हुंड्यात मिळाला पलंग
विवाहात ‘हुंडा’ घेणे ही कुप्रथा आपल्याकडे आजही काही प्रमाणात आहे. हुंड्यात पैशाशिवाय अनेक वस्तूही मागितल्या जातात. दिल्याही जातात. अशाच प्रकारे एका वधूने हुंडा म्हणून सासरी येताना लाकडी पलंग आणला. हा पलंग एखाद्या पेटीप्रमाणे दारे असलेला आणि चारी बाजूंनी बंद असा होता. तो घरात आणल्यानंतर वधूसाठी असलेल्या खोलीत ठेवण्यात आला. वधू सासरच्या घरात वावरण्याऐवजी रात्रंदिवस त्या पलंगावरच बसलेली असायची. याचे सासरच्यांना आश्चर्य वाटत होते. तथापि, यासंबंधीचे रहस्य जेव्हा बाहेर पडले, तेव्हा सासरच्यांना धक्काच बसला. हा प्रकारही असाच हादरवून टाकणार होता. वधूने या पलंगाच्या आत आपल्या प्रियकराला दडवून सासरच्या घरी आणले होते. पलंग पेटीप्रमाणे चारी बाजूंनी बंद असल्याने हा प्रकार प्रारंभी सासरच्या लोकांच्या लक्षात आला नाही.
या पलंगाच्या आत असलेल्या स्टोरेज बॉक्समध्ये या प्रियकारचे वास्तव्य काही काळ राहिले. वधू तेथेच त्याला जेवणखाण नेऊन द्यायची. रात्री साऱ्याची निजानिज झाली की त्याला ती बाहेर काढायची. कारण तो कायमचा ‘आत’ बसू शकत नव्हता. काही काळानंतर जेव्हा संशय येऊ लागला, तेव्हा या पलंगाची दारे उघडण्यात आली. आत तिचा प्रियकर आढळला. त्यामुळे सासरच्या मंडळींच्या संतापाला पारावार उरला नाही. या प्रियकारची लाठ्या काठ्यांनी धुलाई करण्यात आली. वधूचे काय झाले, याची माहिती नाही. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या प्रसारित होत आहे. त्याला लक्षावधी दर्शक मिळाले आहेत. अनेकांनी अनेक प्रतिक्रिया पोस्ट केल्या आहेत. काहींनी या व्हिडीओच्या खरेपणासंबंधीही शंका व्यक्त केली आहे. असे कसे शक्य होईल, असा त्यांचा प्रश्न आहे. तथापि, या व्हिडीओची सध्या धूम चालली आहे.