बीकॉम चषक द्रविंद्रन डायनामिककडे
बेळगाव : गोगटे महाविद्यालय आयोजित बीकॉम प्रीमियर लीग 5 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द्रविंद्रन डायनामिक संघाने होळसळा हंटर्स संघाचा 31 धावांनी पराभव करुन बेळगाव बीकॉम क्रिकेट चषक पटकाविला. आदित्य पाटीलला सामनावीर व मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. गोगटे कॉलेजच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला होता. आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंचे औक्षण करुन 8 संघात विभागण्यात आली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना द्रविंद्रन डायनामिक व होळसळ हंटर्स यांच्यात झाला. द्रविंद्रनने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 4 गडी बाद 51 धावा केल्या. त्यात आदित्य पाटीलने 1 षटकार 4 चौकारासह 29 तर निखिल गवळीने 10 धावा केल्या. हंटरतर्फे अर्णव नुगानट्टी, रोहीत लमाणी व ऋषभ गवळी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना हंटर संघाने 5 षटकात 4 गडी बाद 20 धावा केल्या. त्यांचा एकही खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. द्रविंद्रनतर्फे आदित्य पाटील व श्रेयांश गौरण्णा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाजी अंजूम परवेज, उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत मुरकुटे, अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकावीर आदित्य पाटील यांना गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विरेश गौडर, ओमकार देशपांडे यांनी तर स्कोरर म्हणून मिस्बा बडेभाई यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोगटे महाविद्यालयाच्या क्रीडा निर्देशका नर्मता अंतिलमरद व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.