सभापतींचा अपमान होणार नाही, याचे भान ठेवावे : मुख्यमंत्री
विधिकार दिन कार्यक्रमात आमदारांना सल्ला : म्हादईचा खटला गोवाच जिंकणार असल्याचा दावा
पणजी : सभापतीपदाला लोकशाहीत महत्त्वाचे स्थान असून त्यांच्यावर टीका करताना, बोलताना अपमान होणार नाही याची जाणीव ठेवावी तसेच भान राखावे अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी विधिकार दिन कार्यक्रमात बोलताना केली. म्हादई प्रश्नावर सरकार जागरूक असून त्याचा दैनंदिन पाठपुरावा करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात गोव्याची बाजू बळकट असून म्हादईचा खटला गोवाच जिंकणार आहे, अशी खात्री त्यांनी वर्तवली. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांची जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. सभापती रमेश तवडकर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व इतर आजी, माजी आमदार कार्यक्रमास उपस्थित होते. विधानसभा संकुलातील हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी त्याच कार्यक्रमात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
काही समाजकंटक व नेते यांच्याकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला असून त्याची गळचेपी होत आहे. पॅसिनोमुळे गोवा राज्याची प्रतिमा बिघडली असून जमिनींचे घोटाळे चिंताजनक आहेत. पक्षांतराबाबत सभापती अपयशी ठरले असून फक्त वेळकाढूपणाचे धोरण चालवले आहे. म्हादईकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झाल्याची टीका आलेमांव यांनी केली. आलेमांव यांच्या टीकेवर बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही. प्रत्येकजण विचार मांडू शकतो मात्र सभापतींबाबत बोलताना मान राखणे आवश्यक आहे. कारण ती पदे घटनात्मक आहेत. त्यांचा आदर ठेवला पाहिजे. आमदार अपात्रता प्रकरण सभापती न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यांचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. सभापतींचे अधिकार याबाबत त्यांनाच जास्त माहिती असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. नार्वेकर यांनी देखील सर्वांना मार्गदर्शन केले. आमदारांचे पक्षांतर राज्याच्या हितासाठीच झाले आहे. विकसित भारत 2047 चे ध्येय साध्य होण्यासाठी नवीन नेतृत्वाची गरज आहे. विधिकार मंचामुळे राज्यात नवीन नेतृत्व तयार होऊ शकते, असेही डॉ. सावंत यांनी नमूद केले.