For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागावाटपाची लढाई

06:09 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
जागावाटपाची लढाई
Advertisement

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुऊवात झाल्याने राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर आत्तापासूनच रस्सीखेच होताना दिसत आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात आघाडी व महायुतीमध्ये तीन-तीन पक्षांचा समावेश राहणार असल्याने जागा वाटपाचा तिढा सोडविणे वाटते तितके सोपे नसेल. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट हे तीन पक्ष आघाडीचे घटक असतील. याशिवाय वंचित बहुजनही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लोकसभेच्या 48 जागांची वाटणी, हा कळीचा मुद्दा ठरतो. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढविणार असल्याची घोषणा करीत बार्गेनिंगला सुऊवात केली आहे. मागच्या निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये शिवसेना व भाजपा यांची युती होती. या निवडणुकीत सेनेने 23 जागा लढविल्या व त्यापैकी 18 जागांवर यश मिळविले. त्याकडे लक्ष वेधत जिंकलेल्या जागांबाबत चर्चाच करायची नाही, असे महाविकास आघाडीचे धोरण असल्याचे राऊत सांगत आहेत.  2019 च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले. केवळ एका जागेवर काँग्रेसला विजय प्राप्त झाला. हा पूर्वेतिहास उगाळत सेना काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळते. लोकसभेची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची झालेली पीछेहाट व भाजपाची झालेली सरशी, ही पार्श्वभूमीही त्यामागे आहे, हेही विसरून चालणार नाही. सेनेच्या या दबावतंत्राला काँग्रेसनेही त्याच पद्धतीने उत्तर दिले आहे. त्यामुळे जागा वाटप हा आघाडीमधील नाजूक मुद्दा असणार, हे वेगळे सांगायला नको. काँग्रेसचे माजी खासदार संजय निऊपम आणि संजय राऊत यांच्यातील प्रेम सर्वश्रुत आहे. एकाच आघाडीत असल्याने मागच्या काही दिवसांपासून शांत असलेल्या या दोघांनी आपल्या तलवारी पुन्हा उपसल्या आहेत. सेनेच्या 23 जागा आल्या खऱ्या. पण, त्यांचे डझनभर गद्दार पळून गेले आहेत. चार-पाच खासदारच शिल्लक आहेत. पुढच्या काही दिवसांत ते तरी पक्षात थांबतील काय, अशी शंका उपस्थित करीत निऊपम यांनी राऊत यांना डिवचले आहे. त्याचबरोबर ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही जागा जिंकू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होत असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. अर्थातच ती टोकाला जाऊ नये, याची दक्षता या दोन्ही पक्षांना घ्यावी लागेल. महायुतीत सेना व भाजपा, असेच दोनच पक्ष होते. आता आघाडीत तीन वा चार पक्ष असतील व त्याप्रमाणे वाटप करावे लागेल, हे वास्तव आहे. त्याचे भान सेनेला ठेवावे लागणार आहे. पक्षांच्या धुरिणांना त्याची जाणीव असावी. परंतु, घासाघीस केल्याशिवाय व आपले घोडे पुढे दामटल्याशिवाय आपले वर्चस्व राखता येणार नाही, असे संबंधितांना वाटत असावे. काँग्रेसबाबत बोलायचे झाल्यास त्यांची पाटीही तशी कोरीच आहे. अगदी पारंपरिक मित्र पक्ष राष्ट्रवादीही त्यांच्या पुढे आहे. हे पाहता विदर्भ व इतर काही भागांतील ताकदीच्या बळावरच त्यांना जागा खेचाव्या लागतील. पवारांनी जागावाटपाबाबत अधिक भाष्य करण्याचे आत्तापर्यंत टाळले आहे. इकडून तिकडून टिप्पणी करीत बसण्यापेक्षा चर्चेच्या टेबलावर काय ते बोलायचे आणि हवे ते मिळवायचे, ही पवार यांची रीत आहे. अजितदादांच्या सोडचिठ्ठीनंतर त्यांच्या पक्षाचाही शक्तिक्षय झाला आहे. पवार हे पक्के जाणून आहेत. त्यामुळे तडजोड कशी आणि किती करायची, हेही ते आपल्या कृतीतून दाखवून देतील. महाराष्ट्रात वंचित पॅक्टर हा पुढच्या निवडणुकीत अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मागच्या निवडणुकीत वंचितमुळे आघाडीच्या लोकसभेच्या सहा जागा पडल्या. तर विधानसभेत तब्बल 32 मतदारसंघांवर परिणाम झाला. हे पाहता या खेपेला प्रकाश आंबेडकरांच्या या पक्षाला आघाडीपासून वंचित ठेवणे परवडणारे नाही. आंबेडकर यांनी प्रत्येकी 12 जागांचे सूत्र मांडले आहे. समसमान वाटणीचा हा फॉर्म्युला अन्य पक्षांना मान्य होणे कठीणच असेल. आंबेडकर हेही ते जाणतात. तरीही अधिकच्या जागांसाठीची मोर्चेबांधणी म्हणून त्यांनी हे सूत्र पुढे केले असावे. आंबेडकर यांना अकोला व दक्षिण मध्य मुंबईची जागा दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात कुणाला, कोणत्या जागा दिल्या जाणार, हे वरिष्ठांच्या बैठकीत ठरेल. मात्र, तत्पूर्वीच जागा वाटपावरून छोट्या मोठ्या चकमकी झडू लागल्या, तर त्याचे ऊपांतर मोठ्या लढाईत होण्यास अवधी लागणार नाही. हे पाहता संबंधित पक्षाच्या हायकमांडने पक्षातील इतर नेत्यांना सुबरीचा सल्ला द्यायला हवा. अन्यथा, बिघाडी वास्तवात यायला वेळ लागणार नाही. दुसरीकडे महायुतीतही सर्व काही आलबेल आहे, असे समजण्याचे कारण नाही. भाजपाची वाढती ताकद पाहता शिंदे गट व अजित पवार गटाला किती जागा मिळणार, हा मोठा यक्षप्रश्न म्हणता येईल. त्यात अपात्रता प्रकरणाचा निकाल वगैरेवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेत शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, असा हट्ट धरला आहे. परंतु, उद्या शिंदे गटावर भाजपात विलीन व्हायची वा कमळाच्या चिन्हावर लढायची वेळ आली, तर काय, याचाही दादांना विचार करावा लागेल. बाकी काही असो. पण, सेमी फायनल जिंकलेला व दिवसेंदिवस ताकदवान होत असलेला भाजपा हा शिंदे गट व अजित पवार गटापुढे नमते घेऊन जागा वाटपात फार काही ताणणार नाही, असे म्हणणे म्हणजे शुद्ध भाबडेपणा होय. भाजपाला स्वपक्ष वाढवायचा आहे. शिंदे गट वा अजित पवार गट नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. एकूणच जागा वाटप हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. निवडणुकीला सामोरे जाण्याआधी महायुती व आघाडीतील घटकपक्षांना हीच लढाई पहिल्यांदा जिंकावी लागेल. त्यात यश मिळवून मुख्य लढाईसाठी हे घटक पक्ष एकत्र येतात का, हेच आता पहायचे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.