मध्यप्रदेशातील बटेश्वर मंदिर
मध्यप्रदेशच्या मुरैना जिल्ह्यानजीक एकाहून एक भव्य मंदिरं उभी आहेत. या मंदिरांची निमिर्ती गुर्जर प्रतिहार राजांनी नवव्या शतकात केली होती. परंतु शेकडो वर्षांपर्यंत ही मंदिरं घनदाट जंगलात हरवली होती. चंबळमध्ये दरोडेखोरांची दहशत असल्याने देखील लोक तेथेपर्यंत पोहोचू शकले नव्हते. परंतु आता भारतीय पुरातत्व विभागाच्या मेहनतीनंतर ही मंदिरं पुन्हा आकार घेऊ लागली आहेत. मागील काही काळात देशांतर्गत तसेच विदेशी पर्यटकांचा या स्थळाकडील ओढा वाढला आहे. हे स्थळ आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावरही स्वत:चे स्थान निर्माण करू लागले आहे.
मध्यप्रदेशचा मुरैना जिल्हा चंबळ विभागाच्या अंतर्गत येतो. तर चंबळमध्ये कधीकाळी दरोडेखोरांचेच वर्चस्व होते. या दरोडेखोरांच्या दहशतीच्या कहाण्या पूर्ण देशाने ऐकल्या असून बॉलिवूडमध्ये यावर अनेक चित्रपटही निर्माण झाले आहेत. परंतु याच भागात कधीकाळी एकाहून एक सुंदर मंदिरं असायची. काळाच्या चक्रात पडझड होऊनही या मंदिरांची भव्यता आजही सर्वांना आकर्षित करते.
गुर्जर-प्रतिहार राजांकडून निर्मिती
बटेश्वरच्या मंदिरांची निर्मिती गुर्जर-प्रतिहार राजांकडून करण्यात आली होती असे सांगण्यात येते. तेथे बलुआ दगडाच्या मदतीने 200 मंदिरे निर्माण करण्यात आली आहेत. हा मंदिर समूह उत्तर भारतीय मंदिर वास्तुकलेच्या प्रारंभिक गुर्जर-प्रतिहार शैलीचा मंदिर समूह आहे. मंदिरांचा आकार प्रामुख्याने छोटा असला तरीही सुमारे 25 एकर भागात त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ही मंदिरे भगवान शिव, विष्णू आणि शक्तिला समर्पित आहेत. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम ग्वाल्हेर येथे जावे लागते, तेथून बटेश्वरची मंदिरे सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहेत. तर दुसरा मार्ग मुरैना शहरातून जातो, तेथून या ऐतिहासिक स्थळाचे अंतर सुमारे 30 किलोमीटर आहे.
गजनीच्या आक्रमणानंतर पतन
बटेश्वर मंदिर 8 व्या आणि 10 व्या शतकादरम्यान निर्माण करण्यात आली होती. 1008 साली महमूद गजनीने उत्तर भारतावर आक्रमण केले होते आणि कन्नौजवर नियंत्रण मिळविले होते. त्यानंतर गुर्जर-प्रतिहार राजघराण्याचे पतन झाले. त्यानंतर कुठल्याही राजघराण्याचे आर्थिक आणि सांस्कृतिक संरक्षण या ठिकाणाला मिळाले नाही. याचमुळे या स्थानावरील सांस्कृतिक घडामोडी बंद झाल्या असण्याची शक्यता असल्याचे प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक एस. के. द्विवेदी यांनी सांगितले आहे.
12 व्या आणि 13 व्या शतकात हिंदुस्थानच्या अनेक हिस्स्यांमध्ये अधिक तीव्रतेचे भूकंप झाल्याने अनेक ऐतिहासिक स्थळांचे नुकसान झाले. त्याच काळात बटेश्वर आणि मितावलीचेही अनेक हिस्से कोसळले आणि त्यानंतर त्यांची देखभाल करणारा कुणीच राहिला नसावा असे के. के. मोहम्मद यांचे मानणे आहे.
तर मंदिरांचे आता जे स्वरुप दिसून येत आहे, त्यामागील कारण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआयचे अधिकारी आहेत. विशेषकरून याचे श्रेय के.के. मोहम्मद यांना जाते, ज्यांनी 2005 मध्ये सुरू करण्यात आलेल्या एका प्रकल्पाच्या अंतर्गत या अवशेषांच्या दगडांना पुन्हा जोडून मंदिराचा आकार दिला होता. जगात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत शतकांपेक्षा जुन्या मंदिरांना मूळ स्वरुप प्राप्त करून देण्यात आले आहे. या परिसरात सर्वात मोठे मंदिर विष्णू मठ मंदिर असून ते दगडांचा ढिगच ठरले होते. परंतु इन्फोसिस फौंडेशनकडून मिळालेल्या निधीनंतर हे मंदिर पुन्हा उभे राहिले आहे. सुमारे अडीच वर्षांच्या मेहनतीनंतर साडे नऊ मीटर उंच विष्णू मठ मंदिर तयार झाले आहे. विष्णू मठ मंदिराचा चबुतरा साडेसात फूट उंच आहे.
