सह्याद्रीत अस्वल-मानव संघर्ष टोकाला
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये पसरलेल्या सह्याद्रीत आजच्या घडीला अस्वले आणि त्या परिसरातील मानवी समाज यांच्याशी संघर्ष सुरू झालेला असून काही ठिकाणी हा संघर्ष टोकाला गेलेला आहे. एकेकाळी पश्चिम घाटातील जंगले अस्वलासाठी पोषक नैसर्गिक अधिवास ठरली होती, परंतु गेल्या पाव शतकापासून एकेकाळी अस्वले आणि अन्य जंगली श्वापदांशी सौहार्दाचे असलेले मानवी समाजाचे संबंध बऱ्याच प्रमाणात बिघडलेले असून, त्यांच्या नैसर्गिक अधिवासावरती शेती-बागायती पिकांच्या लागवडीबरोबर विकासाचे प्रकल्प कार्यान्वित झाल्याने गदा आलेली आहे.
गेल्या कित्येक शतकापासून पाहता पश्चिम घाटातील जंगले ही अस्वलासाठी पोषक ठरली होती. पण सध्याला जंगली प्राण्यांशी असलेले सौहार्दाचे मानवी संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे पर्यावरणीय संतुलन विस्कळीत होऊन अन्य जंगली जनावरांच्या तुलनेत अस्वले माणसांवरती प्राणघातक हल्ले करण्याच्या प्रकरणात वाढ होऊ लागली आहे.
अस्वले भारतात, त्याचप्रमाणे श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेशातल्या जंगलात आढळतात. भारतात अस्वले मोजक्याच ठिकाणी आढळत असली तरी त्यांची संख्या पश्चिम घाटातील जंगलात लक्षणीय एकेकाळी होती. कर्नाटक सरकारने गेल्या तीन दशकांपासून अस्वलांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचललेली असून, भारतातले पहिले संरक्षित जंगल क्षेत्र हंपी जागतिक वारसा स्थळापासून जवळच असलेल्या बळ्ळारी जिह्यातील दारोजी अभयारण्याच्या रूपात सुरू केले.
त्यानंतर विजयनगर जिह्यातील गुडेकोट येथेही खास अस्वलांसाठी अभयारण्य निर्माण केले. भारतात पूर्वी मोगल राज्यकर्त्यांनी कलंदर जमातीमार्फत सुरू असलेल्या अस्वलांच्या पारंपरिक खेळाला राजाश्रय दिला आणि त्यामुळे शेकडो अस्वलांच्या बछड्यांना लहानपणापासून नाकात दोरी घालून माणसांचे मनोरंजन करण्यासाठी भाग पाडले. या अघोरी खेळावरती ‘विश्व प्रकृती निधी’ या संस्थेच्या जागृती मोहिमेमुळे शेवटी कालंधरमार्फत अस्वलाच्या खेळावरती कायद्याने बंदी घालण्यात आली. त्यामुळे अनाथ आणि असाहाय्य ठरलेल्या असंख्य अस्वलांना बंधनमुक्त करत त्यांची रवानगी बन्नेरघट्टा पुनर्वसन केंद्रात करण्यात आली. गुजरातेत तेथील सरकारने अस्वलांसाठी जेसोर अभयारण्य निर्माण केले.
परंतु असे असले तरी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि घाटमाथ्यावरच्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासावरती शेती-बागायती आणि मानवी लोकवस्ती, पायाभूत सुविधा यांच्या विस्तारामुळे असंख्य संकटे निर्माण झालेली आहेत. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यातल्या सह्याद्रीच्या क्षेत्रात त्यांच्या अस्तित्वावरती अतिक्रमण वाढत चालले आहे. अस्वलाच्या मुख्य अन्नाच्या स्रोतांवरती मानवी समाजाचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकेकाळी मधाची पोळी आपल्या अन्न, औषध या गरजेसाठी वापरायचा परंतु आज बाजारपेठेत नैसर्गिक मधाच्या विक्रीतून चांगली कमाई होत असल्याने, माणसे उंच वृक्षांवर चढून मधाच्या पोळ्यांवरती डल्ला मारताना पशु-पक्षी यांचे विस्मरण होत असल्याने अस्वले आणि माणूस यांच्यातला संघर्ष वाढू लागला आहे.
कर्नाटकाच्या खानापूर तालुक्यातल्या जंगलांच्या आसपास असलेल्या बऱ्याच गावांत हा संघर्ष गेल्या दशकभरात विकोपाला गेलेला आहे. माण या गावात ज्यावेळी रुपवती वरंडेकर या महिलेचा अस्वलाच्या हल्ल्यात जेव्हा मृत्यू झाला तेव्हा जर योग्य उपाययोजना केल्या असत्या तर या परिस्थितीत काही अंशी बदल झाला असता. फणस, जांभूळ आणि अन्य रानमेवा जेव्हा आततायीपणे ओरबाडण्यास सुऊवात केली तेव्हापासून हा संघर्ष वाढत गेलेला आहे.
