बीसीसीआयकडून देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे वेळापत्रक जाहीर
रणजी फॉरमॅटमध्ये मोठा बदल : 15 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात
वृत्तसंस्था / मुंबई
बीसीसीआयने 2025-26च्या देशांतर्गत क्रिकेटच्या नवीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 14 जून रोजी झालेल्या अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीनंतर, बीसीसीआयने केवळ देशांतर्गत स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले नाही तर रणजी ट्रॉफीसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांच्या स्वरूपात बदल जाहीर केले.
या बैठकीत देशांतर्गत स्पर्धेबाबत अनेक दूरगामी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात आले, ज्याचा परिणाम येत्या हंगामात दिसून येईल.
रणजी ट्रॉफी 2025-26 या वेळी 15 ऑक्टोबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत दोन टप्प्यात होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी प्लेट ग्रुपच्या दोन संघांमध्ये बदल होणार आहेत. आतापर्यंत प्लेट ग्रुपमधून दोन संघांना बढती आणि रेलीगेट करण्यात आले होते, परंतु आता फक्त एका संघाला एलिट डिव्हिजनमध्ये बढती दिली जाईल आणि एका संघाला प्लेट डिव्हिजनमध्ये पाठवले जाईल.
रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :-
पहिला टप्पा: 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर
दुसरा टप्पा: 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी
नॉकआउट सामने: 6 ते 28 फेब्रुवारी.
रणजी ट्रॉफीपूर्वी, देशांतर्गत हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफीने होईल, जो यावेळी 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल. तो पुन्हा झोनल फॉरमॅटमध्ये होईल. खेळाडूंची निवड विभागीय निवड समितीकडून केली जाईल. यावेळी इराणी कप 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल. भारताची प्रमुख घरगुती टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 26 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान आयोजित केली जाईल. या स्पर्धेत प्लेट विभाग देखील पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
या हंगामापासून, संघांना क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल तसेच सुपर लीग फेरीत तीन अतिरिक्त सामने खेळण्याची संधी मिळेल. गट अ आणि गट ब मधील अव्वल संघ अंतिम फेरीत एकमेकांशी भिडतील. गेल्या हंगामातील सर्वात कमकुवत 6 संघ प्लेट गटात खेळतील. बीसीसीआयने असेही स्पष्ट केले की सर्व व्हाईट बॉल स्पर्धांमध्ये, गट टप्प्यात बरोबरीत असलेल्या संघांमध्ये कोण पुढे जाईल हे आता नेट रन रेटच्या आधारे ठरवले जाईल.