छत्रपती शिवाजी चौकात सुशोभिकरण काम जोरात
उचगाव ग्रामपंचायतीकडून विविध विकासकामे सुरूच : आसन व्यवस्था, दिव्यांची सोय
वार्ताहर /उचगाव
उचगाव ग्रामपंचायतीच्या विकास कामांची घौडदोड सातत्याने सुरूच आहे. वेगवेगळे उपक्रम ग्रामस्थांच्या सोयीसाठी राबवत अनेक योजना सातत्याने करण्याची एक कल्पकता ग्रामपंचायतमधून राबवली जात आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ग्रामपंचायतीने सुशोभिकरणाचा विडाच उचलल्याचे दिसून येत आहे. चौकामध्ये असलेल्या दुभाजकाच्या बाजूने नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या घालून आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नवीन बांधलेल्या बसस्थानकामध्ये खुर्च्या घालून प्रवाशांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिक इतरत्र कुठेही बसत होते व सायंकाळी फिरायला आलेल्यानांसुद्धा या खुर्च्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे. तसेच दुभाजकाच्या मधोमध लाईट व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळी नागरिकांनासुद्धा या ठिकाणी आराम बसण्यासाठी व्यवस्था होणार आहे. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौक हा सुशोभिकरण करण्याचे पंचायतीने ठरवलेले होते. त्याप्रमाणे त्याची पूर्तता करण्यात येत आहे. हे बसस्थानक व दुभाजकाच्या दोन्ही बाजूने बसण्यासाठी आसन व्यवस्था केल्याने नागरिकांतून समाधान पसरले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण केल्याने ग्रा.पं.सुद्धा अभिनंदन होत आहे. या कामासाठी ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.