विद्यार्थीनी मारहाण : पोलीस स्थानकावर मोर्चा
संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली, चौकशी होणार : शिक्षिका, मुख्याध्यापिका, अन्यांची आज होणार जबानी
कुंकळ्ळी : वेरोडा-कुंकळ्ळी येथील एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या भांडणात तिसरीची विद्यार्थीनी जबर जखमी होण्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद काल बुधवारी सायंकाळी उमटून त्या विद्यार्थिनीचे पालक, कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी व इतर लोकांनी कुंकळ्ळी पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन पोलिसांना कारवाई न केल्याबद्दल धारेवर धरले. तपास अधिकारी कविता राऊत यांना याप्रकरणी निलंबित करण्याची तसेच पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी लावून धरली. शाळेच्या मुख्याध्यापिका दोरोती फर्नांडिस व वर्गशिक्षिका लेजिमा रिबेलो यांना पोलीस स्थानकावर आणून जबानी नोंदविण्याची मागणी केली. सायंकाळी 4 वा. मोर्चा घेऊन लोक हजर झाले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सुनीता सावंत, नुकतेच अधीक्षकपदी बढती मिळालेले संतोष देसाई तसेच माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मामलेदार प्रताप नाईक गावकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन मोर्चातील लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि कारवाईचे आश्वासन दिले. असे असले, तरी रात्री उशिरापर्यंत लोक पोलीस स्थानक परिसरात ठाण मांडून होते.
पोलिसांची बदली करुन होणार चौकशी
शेवटी विद्यार्थीनीच्या कुटुंबियांपैकी काहींना पोलीस अधिकांऱ्यांनी चर्चेस बोलावले. चर्चेनंतर कविता राऊत यांची राखीव पोलीस दलात बदली करून चौकशी करण्यात येईल तसेच पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियश यांचीही बदली करून चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर मोर्चातील लोकांचे काही अंशी समाधान झाले. वेरोडा-कुंकळ्ळी येथील सेंट अँथनी हायस्कूल या खासगी शाळेतील विद्यार्थ्यांमधील किरकोळ भांडणात इयत्ता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थीनी स्वरा फातर्पेकर ही जबर जखमी होऊन तिच्या मेंदूत रक्त गोठण्याचा प्रकार घडला आहे. या विद्यार्थिनीवर गोमेकॉत शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा दावा करून कुंकळ्ळी पोलीस स्थानकावर बुधवारी सायंकाळी हा मोर्चा नेण्यात आला.
तपास अधिकाऱ्यावर रोष
या प्रकरणात तपास अधिकारी उपनिरीक्षक कविता राऊत यांनी अक्षम्य टाळाटाळ केली असून आठ दिवस त्यांनी गुन्हा नोंद केला नाही. यासंदर्भात विचारणा केल्यास सारवासारव करणारी उत्तरे देण्यात येऊन शिक्षण खात्याला, हायस्कूलला कळविण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. शेवटी मोर्चा येणार असल्याची कुणकूण लागल्यानंतर बुधवारी दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला, असा दावा करून मोर्चातील लोकांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. मोर्चावेळी देखील कविता राऊत यांचे वर्तन उचित नव्हते, असा दावाही करण्यात आला. तसेच कुंकळ्ळीच्या पोलीस निरीक्षकांवरही कारवाई मागणी उचलून धरण्यात आली. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिका यांना हजर करण्यात यावे व त्यांची जबानी सर्वांसमक्ष नोंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
रास्ता रोकोपासून केले परावृत्त
तत्पूर्वी मोर्चा पोलीस स्थानकावर आल्यानंतर लोकांनी आम्हाला न्याय पाहिजे अशा घोषणा दिल्या. यावेळी मोर्चात जवळपास 500 लोकांचा सहभाग होता. काही पोलिसांनी त्यातील लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण लोक काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी दोन वेळा रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. पण या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर दाखल झालेले पोलीस अधिकारी संतोष देसाई यांनी त्यांची समजूत काढली व रास्ता रोको करण्यापासून परावृत्त केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून लोकांची मागणी त्यांच्या कानी घातली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संतोष देसाई यांच्याशी बोलून दिलेल्या निर्देशानुसार, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेला आणण्यास पोलिसांना पाठविण्यात आले. पण सदर पोलीस ती सापडली नसल्याने हात हलवत परतले.
