‘सुंदर’ तो ‘वॉशिंग्टन’ !
भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं एक वैशिष्ट्या राहिलंय ते खालच्या फळीच्या जबरदस्त प्रतिकाराचं. याकामी रवींद्र जडेजाबरोबर चौथी कसोटी वाचविताना प्रभावी योगदान दिलं ते वॉशिंग्टन सुंदरनं...फलंदाजीबरोबर फिरकी माऱ्यात उपयुक्त ठरणाऱ्या या खेळाडूनं संघ व्यवस्थापनाचा त्याला पसंती देण्याचा निर्णय सार्थ ठरविलाय...
चौथ्या कसोटीत भारत बचावला तो ‘त्यानं’ झळकावलेल्या नाबाद 101 व सध्या अप्रतिमरीत्या झुंजणाऱ्या रवींद्र जडेजाच्या नाबाद 107 धावांच्या खेळीमुळं...त्यांनी पाचव्या यष्टीसाठी केली ती 203 धावांची ‘गेमचेंजर’ भागीदारी...‘त्याची’ गेल्या ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आपल्या भूमीवर झालेल्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली तीच अनपेक्षितरीत्या. ‘त्यानं’ त्यापूर्वी तामिळनाडूचं प्रतिनिधीत्व करताना रणजी चषक स्पर्धेत दिल्लीला दिला होता तो 152 धावांचा ‘प्रसाद’...विशेष म्हणजे तो राज्यासाठी फलंदाजी करतोय ती तिसऱ्या क्रमांकावर...नाव : वॉशिंग्टन सुंदर...
रणजी स्पर्धेतील त्या डावानंतर वॉशिंग्टननं म्हटलं होतं, ‘खरं सांगायचं झाल्यास मी स्वत:ला वरच्या क्रमांकावर खेळणारा फलंदाजच समजतोय. भविष्यात सुद्धा नेहमी चांगल्या कामगिरीचं दर्शन सातत्यानं घडविण्याचा प्रयत्न करेन’...न्यूझीलंडनं त्या मालिकेत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारताला झोडपल्यानंतर गडबडलेल्या निवड समितीनं ऑफस्पिनर म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली होती. त्यानंतर एका महिन्यानं पर्थ कसोटीत जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला तेव्हा त्याला मिळालं होतं ते आर. अश्विन नि रवींद्र जडेजापेक्षाही वरचं स्थान. सध्या चालू असलेल्या इंग्लंडच्या दौऱ्याचा विचार केल्यास वॉशिंग्टनला दुसऱ्या कसोटीसाठीच्या अंतिम 11 खेळाडूंत स्थान प्राप्त झालं ते त्याच्या गोलंदाजीपेक्षाही फलंदाजीच्या चांगल्या क्षमतेमुळं...
कुलदीप यादवला स्थान मिळावं म्हणून विश्लेषकांचा आरडाओरडा चालूच होता, तरीही सुंदरला दुसरा ‘स्पिनर’ बनविण्यात आलं. चौथ्या कसोटीत त्यानं टीकाकारांना छान उत्तर दिलंय ते पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना. तो व रवींद्र जडेजा यांच्या भागीदारीमुळंच भारताला मालिकेत टिकून राहणं शक्य झालंय...वॉशिंग्टन सुंदर ठरलाय मँचेस्टरवर कारकिर्दीतील पहिलं शतक फटकावणारा दुसरा भारतीय खेळाडू. विशेष म्हणजे 1990 साली महान सचिन तेंडुलकरनं सुद्धा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं ते तिथंच....वॉशिंग्टननं इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांना चेंडू उसळत असताना संयमानं, तंत्राचा उपयोग करत ज्या पद्धतीनं तोंड दिलंय ते अत्यंत कौतुकास्पद. याचा अर्थ त्यानं कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच व्यवस्थित फलंदाजी केलीय असा मात्र अजिबात नव्हे...