एकेकाळी मोसमी रानमेव्याचा आस्वाद घेताना जंगलात वास्तव्यास असणाऱ्या लोकसमूहाने सगळीच फळे-फुले, कंदमुळे, पाने काढताना त्यांचे समूळ उच्चाटन केले नव्हते. आपल्याबरोबर जंगलात असणाऱ्या पशु-पक्ष्यांचा त्यांनी विचार केला होता. त्यांनाही आस्वाद घेता यावा म्हणून जैविक संपदेचा विवेकपूर्णतेने आस्वाद घेण्यास प्राधान्य दिले होते. अस्वले प्रामुख्याने शाकाहारी असली तरी वाऊळातल्या वाळवीचा आवडीने फडशा पाडतात. फळे-फुले, मध, मासेही अस्वले आवडीने खातात. शिशिर ऋतूत मादी अस्वल एक-दोन पिल्लांना सात ते नऊ महिन्यांच्या काळानंतर जन्म देतात आणि पिल्लांना आपल्या पाठीवर बसवून सुमारे तीन वर्षे फिरवतात. या काळात त्यांच्यासमोर एखादा माणूस आला तर अस्वल आक्रमक होऊन, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करते. बऱ्याच वेळेला पूर्ण चेहरा विद्रुप करून, त्याला निघृणपणे ठार करण्यास मागे-पुढे पाहत नाही. गोव्यात सांगेच्या नेत्रावळी, सत्तरीत म्हादई अभयारण्यात केलेल्या हल्ल्यात माणसे सुदैवाने वाचलेली आहेत. या मोसमात महाराष्ट्रात मांगेली, कर्नाटकात माण, चिगुळे येथे जे हल्ले झालेले आहेत, त्यात माणसे जखमी झालेली आहेत.
बेळगाव जिह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या जंगल परिसरात अस्वलाच्या प्राणघातक हल्ल्यात शेतकऱ्यांना मृत्यू आलेले आहेत. पारवड, चोर्ला त्याचप्रमाणे अन्य जंगल परिसरातील गावांमध्ये आजच्या घडीला, अस्वले आक्रमक होऊन, माणसांवरती प्राणघातक हल्ले करीत असल्याची जी प्रकरणे वाढली आहेत, त्याला नैसर्गिक अधिवास संकटग्रस्त होण्याबरोबर, अन्न, पाणी यांचे स्रोत दुबळे झाल्याने, त्यांच्या प्राप्तीसाठीचा संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिह्यात तर सौहार्दाचे संबंध बिघडलेले असून, अन्न-पाण्यासाठी अस्वलांनी लोकवस्तीकडे आपला मोर्चा वळविल्याने त्यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
भारतातील पश्चिम घाटातल्या सुमारे 61 टक्के क्षेत्रात अस्वले आढळत असून, महाभारत महाकाव्यात ज्या जांबुवंतचा उल्लेख राम सेनेत येतो, तो लोककथांनुसार गोवा-बेळगाव मार्गावरच्या जांबोटीतून तुंगभद्रा नदीवरच्या किष्किंधा नगरीत गेला होता. जांबोटी हे ग्राम नाम जंबू हट्टी म्हणजे अस्वलांच्या वास्तव्याने समृद्ध होते. म्हादई-परंतु मलप्रभा नदी खोऱ्यातला जांबोटी घाट आणि परिसरातले जंगल अस्वलांसाठी नावाऊपास आला होता. परंतु इमारती आणि इंधनाच्या लाकडांसाठी जंगलतोड मोठ्या प्रमाणात ब्रिटीश राजवटीत आणि स्वातंत्र्यानंतर झाल्याने अस्वलांचा अधिवास उद्ध्वस्त झाला. आजही जांबोटीत जंगलांची अपरिमित तोड चालू असून आगामी काळात हा अस्वल-मानव यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.
भीमगड-म्हादई अभयारण्यांच्या परिसरात नानाविविध कारणांसाठी जंगलतोड चालू आहे. कळसा, भांडुरा, हलतरा, सुर्ला व अन्य प्रस्तावित प्रकल्पांमुळे या परिस्थितीत आणखी वाढ होणार आहे. विकासाच्या गोंडस मृगजळामागे धावताना आम्ही ज्याप्रकारे जंगलतोड करीत आहोत, ही भयावह बाब आहे. वन विभागाच्यावतीने व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने अस्वले व अन्य जंगली जनावरांमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याची तेथील लोकांची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे. राखीव जंगल क्षेत्राबरोबर खासगी जंगल आणि देवराया यांना प्राधान्यक्रमाने संरक्षण देणे गरजेचे आहे.
- राजेंद्र पां. केरकर