दिल्ली - गुजरातमध्ये आज वर्चस्वाची लढाई
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आत्मविश्वास वाढलेले दिल्ली कॅपिटल्स आणि तितकेच सुस्थितीत असलेले गुजरात टायटन्स या गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या दोन संघांमध्ये आज शनिवारी येथे सामना रंगणार असून यावेळी शेवटच्या षटकांत उत्कृष्ट गोलंदाजी करणारा मिशेल स्टार्क आणि मोहम्मद सिराज यांच्यातही एक प्रकारे लढत होणार आहे.
कॅपिटल्स सहा सामन्यांतून 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत, तर टायटन्स तेवढ्याच सामन्यांतून आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्सवर सुपर ओव्हरमध्ये नाट्यामय विजय मिळवल्यानंतर दिल्लीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. ऑस्ट्रेलियन डावखुरा गोलंदाज स्टार्कने त्यात तीन षटके अचूक यॉर्कर टाकले. यामध्ये सुपर ओव्हरचा समावेश होतो. त्यामुळे सामन्याची स्थिती बदलली. 10 पेक्षा थोड्या जास्त इकोनॉमी रेटने 10 बळी घेतलेला स्टार्क दिल्लीच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करतो, ज्यामध्ये मुकेश कुमार आणि मोहित शर्मा यांचा समावेश आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल, सातत्यपूर्ण साई सुदर्शन आणि अॅशेसमधील प्रतिस्पर्धी जोस बटलर यांच्या नेतृत्वाखालील गुजरतच्या वरच्या फळीशी त्याची लढाई निर्णायक ठरू शकते. आतापर्यंत या तिघांनी फलंदाजीचा मोठा भार उचलला आहे. जर दिल्लीने गुजरातच्या या वरच्या फळीचा अडथळा लवकर दूर केला, तर सामना त्यांच्या बाजूने झुकू शकतो. दुसरीकडे, सिराज या हंगामात गुजरात टायटन्सच्या माऱ्याचा आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. त्याने 8.50 च्या इकोनॉमी रेटने 10 बळी घेतले आहेत. विशेषत: पॉवरप्लेमध्ये तो उत्कृष्ट राहिलेला आहे.
सिराजचा सामना दिल्लीचा तुलनेने अननुभवी सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क, जो लयीसाठी संघर्ष करत आहे आणि आशादायक अभिषेक पोरेल यांना करावा लागेल. या जोडीला केवळ सिराजच नव्हे, तर प्रसिद्ध कृष्णालाही तोंड द्यावे लागेल. जर दिल्लीची वरची फळी लवकर कोसळली, तर के. एल. राहुल आणि कऊण नायर यांना डाव सावरण्यासाठी पुढे सरसावे लागेल. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल देखील त्याच्या घरच्या मैदानावर प्रभाव पाडण्यास उत्सुक असेल. त्याला फलंदाजी व गोलंदाजीतही लय पुन्हा मिळाली आहे.
गुजरातचा साई किशोर व रशिद खान या विश्वासार्ह फिरकी जोडीवर भर राहिलेला आहे, तर दिल्लीकडे उत्कृष्ट कामगिरी करणारा कुलदीप यादव आहे, ज्याला प्रभावी विप्रज निगमची चांगली साथ मिळत आहे. तथापि, गेल्या सामन्यात खांद्याच्या दुखापतीमुळे कुलदीप मैदानाबाहेर पडल्यानंतर तो आज उपलब्ध होईल की नाही हे निश्चित नाही. कॅपिटल्सने त्याच्या फिटनेसविषयी माहिती दिलेली नाही.
संघ : दिल्ली कॅपिटल्स-अक्षर पटेल (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, कऊण नायर, समीर रिझवी, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आशुतोष शर्मा, के. एल. राहुल, अभिषेक पोरेल, डोनोवन फेरेरा, ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, मानवंथ कुमार, विप्रज निगम, अजय मंडल, दर्शन नळकांडे, मुकेश कुमार, मोहित शर्मा, टी. नटराजन, मिशेल स्टार्क, दुष्मंथ चमीरा, कुलदीप यादव.
गुजरात टायटन्स-शुभमन गिल (कर्णधार), बी. साई सुदर्शन, जोस बटलर, शाहऊख खान, शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, रशिद खान, कागिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अर्शद खान, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रार, करिम जनात.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.