रस्त्याच्या कडेला कचरा टाकताय सावधान!
कचरा टाकताना आढळल्यास होणार एक हजाराचा दंड : शहर स्वच्छतेवर अधिक भर, जास्त दंड वसूल करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकाचा होणार सन्मान
बेळगाव : सुवर्णसौधमध्ये 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या काळात मंत्री, महोदय व अधिकारी बेळगावात वास्तव्यास असणार आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे कचऱ्याची उचल करावी. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर एक हजार रुपयांची दंडात्मक करवाई करण्याची सूचना सोमवारी महापौर मंगेश पवार यांच्या कक्षात स्वच्छता निरीक्षकांना आरोग्य स्थायी समितीच्यावतीने करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मंगेश पवार होते.
केंद्र सरकारच्यावतीने दरवर्षी करण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर शहराचा प्रथम क्रमांक येतो. बेळगाव शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही म्हणावे तसे यश आलेले नाही. शहर स्वच्छता कशा पद्धतीने करावी याबाबतची माहिती घेण्यासाठी अलीकडेच नगरसेवक इंदूर अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्या पाठोपाठ आरोग्य विभागातील अधिकारीही इंदूर अभ्यास दौऱ्यावर जाऊन परतले आहेत. त्यामुळे इंदूरप्रमाणे बेळगावात व्यवस्थितरित्या कचऱ्याची उचल करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, यासाठी सोमवारी महापौर कक्षात स्वच्छता निरीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
शहराच्या स्वच्छतेसाठी ठेकेदाराची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. सध्या घरोघरी जाऊन कचरा उचल करणाऱ्या घंटागाड्या एकाच गल्लीत दोन-तीन वेळा जातात. त्यामुळे असे न करता संबंधित गाड्यांना गल्ल्या विभागून देण्यात याव्यात. शहरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. पण नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकून देत आहेत. त्यामुळे ही समस्या कायम आहे. रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधितांवर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करावी व त्यांना ऑनलाईन दंडाची पावती देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली.
जो स्वच्छता निरीक्षक जास्त दंड वसूल करेल त्यांचा सन्मानदेखील केला जाणार आहे. अधिवेशनकाळात शहराच्या स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा, अशी सूचनाही आरोग्य विभागाचे अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांना करण्यात आली. बैठकीला उपमहापौर वाणी जोशी, आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्ष लक्ष्मी राठोड, साहाय्यक पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी, प्रवीणकुमार, आदिलखान पठाण यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.