यावेळी फातर्पेकर कुटुंबियांपैकी एकाने सदर मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेने चुकीचे पत्ते दिलेले असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास संपर्कही होत नाही, असा दावा केला. त्यानंतर अधीक्षक सुनीता सावंत यांनी दाखल होऊन लोकांशी संवाद साधला. लोकांची मागणी ऐकून घेऊन त्यांनी काही वेळ मागून घेतली. नंतर तपास अधिकारी कविता राऊत व पोलीस निरीक्षकाविरुद्ध चौकशीची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच त्यांची बदली करण्यात येईल असे स्पष्ट केले. ही माहिती अधीक्षक सावंत, संतोष देसाई यांच्यासमवेत फातर्पेकर कुटुंबियांपैकी काहींनी जमलेल्या लोकांना दिली. सदर कुटुंबियांनी पोलीस अधिकाऱ्यांचे तसेच जमलेल्या लोकांचे आभार मानले.
यावेळी सदर मुलीचे वडील शशांक फातर्पेकर, काका शोकीन, काकी सपना, आत्या सुश्मिता, आजी शर्मिला तसेच बाळ्ळी सरपंच गोविंद फळदेसाई, पंच नमिता फळदेसाई, फातर्पा सरपंच शीतल नाईक, उपसरपंच मेदिनी नाईक, पंच महेश फळदेसाई, मनीषा नाईक देसाई, केपे भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, शैलेंद्र फळदेसाई, विराज देसाई, नीतू कुऱ्हैकर, प्रदीप नाईक, शोभना फळदेसाई, सुरेंद्र फळदेसाई, स्मिता देसाई, समीर बाळ्ळीकर, व कुंकळ्ळी, बाळ्ळी, फातर्पातील अन्य लोक, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक, पालक-शिक्षक संघटनेचे सदस्य हजर होते. त्यांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार केला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा हजर होता.
शाळेच्या प्रचंड हलगर्जीपणाचा घटनाक्रम
स्वरा या विद्यार्थिनीला मारहाण होऊन गंभीर इजा होऊनही वेळीच तिच्याकडे लक्ष देण्यात आले नसल्याचा व तिच्याबाबतीत शिक्षकवर्गाकडून प्रचंड हलगर्जीपणा करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला. ती अगोदर रडत होती, नंतर वर्गखोलीत निपचित पडली होती. तशाही स्थितीत वर्गात शिक्षिकेकडून शिकवणे चालूच होते. एका विद्यार्थ्याने हा प्रकार शिक्षिकेच्या नजरेस आणूनही तिने फारशी दखल घेतली नाही. आपल्या मुलाला परीक्षेस का बसू दिले गेले नाही, याची चौकशी करण्यासाठी आलेल्या एका मातेने स्वराची स्थिती बघून तिच्या बाहेर उभ्या असलेल्या आईला कळविले. त्यानंतर स्वराला आईने व अन्य उपस्थित पालकांनी बाहेर आणले. त्यावेळी तिला पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असता ती बेशुद्ध होऊ लागली. मग प्रयोगशाळेतून बाहेर आलेल्या एका व्यक्तीला सांगून तिला कुंकळ्ळीला नेण्यात आले, असे उपस्थित पालकांकडून सांगण्यात आले. हा प्रकार घडल्यानंतर काही पालक-शिक्षक संघटनेच्या सदस्यांना फुटेज दाखविण्यासाठी बोलावले होते. त्यात दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मारहाण झाल्याचे स्पष्टपणे दिसते. तसेच दीड वाजेपर्यंत कुणीच दखल घेतली नाही हेही स्पष्ट होते. शाळेने केलेला हा हलगर्जीपणा असून यावर कारवाई ही व्हायलाच हवी, असे यावेळी सांगण्यात आले.