‘अपशब्द’वरून सभागृहात रणांगण
सी. टी. रवी यांची जीभ घसरल्याचा आरोप : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून पोलिसांत तक्रार : सी. टी. रवी यांना अटक
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरुद्ध विधानपरिषदेच्या सभागृहात वापरलेल्या अपशब्दामुळे सुवर्णसौधमध्ये मोठा राडा झाला. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रवी यांच्याविरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले आहे. पोलिसांनी रवी यांना अटक केली असून या कारवाईनंतर सुवर्णसौध परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शेवटच्या दिवशी गदारोळ, सभात्याग, धरणे घडले.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करीत काँग्रेसने गुरुवारी शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. डॉ. बाबासाहेबांच्या फोटो दाखवत केंद्रीय मंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. दोन्ही सभागृहात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही काँग्रेसविरोधी घोषणाबाजी केल्या. याचवेळी विधानपरिषदेच्या सभागृहात वापरलेल्या अपशब्दावरून प्रचंड गदारोळ झाला.
विधानपरिषदेत गदारोळ वाढताच सभापती बसवराज होरट्टी यांनी काही काळासाठी कामकाज तहकूब केले. कामकाज तहकूब झाल्यानंतरही सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांची घोषणाबाजी सुरूच होती. घोषणा देण्याच्या भरात सी. टी. रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तो अपशब्द कानावर पडल्यानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही तुला आई-बहीण आहेत की नाही? असा प्रश्न विचारला आहे.
सी. टी. रवी यांना घेराव
या घटनेचे पडसाद पटांगणातही झाले. लक्ष्मी हेब्बाळकर समर्थकांनी रवी यांना घेराव घालून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना शिवीगाळही करण्यात आली. 30 हून अधिक जणांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मार्शलनी रवी यांना सुरक्षितपणे पटांगणात नेऊन गेट बंद केले. त्यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर समर्थकांनी शिवीगाळ करीत रवी यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. त्यांना बाहेर सोडा, अशी मागणी केली. त्यावेळी संतप्त रवी यांनी पटांगणातच धरणे धरले. आपण कोणाला घाबरणार नाही, या गुंडांना सभागृहाच्या पटांगणात कोणी सोडले? अशी विचारणा करीत मार्शल व पोलिसांविरुद्ध संतप्त झाले.
हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्वरित अटक करा
या घटनेची माहिती समजताच भाजपचे आमदार व इतर नेते सी. टी. रवी यांच्या मदतीला धावले. पोलीस यंत्रणेविरुद्ध त्यांनी संताप व्यक्त केला. विधान परिषद सदस्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. अधिवेशन सुरू असताना मंत्र्यांचे समर्थक पटांगणात घुसले आहेत. सुरक्षाव्यवस्थेतील हा दोष आहे. जोरदार गोंधळ सुरू झाल्यानंतर मार्शलनी सुरुवातीला परिस्थिती हाताळली. अर्धा तासानंतर पोलीस दाखल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक हितेंद्र आर. यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांवर कारवाईची मागणी केली. याचवेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सभापती बसवराज होरट्टी यांची भेट घेऊन आपल्यासंबंधी वापरलेल्या अपशब्दाबद्दल तक्रार केली. घटनेची माहिती देताना त्यांना अश्रू अनावर झाले.
काँग्रेस कार्यकर्त्यांची रवी यांच्याविरुद्ध घोषणाबाजी
सुवर्णसौधच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी सी. टी. रवी यांच्या कारला घेराव घालून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. लक्ष्मी हेब्बाळकर समर्थक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी रवी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी अधिवेशनाच्या काळात सुवर्णसौध परिसरात जमावबंदीचा आदेश लागू असताना मंत्र्यांचे समर्थक परिसरात येऊन घोषणाबाजी कसे करतात? जमावबंदी आदेशाचा तो उल्लंघन होत नाही का? असा प्रश्न भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. या सर्व घडामोडींच्यानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात रवी यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 75 व 79 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अश्लील शब्दाचा वापर करीत इशारा केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला असून या घटनेनंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी सुवर्णसौध परिसरातून सी. टी. रवी यांना ताब्यात घेतले.
याला पुरावे काय आहेत? : नारायणस्वामी
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते छलवादी नारायणस्वामी यांनीही या घटनेसंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण कोणाचेही समर्थन करणार नाही. सी. टी. रवी यांनी अपशब्द वापरला आहे, याला पुरावे काय आहेत? असा प्रश्न विचारत काय चुकीचे आहे, काय बरोबर आहे? याविषयी आपण काही बोलणार नाही. सभापतींचा निर्णय अंतिम आहे. घोषणाबाजी सुरू झाली त्यावेळी एकमेकांकडे बोट दाखवत आरोप-प्रत्यारोप सुरू होते. गदारोळात कोणी काय बोलले? ते व्यवस्थित ऐकायला येत नव्हते. त्यावेळी कामकाज पुढे ढकलण्यात आले.
दबावामुळे पोलिसांनी ही कारवाई केली : आर. अशोक
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी या कारवाईबद्दल सरकारवर टीका केली आहे. गुरुवारी रात्री खानापूर पोलीस स्थानकात जाऊन त्यांनी सी. टी. रवी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दबावामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विधान परिषदेत घटना घडली आहे. तर सभापतींकडे तक्रार करायला हवी होती. पोलीस स्थानकात तक्रार देण्याची गरज नव्हती. राजकीय दबावामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला.
