Bedana Bajar Bhav: शेतकऱ्यांच्या बेदण्याला यंदा सोन्याचा भाव, रेकॉर्ड ब्रेक दर
यावर्षी ४०० पार केल्याने प्रतिवर्षी असाच भाव मिळावा, शेतकऱ्यांची अपेक्षा
By : रविकुमार हजारे
खंडेराजुरी : अबकी बार बेदाणा रेकॉर्ड ब्रेक ४०० रुपये सरासरी दर पार केला असून, यापुढेही बेदाण्याचे दर चढेच रहाण्याची शक्यता आहे. बेदाणा उत्पादनाच्या ३५ ते ४० वर्षाच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या बेदाण्याला सोन्याचा भाव मिळत असून बेदाणा उद्योग विश्वात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
चालूवर्षी प्रचंड पाऊस व दिवाळीनंतर पडलेल्या पावसामुळे बेदाणे उत्पादन कमी झाले. त्यातच रोगराई वाढल्याने फ्लॉवरिंग, पोंगा या स्टेजमध्ये मणी घळ होवून, कुज निर्माण होऊन अनेक बागा वाया गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांकडे द्राक्ष सुद्धा कमी लागले.
चालूवर्षी द्राक्ष कमी असल्याने डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये तसेच कुंभमेळा असल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष २०० ते ४०० रुपये पेटी इतका विक्रमी दराने विकला. गेले अनेक वर्षाचा इतिहास पाहता शेतकऱ्यांनी दीडशे ते दोनशे रुपये बेदाणा विकण्यापेक्षा द्राक्ष देण्यातच समाधान मानले.
दान कमी व द्राक्षाला मागणी मोठी असल्याने चांगला भाव आल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष विकून पैसे घेतले. ड्रायफूटमध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यात बेदाण्याला अत्यंत कमी भाव होता. तो यावर्षी ४०० पार केल्याने प्रतिवर्षी असाच भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
द्राक्षउत्पादक मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, अधणी, विजापूर, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षपिक्षा ५० टक्के बेदाणा उत्पादन कमी होईल, बागेत माल नाही असे रिपोर्ट दिले. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला फेब्रुवारी, मार्च महिन्यात दोनशे रुपये प्रति किलो बेदाणे विकत होता.
गेले दोन वर्ष शेतकऱ्यांनी शंभर ते दीडशे रुपये दर बघितल्याने २०० ते २५० रुपये प्रति किलो भावाने बेदाणा विकण्यात शेतकऱ्यानी धन्यता मानली. चालू वर्षी बेदाण्याची आवक किती होईल याचा अंदाज कोणालाही आला नाही. परंतु अंदाजे पंधरा ते सतरा हजार तर काही व्यापारी दहा ते बारा हजार गाडीच आवक आहे असे सांगत होते.
हंगामाच्या सुरुवातीला होळी व रमजाणचा सण असल्याने चार ते सहा हजार गाडी बेदाणा विकला असा अंदाज बांधला. पण बेदाण्याचा स्टॉक सांगली, तासगाव, विजापूर, पंढरपूर येथील कोल्ड स्टोरेज मध्ये चालू वर्षी किती आहे याचा अंदाज मात्र कोणालाच लागला नाही. पण सध्या पाच ते सहा हजार गाडीच बेदाणा शिल्लक असल्याचे बेदाण्यातील जाणकार व्यापारी सांगत आहेत.
बेदाण्याचा दर हळूहळू वाढत होता लहान खरेदीदार हवा तेवढाच माल घेऊन रवानगी करत होते. मात्र बेदाणा विश्वात तरबेज असणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्याना आवक किती आहे, याचा अंदाज आल्याने त्यांनी मार्केटमध्ये बेदाणा खरेदी करण्यास सुरुवात केली होती. पण खरेदी केलेला माल देशावर व्यापाऱ्यांना विक्रीसाठी गेला का? इथेच ठेवला याचाही अंदाज कोणाला आला नाही.
त्यामुळे स्टॉक किती शिल्लक आहे याचा ताळमेळ मात्र कोणालाच आला नाही. अनेक मोठे शेतकरी, व्यापारी सुद्धा यामध्ये गाफिल राहिले. मात्र तीनशे रुपये बाजार झाल्यानंतर अनेकांनी खरेदी करणे सुरू केले. चालू वर्षी बेदाण्याची आवक कमी आहे याचा अंदाज आल्याने बेदाणा असलेल्या शेतकयांना दोनशे, तीनशे, चारशे असा दर मिळाल्याने अक्षरशः दराची चांदी झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यापासून मात्र अबकी बार चारशे पारचा नारा बेदाणा व्यापार क्षेत्रात घुमू लागला होता. बुधवारच्या सांगली व गुरुवारच्या तासगाव सौद्यामध्ये मात्र बेदाणा उत्पादनाच्या ३५ ते ४० वर्षाच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक असा चारशे रुपये सरासरी भाव बेदाण्यास मिळू लागला आहे.
सध्या पुढे गणपती, नागपंचमी, दसरा, दिवाळी हे सण असल्याने बेदाणा उद्योग विश्वाच्या इतिहासातील चारशे रुपयेचा टप्पा पार केला असून यापुढेही चढेच दर मिळतील असे अनेक शेतकरी व व्यापारी अंदाज बांधत आहेत. सध्या देशावरील अनेक व्यापारी बेदाणा खरेदीसाठी सांगली, तासगाव बाजारपेठेत दाखल झाले असून सध्या पाच ते सहा हजार गाडीच (साठ हजार टन) बेदाणा शिल्लक असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
अद्याप आठ ते नऊ महिने नवीन बेदाणा येण्यासाठी अवकाश आहे. त्यातच उन्हाळ्यात जादा पाऊस झाल्याने द्राक्ष व बेदाणा उत्पादन पुढील वर्षी सुद्धा कमी येईल याबद्दल सुद्धा चर्चा होत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता यापुढे बेदाणादरात चढ-उतार सातत्याने राहील असे व्यापारी सांगत आहेत.
बेदाणा उत्पादनाच्या ३५ ते ४० वर्षाच्या इतिहासात चारशे रुपये सरासरी प्रति किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हे बेदाण्याचे सुवर्णवर्ष असल्याचे बोलत आहेत. हिरवा चांगला गोल बेदाणा-३७०ते ४६०. हिरवा मध्यम बेदाणा-३०० ते३५०. काळा बेदाणा-१३० ते १५०. सुंठेखानी लांब हिरवा बेदाणा -४००ते ४७० पिवळा बेदाणा-३०० ते ४००. असा उच्चांकी प्रति किलो सरासरी भाव मिळत आहे.
चालूवर्षी अवेळी पडलेल्या पावसामुळे दान उत्पादन कमी झाले. त्यामुळे बेदाण्यास सध्या सरासरी चारशे रुपये दर मिळत आहे. यापुढेही दर वाढणार असून शेतकयानी आपला बेदाणा सांगली मार्केट कमिटीत विक्रीसाठी आणावा, असे आव्हान सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार
चालूवर्षी पाऊस व रोगराईमुळे बेदाण्याचे उत्पादन कमी झाले असून देशभर गणपती, दिवाळी, दसरा सण असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात आहे. नवीन बेदाणा येण्यासाठी अद्याप आठ महिने बाकी असून अंदाजे सहा हजार गाडीच माल शिल्लक आहे. त्यामुळे यापुढे दर चढेच राहणार आहेत. चालूवर्षी शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार आहेत.
- सुशील हडदरे, संचालक, बेदाणा असोसिएशन)