेळा शांतपणे पोटभर अन्न खायलादेखील त्यांच्याकडे वेळच नसतो. घरी कृष्णासारखं बाळ असतं पण त्यांच्याशी खेळायला बोलायला आई बापाकडे वेळच नसतो. बाळाला जास्तीत जास्त वेळ पाळणाघरात ठेवायला बघतो.....खरं तर हे सगळे सोन्याचे क्षण आपल्या जवळच असतात. पण आम्ही मात्र भिकाऱ्यासारखं जगत असतो. उभ्या उभ्या हॉटेलचं अन्न वेळीअवेळी पोटात ढकलत असतो. घरात सगळे असूनसुद्धा कोणाशी संवाद साधू शकत नाही. हे सगळं दारिद्र्या घेऊन आम्ही सोन्यासारख्या लाखमोलाच्या क्षणांच्या पेटीवर बसून जगत असतो.....जमलं तर उघडा त्या पेट्या.....आणि नशीबात काय आहे ते ठरवा....