ईशान किशन, श्रेयस अय्यरला बीसीसीआयचा दणका
रणजी क्रिकेटकडे दुर्लक्ष पडले महागात : वार्षिक करार यादीत स्थान नाही : नव्या खेळाडूंना संधी
वृत्तसंस्था/ मुंबई
बीसीसीआयने बुधवारी खेळाडूंसोबतचा नवा वार्षिक करार जाहीर केला. नव्या कराराच्या यादीत एकूण 30 खेळाडू असून या सर्वांना 4 गटात विभागण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून संघातून बाहेर असलेले पण रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार देणाऱ्या ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने दणका देत करारातून वगळले आहे. दरम्यान, केंद्रीय करारातून बाहेर पडल्यानंतर आता टीम इंडियातील अय्यर आणि किशनचे भवितव्यही धोक्यात आले आहे. नव्या कराराचा कालावधी 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 असा असणार आहे. याशिवाय, बीसीसीआयने यंदाच्या करारात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच काही खेळाडूंना बढती दिली असून काही खेळाडूंचे डिमोशन झाले आहे.
बीसीसीआयने 2023-24 या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे ईशान किशन आणि श्रेयस अय्यरचे नाव वगळण्यात आले आहे. बीसीसीआय व निवड समितीचा रणजी चषक स्पर्धेत खेळण्याचा आदेश धुडकावल्यानंतर या दोघांवर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे. या दोघांवर कारवाई करत बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटकडे कोणत्याही किमतीवर दुर्लक्ष करता येणार नाही, असा संदेशही दिला आहे.
ए प्लसमध्ये चौघांचा समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी दरवर्षी 12 महिन्यांचा करार केला जातो. या कराराअंतर्गत खेळाडूंना एक ठराविक रक्कम मिळते. हे खेळाडू वर्षभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत तरी या खेळाडूंना ती रक्कम मिळते. टीम इंडियासाठी क्रिकेटच्या तीनही प्रकारात सातत्य व मोलाचे योगदान देणाऱ्या खेळाडूंचा ग्रेड ए प्लसमध्ये समावेश असतो. यानुसार कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना बोर्डाच्या ग्रेड ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. या सर्वांना प्रत्येकी वार्षिक 7 कोटी रुपये मिळणार आहेत.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फलंदाज शुभमन गिलसह केएल राहुल यांचे नव्या करारात प्रमोशन झाले आहे. हे तीनही खेळाडू आधी ग्रेड बी मध्ये होते. आता त्यांना ए ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे. अक्षर पटेल ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये गेला आहे. वर्षभरापूर्वी अपघातामध्ये जखमी झालेला ऋषभ पंत ए मधून बी ग्रेडमध्ये गेला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात धडाकेबाज कामगिरी करणारा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालला ग्रेड बी मध्ये स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, वार्षिक कराराच्या शिफारशींमध्ये श्रेयस अय्यर आणि इशान यांच्या नावाचाही विचार करण्यात आला होता, मात्र त्यांना केंद्रीय करारात स्थान मिळाले नाही, असे बीसीसीआयने नमूद केले.
ग्रेड ए प्लस (प्रत्येकी 7 कोटी) : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा.
ग्रेड ए (प्रत्येकी 5 कोटी) : आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या.
ग्रेड बी (प्रत्येकी 3 कोटी) : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल.
ग्रेड सी (प्रत्येकी 1 कोटी) : रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार.
ईशान, श्रेयसला मोठा दणका
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गेल्याच आठवड्यात केंद्रीय करारात असलेल्या खेळाडूंना आणि भारत अ संघाच्या खेळाडूना इशारा दिला होता, की रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष करणे खपवून घेतले जाणार नाही आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना या संदर्भात कारवाई करण्याची पूर्णपणे मोकळीक दिली जाईल. बीसीसीआयच्या आदेशानंतरही ईशान किशन आणि श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसले नाहीत. ईशान दीर्घ काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याला रणजी खेळण्यास सांगण्यात आले होते, पण तो त्याकडे दुर्लक्ष करून बडोद्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासोबत आयपीएलचा सराव करताना दिसला. तो रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडसाठे खेळला नाही.
दुसरीकडे, खराब फॉर्ममुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांतून वगळण्यात आले होते. त्याला रणजी खेळण्याचा सल्लाही दिला होता. मात्र पाठदुखीमुळे श्रेयस रणजीपासून दूर राहिला होता. श्रेयसने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठीच्या दुखापतीचे कारण दिले आहे. मात्र एनसीएचे क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीला ईमेल पाठवून श्रेयस पूर्णपणे फिट असल्याचे सांगितले आहे. बीसीसीआयने वारंवार सांगूनही या दोन्ही खेळाडूंनी रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केले. अर्थात, बुधवारी नवी वार्षिक करार यादी जाहीर करत बीसीसीआयने या दोघांना चांगलाच दणका दिला आहे.
पाच वेगवान गोलंदाज, ध्रुव जुरेल व सर्फराज खानच्या नावाची चर्चा
निवड समितीने आकाश दीप, विजयकुमार वैशाक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कविरेप्पा या खेळाडूंसाठी वेगवान गोलंदाजी कराराची शिफारस केली आहे. यासह बीसीसीआयच्या माहितीनुसार, जे खेळाडू किमान 3 कसोटी किंवा 8 वनडे सामने अथवा 10 टी-20 सामने खेळण्याच्या निकषांची पूर्तता करतात त्यांना प्रमाणित कालावधीत आपोआप क श्रेणीमध्ये समाविष्ट केले जाईल. ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांनी आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत, जर त्यांना इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात संधी मिळाली तर त्यांना सी श्रेणीत समाविष्ट केले जाईल.