सी.टी. रवी यांना पोलीस वाहनातून नेले बेंगळूरला
खानापूर : विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूर पोलीस स्थानकात गुरुवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून स्थानबद्ध करण्यात आले होते. विशेष न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांना बेंगळूरला नेण्यात येत असताना रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात फिर्याद देण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र फिर्याद नोंद करुन घेत नसल्याने रवी हे पोलीस स्थानकातून बाहेर पडण्यास नकार देत होते. त्यामुळे दीड-दोन तास पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांत वादावादी झाली. तसेच रवी यांना पोलीस वाहनातून जबरदस्तीने नेण्यात येत होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सर्व भाजप नेते व कार्यकर्त्यांना बाजूला सारून पोलीस वाहन स्थानकाबाहेर काढले अन् बेंगळूरच्या दिशेने रवाना झाले.
‘तो’ फौजदारी गुन्हा आहे : मुख्यमंत्री
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी सी. टी. रवी यांनी अपशब्द वापरला आहे. ‘तो’ फौजदारी गुन्हा आहे. यासंबंधी विधानपरिषदेचे सभापती व संबंधीत पोलीस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य कारवाई करणार आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. सी. टी. रवी यांनी आपण अपशब्द वापरला नाही, अशी भूमिका घेतली आहे. याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता आपण विधानपरिषदेत नव्हतो. त्यांनी अपशब्द वापरला आहे, असे काही सदस्य सांगत आहेत. या शब्दप्रयोगामुळे लक्ष्मी हेब्बाळकर या दुखावल्या आहेत. पोलीस आपले काम करतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऑडिओ, व्हिडिओ तपासल्यानंतर सत्य समजणार : रवी
विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी या घटनेसंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांची भावना कशी आहे? तशीच त्यांनी अर्थ करून घेतला तर आपण काही करू शकणार नाही. इतिवृत्तात काय आहे, हे दाखवा. सभापतींनी जर आपल्याला स्पष्टीकरण मागितले तर आपण सांगू शकतो. रवी यांनी केलेला शब्दप्रयोग एक फौजदारी गुन्हा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली आहे. यासंबंधी रवी यांना पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांइतके आपण कायदेतज्ञ नाही. ऑडिओ, व्हिडिओ तपासल्यानंतर सत्य समजणार आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसकडूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांचे स्मारकही उभारण्यात आले नाही. त्यांना भारतरत्न दिले नाही. यासंबंधी माहिती देताना तुम्ही अपशब्द वापरलात असे म्हटले तर आपण काय करणार आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘अपशब्द’ प्रकरण हक्कभंग समितीकडे वर्ग
महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी वापरलेल्या अपशब्दाबद्दल विधानसभेतही सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारात खडाजंगी झाली. काँग्रेसच्या शरद बच्चेगौडा यांनी हा मुद्दा मांडला. सभाध्यक्षांनी हे प्रकरण हक्कभंग समितीकडे सोपविल्याचे जाहीर केले. शरद बच्चेगौडा यांनी यासंबंधीचा मुद्दा मांडताच कायदामंत्री एच. के. पाटील यांनी लक्ष्मी हेब्बाळकर या विधानसभेच्या सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देणे सभाध्यक्षांचे व या सभागृहाचे कर्तव्य आहे. म्हणून हे प्रकरण हक्कभंग समितीकडे सोपविण्याची मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी याला विरोध दर्शवला.
सी. टी. रवी हे या सभागृहाचे सदस्य नाहीत. विधानपरिषदेत ही घटना घडली आहे. विधानसभेच्या सभापतींनी यासंबंधी रुलिंगही दिला आहे. त्यामुळे विधानसभेत याची चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका घेतली. तरीही सभाध्यक्षांनी हे प्रकरण हक्कभंग समितीकडे सोपविल्याचे जाहीर करताच आर. अशोक यांच्यासह भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. तत्पूर्वी भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये विधानसभेत आरोप-प्रत्यारोप झाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला 40 टक्क्याचे सरकार या आरोपाचा पुनरुच्चार केला. त्यावेळी बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी तुमचे सरकार शंभर टक्के भ्रष्टाचारात बुडाले आहे, असा आरोप केला.
रवी यांना आणले खानापूर पोलीस स्थानकात
सुरुवातीला सी. टी. रवी यांना हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात नेण्यात आले. दोन पोलीसप्रमुख व चार एस्कॉर्ट वाहनांसह राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या सोबत घेऊन हिरेबागेवाडी पोलीस स्थानकातून रवी यांना सायंकाळी खानापूर पोलीस स्थानकात नेण्यात आले. तेथे त्यांना दोन तास ठेवण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, प्रमोद कोचेरी, माजी आमदार संजय पाटील आदींसह जिल्ह्यातील भाजपचे अनेक नेते पोलीस स्थानकाबाहेर दाखल झाले. सुरुवातीला या नेत्यांना प्रवेशद्वारावरच अडवून प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यावेळी पोलीस व भाजप नेत्यांमध्ये वादावादीचा प्रकारही घडला.