पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख उत्तर
सलग चार दिवस शस्त्रसंधीभंग, भारताचेही प्रत्युत्तर
► वृत्तसंस्था / श्रीनगर
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने सलग चार दिवस शस्त्रसंधीचा भंग करुन सीमावर्ती भागात गोळीबार चालविला आहे. मात्र, भारतानेही या गोळीबाराला आक्रमकणे चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना बंकरचा आश्रय घ्यावा लागला आहे. या शस्त्रसंधीभंगाचा प्रारंभ पाकिस्तानने प्रथम 24 एप्रिलच्या रात्री केला. तेव्हापासून अद्याप गोळीबार होत आहे. भारतानेही पाकिस्तानचे सर्व मनसुबे उध्वस्त करताना, जशास तसे प्रत्युत्तर पाकिस्तानला दिले आहे.
पाकिस्तानच्या लष्कराने पूंछ, अखनूर, सांबा, पहलगाम, अनंतनाग, बांदीपोरा आदी सीमावर्ती क्षेत्रांमध्ये सातत्याने गोळीबार चालविला आहे. भारतीय चौक्यांच्या दिशेने हा गोळीबार होत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत काही अंतरावरुन तो केला जात आहे. मात्र, या गोळीबारामुळे भारताची कोणतीही हानी झालेली नाही. भारतानेही आपल्या आघाडीवरच्या सैनिकांच्या माध्यमातून पाकिस्तानवर सतत प्रत्युत्तराचा गोळीबार चालविला आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंकडे जीवितहानी झालेली नाही, किंवा कोणीही जखमी झालेला नाही, अशी माहिती देण्यात आली.
पाकिस्तानच्या चौक्यांची हानी
भारताने प्रत्युत्तरात केलेल्या आक्रमक गोळीबारात पाकिस्तानच्या काही सीमावर्ती चौक्यांची हानी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानचा गोळीबार निष्प्रभ केला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पाकिस्तानकडून काही स्थानांवर उखळी तोफांचा भडिमारही केला गेला. तथापि, भारतानेही तसेच प्रत्युत्तर दिले. भारताने सीमावर्ती भागातील सर्व खेड्यांमधील नागरिकांना मागे हटविले आहे. पाकिस्ताननेही पाकव्याप्त काश्मीरातील लोकांना मागे हटण्याचा इशारा दिला आहे. सीमावर्ती भागांमध्ये सातत्याने गोळीबाराचा आवाज येत असून स्थानिकांनी या भागांमध्ये येणे बंद केले आहे. पेहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक करु नये, म्हणून पाकिस्तान सातत्याने गोळीबार करत आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. तथापि, भारताने मोठी कृती करण्याचा निर्धार केलाच असेल, तर त्याला केवळ गोळीबार करुन अडवता येणार नाही, असेही मत व्यक्त होत आहे.