वॉशिंग्टन सुंदरनं ऑस्ट्रेलियातील गब्बावर 2021 साली कारकिर्दीतील पहिल्याच कसोटी सामन्यात नोंद केली होती ती अर्धशतकाची. खेरीज इंग्लंडलाही भारताच्या भूमीवर खेळताना त्यानं नाबाद 96 धावांची खेळी करत आपल्या क्षमतेची चुणूक दाखविली होती. त्याची कसोटीतील सरासरी 40 हून जास्त असली, तरी मँचेस्टवर चौथ्या सामन्यात त्याच्यापुढं आव्हान उभं होतं ते वेगळ्या प्रकारचं. सुंदरला संघ व्यवस्थापनानं फलंदाजी करण्याची संधी दिली ती पाय मोडलेल्या रिषभ पंतच्या क्रमांकावर. या पार्श्वभूमीवर त्याला त्याची कुवत सिद्ध करणं अत्यंत गरजेचं बनलं होतं आणि त्यानं ते चोखपणे केलं देखील...
खेरीज वॉशिंग्टन सुंदरनं इंग्लिश फलंदाजांचे बळी खिशात घातल्यानं कुलदीप यादववरचा दबाव वाढण्यास प्रारंभ झालाय. प्रशिक्षक गौतम गंभीरच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, ‘तो सध्या खराच छान खेळतोय. काही वेळा पाळी येते ती संघात सात वा आठ फलंदाजांचा समावेश करण्याची अन् सर्वांनाच संधी देणं शक्य होत नाहीये. रिषभच्या अनुपस्थितीत आम्ही निर्णय घेतला तो ‘विशी’ला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्याचा. जाळ्यात सराव करताना खुद्द वॉशिंग्टनलाही त्याच्या ‘फॉर्म’ची चांगलीच कल्पना होती’...त्यानं लॉर्ड्स कसोटीत चार प्रतिस्पर्धी फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला आणि भारतासाठी दार उघडलं...
संघ व्यवस्थापनानं वॉशिंग्टन सुंदरचं वर्णन ‘दुसरा फिरकी गोलंदाज’ आणि ‘आठव्या क्रमांकावर धावा काढण्याची क्षमता असलेला फलंदाज’ असं केलंय...पत्रकारांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणतो, ‘संघासाठी योगदान देणं हे माझं काम आणि ते मी प्रामाणिक पद्धतीनं करतोय. मला प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका देण्यात आलीय आणि ती मी पार पाडलीय. कसोटी क्रिकेट उत्साहवर्धक ठरतंय ते त्यामुळंच’...वॉशिंग्टनला भारतीय संघाचा नवा ‘सुंदर’ चेहरा असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. तो कारकिर्दीला प्रारंभ झाल्यानंतर कित्येक संस्मरणीय कसोटी सामने खेळलाय. एक मात्र खरं की, भविष्यात त्याला संघातून वगळताना निवड समितीला किंवा संघ व्यवस्थापनाला किमान दहा वेळा विचार करावा लागेल !
वेगळ्या नावामागची रंजक कहाणी...
- वॉशिंग्टन सुंदरचे वडील एम. सुंदर हे स्वत: एक क्रिकेटपटू. पण तामिळनाडूच्या अंतिम संघात ते स्थान मिळवू शकले नाहीत. त्यांना किकेटचं प्रेम जोपासण्याकामी मोलाची मदत केली ती पी. डी. वॉशिंग्टन या व्यक्तीनं...वॉशिंग्टन हे क्रिकेटचे मोठे चाहते आणि सुंदर यांचा खेळ त्यांना आवडायचा. त्यांनी शालेय पुस्तके खरेदी करून, शाळेची फी भरून आणि क्रिकेटचं साहित्य देऊन त्यांना मोलाची मदत केली...
- 1999 मध्ये पी. डी. वॉशिंग्टन यांचं निधन झालं. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये सुंदर यांना मुलगा झाला. वॉशिंग्टन यांच्याशी इतकं जवळचं नातं निर्माण झालेलं असल्यानं त्यांनी मुलाला आपल्या ‘गॉडफादर’चं ‘वॉशिंग्टन’ हे नाव देण्याचा निर्णय घेतला...
आरंभीचा प्रवास...
- वॉशिंग्टन सुंदरनं 17 वर्षं पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तमिळनाडूतर्फे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ते बांगलादेशमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताकडून प्रभावी कामगिरी केल्यानंतर...
