महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोदींचे लुटारू सरकार घालविण्यासाठी कटीबद्ध व्हा : प्रकाश आंबेडकर

04:13 PM Nov 30, 2023 IST | Abhijeet Khandekar
Prakash AmbedkarPrakash Ambedkar
Advertisement

वंचित बहुजन आघाडीची भर पावसात सांगलीत विराट सभा : मोदी सरकारवर आंबेडकर यांचा घणाघाती हल्ला : सांगलीतून खासदार निवडून आणण्याचा निर्धार

सांगली प्रतिनिधी

केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार हे लुटारूंचे सरकार असून जीवनावश्यक वस्तुंचा कृत्रिम तुटवडा करून सर्वसामान्यांना लुटण्याचा नवीन फंडा सरकारने सुरू केला आहे. मागील दहा वर्षात आरएसएस आणि भाजप यांचा हिशोब मांडण्यास सुरूवात केली पाहिजे. लुटारूंचे सरकार सत्तेत ठेवायचे का असा प्रश्न निर्माण झाला असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लुटारूंचे सरकार घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार व्यक्त करत, मोदी सरकारला घालविण्यासाठी लोकांनी कटीबद्ध रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Advertisement

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगलीत सत्ता संपादन निर्धार रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन केले होते. बुधवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर भर पावसात झालेल्या विराट सभेत प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. येत्या दोन तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असून यानिमित्ताने भाजपाच्या दहा वर्षाचा हिशोब आम्ही जनतेसमोर मांडणार आहे. सत्तेचा वापर केंद्रातील सरकारने लुटण्यासाठी केला. असा आरोप करून आंबेडकर म्हणाले, टोमॅटोसारख्या वस्तूमध्ये व्यापारी आणि सरकार यांनी संगनमताने भाव वाढवून देशभरात सुमारे 35 हजार कोटीची लूट केली. आज टोमॅटोत लूट केली उद्या कडधान्याची भाववाढ करून लोकांना लुटतील. या सरकारला घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

Advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासमोर स्वत:ची बेअब्रू करून घेणारा मोदी हा भित्रा माणूस आहे. दहा वर्षात त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. ते सभेतून लोकांसमोर काहीही फेकू शकतात पण, पत्रकारांना ते सामोरे जाऊ शकत नाहीत. छप्पन इंच छाती असणाऱ्या मोदींच्या कारकीर्दीत अनेक सैनिक मारले गेले. आपल्या शेजारी पाकिस्तान हा भिकारी झालेला देश आहे. त्यांच्या घुसून मारण्याची हिंमत मात्र सरकारमध्ये नाही. लाल किल्ल्यावरून भाषण केलेल्या आजपर्यंतच्या इतर पंतप्रधानांपेक्षा मोदींनी केवळ स्वत:चीच पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला आहे. 1950 ते 2014 या कालावधीत देशातून 7644 कुटुंबांनी परकीय नागरिकत्व स्वीकारले तर 2014 ते 2023 या कालावधील पन्नास कोटीवर मालमत्ता असणाऱ्या 14 लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडून परकीय नागरिकत्व स्वीकारले. ही शरमेची बाब असून तुम्ही कशाला हिंदु राष्ट्राच्या गप्पा मारता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मोदींना कशाची भीती वाटते, लोकांनी आता या सरकार विरोधात रान उठवण्याची आवश्यकता असून वंचितच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दहा मताची जुळणी केली तर येणाऱ्या निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी वंचितच्या डॉ. क्रांति सावंत यांनी पक्षाचे खासदार, आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. इम्तियाज नदाफ म्हणाले, वंचित हा 24 कॅरेटचा पक्ष असून संविधान टिकवण्यासाठी मुस्लीम समाजाने कुठल्याही अमिषाला बळी न पडता वंचितच्या पाठीशी रहावे, मुस्लिमांची 11 टक्के आणि वंचितची सहा टक्के अशी मते एकत्रित केली तर आपण 30 ते 35 आमदार निवडून आणू.

संतोष सूर्यवंशी म्हणाले, आरक्षणावरून सध्या समाजामध्ये तेढ निर्माण झाली आहे. पण, विविध समाज घटकांना आरक्षण देण्याचे काम फक्त प्रकाश आंबेडकरच करू शकतात. दीशाताई पिंकीशेख म्हणाल्या, शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण केले जात असताना आरक्षणाचा उपयोग काय मुस्लीम समाजाने सावध व्हावे. सोमनाथ साळुंखे म्हणाले, आरक्षणावरून छगन भुजबळ यांनी ढोंग बंद करावे खरा जातीवंद ओबीसी नेता हा प्रकाश आंबेडकरच आहे. आम्ही भाजपबरोबर कदापि जाणार नाही. यावेळी जयसिंगराव शेंडगे, नितीन सोनवणे, राजेश गबाळे, अमोल लांडगे यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी इरफान केडिया, मुलाणी, रूपेश तामगावकर, किरणराज कांबळे, इंद्रजीत घाटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिपू सुलतानच्या फोटोचे पुजन
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याहस्ते टिपू सुलतान यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भर पावसात सभा
सभेची वेळ दुपारी दोनची होती. पण, प्रकाश आंबेडकर यांचे आगमन दुपारी तीन वाजता झाले. प्रत्यक्ष सभा सुरू होण्यास सायंकाळचे पाच वाजले. सुरूवातीला अनेक भाषणे झाली. पण, आंबेडकर यांच्या भाषणादरम्यान मोठ्या पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले.

Advertisement
Tags :
PRAKASH AMBEDKARpredatory governmenttarun bharat news
Next Article