For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगाभ्यास करणारा कधीच दुर्गतीला जात नाही

06:22 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
योगाभ्यास करणारा कधीच दुर्गतीला जात नाही
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

बाप्पा म्हणाले, शम आणि दम हे गुण मनावर विजय मिळवण्यासाठी फार उपयोगी आहेत. शम म्हणजे सहनशीलता आणि दम म्हणजे आहे त्यात समाधानी राहण्याची कला. शम आणि दम साध्य झाले की, माणसाचं मन एकाग्र होऊ लागेल कारण आता त्यात इतर विचारांना किंवा त्या विचारांना फुटणाऱ्या फाट्याना वाव नसेल.

बाप्पांनी मनोजय साध्य करण्यासाठी अभ्यास, वैराग्य व सतसंगती हे उपाय सांगितले. वरेण्याला मनातून हे सर्व पटलंय पण तरीसुद्धा मनोविजय मिळवून आवश्यक ती साधना करण्यासाठी दीर्घकाळ लागत असणार याचाही त्याला अंदाज आलाय आणि त्यामानाने आयुष्याचा कालावधी छोटा वाटल्याने तो बाप्पांना म्हणाला, हे सर्वज्ञा, सर्वव्यापका, ज्ञानचक्रधारका, योगभ्रष्ट मनुष्याला कोणता लोक मिळतो? कोणती गती मिळते? कोणते फल मिळते? ह्या माझ्या शंकांचे निरसन करा ह्या अर्थाचा योगभ्रष्टस्य को लोकऽ का गतीऽ किं फलं भवेत् । विभो सर्वज्ञ मे छिन्धि संशयं बुद्धिचक्रभृत् ।।24।।

Advertisement

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार राजाच्या मते मनोजय साधणं हे तसं कठीण काम आहे. बाह्य आकर्षणांचा मोह होऊन योगाभ्यासात खंड पडणं सहज शक्य आहे. अशाप्रकारे चिकाटी कमी पडल्याने ज्याचा योगाभ्यास अपूर्ण राहतो त्याला जीवनात काहीच साध्य झालं नाही असं वाटण्याची शक्यता आहे. न मोक्षप्राप्ती, न संसारसुख आणि असंच प्रत्येक जन्मात होत राहिलं तर त्याचा योगाभ्यास पूर्ण होणार तरी कधी? तसेच चालू जन्मात योगाभ्यास अपूर्ण राहिल्याने त्याला कोणती गती मिळते? अपूर्ण का असेना पण केलेल्या योगाभ्यासाचे कोणते फळ त्याला मिळते? हे जाणून घेण्यासाठी राजाने बाप्पाना प्रश्न विचारला आहे. बाप्पांनी त्या प्रश्नाचे पुढील श्लोकात दिलेलं उत्तर आपल्या सगळ्यांसाठीच मार्गदर्शक असून मोठं दिलासादायक आहे.

दिव्यदेहधरो योगाद्भ्रष्टऽ स्वर्भोगमुत्तमम् ।

भुक्त्वा योगिकुले जन्म लभेच्छुद्धिमतां

कुले ।।25।।

अर्थ-योगापासून भ्रष्ट झालेला मनुष्य दिव्यदेहधारी होत उत्तम स्वर्गभोग भोगून योग्यांच्या अथवा शुद्धाचरणी कुळामध्ये जन्म पावतो.

विवरण-या जन्मी ध्यानधारणा करत असलेल्या योग्याला आत्मसिद्धी जर मिळाली नाही तर त्याला योगभ्रष्ट असं म्हणतात. अनेक कारणांनी त्याची साधना अपुरी राहिलेली असते पण तो योगाभ्यास करत असल्याने त्या अभ्यासाच्या बळावर त्याच्याकडे जमलेला पुण्यासाठा खूप मोठा असतो. त्यामुळे मृत्युनंतर तो दिव्यदेहधारी होऊन स्वर्गलोकात वास करतो.

पुण्यासाठा मोठा असल्याने त्याला हवा तेव्हढा वेळ तो स्वर्गात राहू शकतो पण त्याचा मूळ पिंड योगाभ्यास करण्याचा असल्याने त्याला त्या स्वर्गीय भोगांचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म होतो. कुठे पुनर्जन्म घ्यायचा हे त्याच्या हातात असते. त्याच्या इच्छेनुसार तो पुण्यवान माता पित्यांच्या उदरी जन्म घेऊन तेथील संपन्न गोष्टींचा उपभोग घेऊन झाल्यावर त्याचा पुढील योगाभ्यास सुरु होतो किंवा तो योगी कुटुंबात जन्म घेतो. तेथे त्याला पुढील योगाभ्यास करण्याच्या दृष्टीने परिस्थिती सर्वथा अनुकूल असते. त्यामुळे मागील जन्मी त्याचा योगाभ्यास जिथपर्यंत झालेला असतो तेथून पुढे त्याचा योगाभ्यास सुरू होतो व बाप्पांच्या कृपेनं अशा पद्धतीने त्याचा योगाभ्यास पूर्ण होऊन तो मोक्षपदी जातो.

या श्लोकात बाप्पांनी सर्व साधकांना एक निश्चित आश्वासन दिले आहे की, जो लोककल्याणकारी कामं करतो किंवा कोणत्याही साधनेच्या माध्यमातून शुद्ध अंत:करणाने ईश्वराला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो अशा साधकाला दुर्गती मिळत नाही. त्याचे या जन्मात पतन होत नाही किंवा पुढील जन्म नीच योनीत मिळत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.