- त्यानं आपल्या कारकिर्दीची सुऊवात केली होती ती डावखुरा फलंदाज म्हणून. परंतु त्यानं भारताचे माजी ऑफस्पिनर एम. वेंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली ऑफस्पिनवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आणि शिस्तबद्ध गोलंदाज म्हणून ओळख मिळवली....
- उजव्या हातानं ऑफस्पिन टाकण्याची कला विकसित केल्यानं त्याचं मूल्य वाढलं. या प्रक्रियेत त्यानं पाऊल ठेवलं ते रविचंद्रन अश्विनच्या पावलांवर...
‘आयपीएल’ ते भारतीय संघ...
- वॉशिंग्टन सुंदरची भरारी सुरू झाली ती ‘इंडियन प्रीमियर लीग’पासून. 2017 मध्ये जेव्हा अश्विनला ‘आयपीएल’मधून बाहेर पडावं लागलं तेव्हा तत्कालीन रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं पर्याय म्हणून त्याला संघात घेतलं. त्या स्पर्धेत पुण्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचून एका धावेनं पराभूत झाला...
- वॉशिंग्टनचा त्यावेळी ‘इकोनॉमी रेट’ स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक राहिला...शिवाय ‘प्लेऑफ’मधील पहिल्या ‘क्वालिफायर’मध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावताना मुंबई इंडियन्सविऊद्ध घेतले 16 धावांत 3 बळी...
- वॉशिंग्टन सुंदरला त्याचं फळ मिळून त्या वर्षाच्या अखेरीस श्रीलंकेविऊद्ध एकदिवसीय नि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली...18 वर्षं आणि 80 दिवस वयासह त्यावेळी तो भारतीय ‘टी-20’ संघात पाऊल ठेवणारा सर्वांत तऊण खेळाडू बनला होता. या प्रकारात त्यानं चांगली कामगिरीही केली....
कसोटीत पाऊल...
- वॉशिंग्टन सुंदरचं कसोटी पदार्पण हे आश्चर्यकारकच होतं. तो खरं तर 2020-21 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात गेला होता ‘नेट बॉलर’ म्हणून. परंतु गाब्बावरील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी त्याची संघात वर्णी लागली ती पुन्हा एकदा अश्विनच्या जागी...
- त्या सामन्यात वॉशिंग्टननं गोलंदाजी व फलंदाजीतही चमक दाखवली. त्याचा पहिला कसोटी बळी ठरला तो स्टीव्ह स्मिथ...नंतर भारत पहिल्या डावात संघर्ष करत असताना त्यानं पदार्पणात अर्धशतक झळकावलं...दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नरला बाद करण्याबरोबर भारताच्या प्रसिद्ध मालिका विजयात योगदान देताना महत्त्वपूर्ण 22 धावा जोडल्या...त्यानंतर त्याला संघर्ष करावा लागला तो फिटनेस आणि खराब फॉर्ममुळं..
दणक्यात पुनरागमन...
- तीन वर्षांहून अधिक कालावधीनंतर वॉशिंग्टन सुंदरचं कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं ते गेल्या वर्षी. ऑक्टोबरमधील न्यूझीलंडविऊद्धच्या पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीच्या संघात त्याची निवड झाली आणि किवींच्या पहिल्या डावात 59 धावांत 7 बळी घेऊन त्यानं कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. शिवाय प्रथमच नोंद केली ती एका कसोटी 10 बळी घेण्याच्या पराक्रमाची...
- व 2024 मधील ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं पाचपैकी तीन कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला, मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीत नितीशकुमार रे•ाrसोबत खालच्या फळीतील प्रतिकारात लक्षणीय योगदान देताना त्यानं 50 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातील आघाडी कमी करताना या दोघांनी केली ती 127 धावांची भागीदारी...तथापि, मालिकेत वॉशिंग्टन सुंदरचा एकूण प्रभाव मर्यादित राहिला. त्यानं सहा डावांमध्ये 22.80 च्या सरासरीने 114 धावा केल्या आणि त्यला 38.66 च्या सरासरीनं फक्त तीन बळी मिळविता आले...
- राजू प्रभू