For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनुष्य-पशुहानी होणार नाही याची खबरदारी घ्या

11:22 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनुष्य पशुहानी होणार नाही याची खबरदारी घ्या
Advertisement

जिल्हा प्रभारी सचिव विपुल बन्सल यांच्या सक्त सूचना : पूरस्थितीबाबत आढावा बैठक

Advertisement

बेळगाव : प्रत्येक तहसीलदाराने आपल्या कार्यक्षेत्रातील काळजी केंद्रांना भेटी देणे सक्तीचे असून कोणत्याही परिस्थितीत मनुष्य आणि पशुहानी होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, काळजी केंद्रांवर जेवणखाण, औषधांची कमतरता होऊ नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना जिल्ह्याचे प्रभारी सचिव विपुल बन्सल यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. बुधवारी पूरपरिस्थिती हाताळणे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी वरील सूचना केली आहे. ऑगस्टमध्येही पाऊस वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आतापासूनच खबरदारी घ्यावी. सर्व काळजी केंद्रांवर आवश्यक अन्नधान्याचा साठा, औषधे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जनावरांसाठीच्या छावण्यांमध्ये चाऱ्याचा साठा करून ठेवावा. 2019 च्या पुरात उद्भवलेल्या समस्या लक्षात घेऊन आवश्यक तयारी करण्याची सूचनाही त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना केली.

काळजी केंद्रांवर वैद्यकीय सुविधांचा अभाव होऊ नये, यासाठी आतापासूनच आवश्यक उपाययोजना कराव्यात. सध्या केलेल्या तयारीत काही कमतरता असल्यास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. जलाशयातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यासंबंधी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून समर्थपणे परिस्थिती हाताळावी. नद्या दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे मानव व पशुंच्या संरक्षणासाठी काळजी घ्यावी. आपत्ती निवारणासाठी तहसीलदारांच्या खात्यात मुबलक निधी उपलब्ध आहे. जर निधीची कमतरता भासल्यास त्वरित वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी सक्त सूचनाही विपुल बन्सल यांनी अधिकाऱ्यांना केली.

Advertisement

संततधार पावसामुळे बागायत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. योग्यरीत्या पीकहानीची पाहणी करावी. याबरोबरच वाताहात झालेल्या रस्त्यांचेही सर्वेक्षण करावे. ऑगस्टमध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जलाशयातील पाणीसाठ्याचे नियोजन, बचावकार्यासह कोणत्याही टप्प्यावर अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे प्राणहानी होऊ नये, याची काळजी घ्यावी. प्रत्येक शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांनी जागरुकपणे व समन्वयाने काम करावे. कोणीही रजेवर जाऊ नये, आपल्या हेडक्वॉर्टरमध्ये राहून काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. नद्यांमध्ये येणारा प्रवाह हळूहळू कमी होतो आहे. तरीही खबरदारी म्हणून 123 टीएमसी क्षमता असलेल्या आलमट्टी जलाशयातून 97 टीएमसी पाणी गेल्या आठवडाभरात टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या बैठकीत दिली. शेजारच्या महाराष्ट्रातील जलसंपदा व कर्नाटकातील पाटबंधारे विभागातील अधिकारी एकमेकांशी समन्वय साधून आहेत. जलाशयातील पाणीसाठा योग्यरीत्या हाताळण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नदीकाठावरील गावांच्या नागरिकांचे संरक्षण व गरज भासल्यास त्यांचे स्थलांतर करण्यासाठी सर्व तयारी ठेवण्यात आली आहे. मनुष्यहानी व पशुहानी प्रकरणात 24 तासात भरपाई देण्याची सूचना तहसीलदारांना केली आहे. जिल्ह्यात 427 काळजी केंद्रे तयार ठेवण्यात आली आहेत. गरज भासल्यास आणखी 30 ते 46 काळजी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड आदींसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला.

10,304 जणांना काळजी केंद्रांमध्ये आश्रय 

अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या 3684 कुटुंबांतील 10,304 जणांना काळजी केंद्रांमध्ये आश्रय देण्यात आला आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले, डोंगराळ भागातील व वनविभागातील नागरी वसाहती वगळता जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी आरोग्य खाते सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोकाक फॉल्ससह जिल्ह्यातील अनेक धबधब्यांच्या परिसरात नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.