दरोडेखोरांशी आमना-सामना
बटेश्वरमध्ये जेव्हा आम्ही काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या काळात एक व्यक्ती येथील डोडामल मंदिराच्या आत बसून विडी ओढत होता, त्याला पाहून मी संतापलो आणि त्याच्याकडे पोहोचलो, मंदिरात धूम्रपान करताना लाज वाटत नाही का असे मी त्याला खडसावून विचारले होते. तो मला पाहत होता, परंतु माझ्याशी काहीच बोलला नाही. त्यावेळी माझ्यासोबत जो सहाय्यक होता, त्याने माझा हात पकडला आणि तुम्ही त्याला काहीच बोलू नका असे सुचविले. तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला, त्यानंतर तो दरोडेखोर निर्भय सिंह गुर्जर असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्याच्या पायांवरच लोळण घेतल्याचा अनुभव के. के. मोहम्मद यांनी सांगितला आहे.
बटेश्वर येथील सर्व मंदिरं ही गुर्जर-प्रतिहार राजघराण्याने निर्माण केली होती. निर्भय सिंह गुर्जर हा देखील त्याच परिवाराशी संबंधित होता, कारण त्याचे नाव देखील गुर्जर होते असा संदर्भ त्याला दिला होता. यानंतर आम्ही त्याच्याशी बराचवेळ बोलत होतो. यानंतर त्याने मंदिरांच्या पुनर्निर्मितीत मोठे सहकार्य केल्याची माहिती के. के. मोहम्मद यांनी दिली आहे.
इतिहास
इतिहासकारांनुसार या मंदिरांची उभारणी सम्राट विजयपाल प्रतिहार यांच्या शासनकाळात पूर्ण झाली होती. ही बलुआ दगडांनी निर्मित बहुतांश करून भगवान शिवाला समर्पित आहेत. पर्यटकांसाठी हे स्थळ अत्यंत उत्सुकता वाढविणारे आहे. हे स्थळ अनेक रहस्यांना स्वत:मध्ये सामावून आहे. अखेर एकाच ठिकाणी इतकी मंदिरं का उभारण्यात आली तसेच सर्व मंदिरांमधील शिवलिंग एकसारखे का आहे असे प्रश्न लोकांच्या मनात तयार होतात. ही शिवलिंग साधनेसाठी निर्माण करविण्यात आली होती असे स्थानिक लोकांचे मानणे आहेत. परंतु याची पुष्टी देणारे पुरावे मिळालेले नाहीत.
वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
या मंदिराची कलाकृती आठव्या शतकाशी संबंधित आहे. मंदिराची रचना वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. सर्वप्रथम 1882 मध्ये या स्थळाची ओळख अलेक्झेंडर कनिंघम यांनी पटविली होती. यानंतर प्रोफेसर मायकल मीस्टर यांनी येथे सर्वेक्षण केले होते. 2005 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पुरातत्व अधिकारी के.के. मोहम्मद यांच्या नेतृत्वात मंदिरांचे संरक्षण सुरू केले होते. यादरम्यान सुमारे 60 मंदिरांची पुनउ&भारणी करण्यात आली.
मितावलीचे 64 योगिनी मंदिर
बटेश्वरनजीकच 64 योगिनीचे मंदिर आहे. त्याची स्थापत्यकला आणखी कुठलेच दिसून येत नाही. योगिनी मंदिरात तंत्र-मंत्र होत असावे. सर्वसाधारण समुदाय जे स्वीकारत नाही, तेथे ते सर्व होते. त्याचा अनुभवही घेता येतो. अशाप्रकारची आणखी अनेक मंदिरे भारतात आहेत. परंतु त्यातील सर्वात मोठी महत्त्वाची भूमिका येथील मंदिर बजावत असल्याचे के. के. मोहम्मद यांनी सांगणे आहे.
64 कक्षांमध्ये प्रत्येकी एक शिवलिंग
गुर्जर प्रतिहार वंशाचे 10 वे शासक सम्राट देवपाल गुर्जर यांनी लाल-करड्या रंगाच्या बलुआ दगडांच्या मदतीने या मंदिराची उभारणी 9 व्या शतकात केली होती. मंदिरामध्ये 101 स्तंभ आणि 64 कक्षांमध्ये प्रत्येकी एक शिवलिंग आहे. परिसरादरम्यान एक मोठे वर्तुळाकृती शिव मंदिर देखील आहे.
हिंदुस्थानात नाही असे एकही ठिकाण
बटेश्वरमध्ये 200 मंदिरे आहेत. एकाच ठिकाणी 200 मंदिरं असणारे स्थळ हिंदुस्थानात अन्यत्र कुठेच नाही. या मंदिरांमध्ये विविध शैलीची स्थापत्यकला दिसून येत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. काही मंदिरं शिखरयुक्त आहेत, तर काही मंडपीय आकाराची मंदिरं देखील आहेत. 9 व्या ते 12 व्या शतकाच्या 300 वर्षांच्या कालावधीत या मंदिरांची निर्मिती होत राहिली. खजुराहोच्या मंदिरांच्या निर्मितीच्या 200 ते 300 वर्षांपूर्वी ही मंदिरं निर्माण करण्यात आली होती. यामुळे या मंदिरांचे खास महत्त्व आहे.
- के. के. मोहम्मद, पुरातत्व विभागाचे संचालक (निवृत्त)
ऐतिहासिक स्मारक घोषित
भारतातील जुन्या संसद भवनाप्रमाणे येथील मंदिरात 101 स्तंभ निर्माण करण्यात आले आहेत. ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन लुटियन्स यांनी भारताच्या संसद भवनाचे डिझाइन तयार केले होते. लुटियन्स हे याच चौसष्ठ योगिनी मंदिराने प्रेरित होते असे मानले जाते. या मंदिराला भारतीय पुरातत्व विभागाने प्राचीन ऐतिहासिक स्मारक घोषित केले आहे.
येथे कसे पोहोचाल?
मुरैना आणि भिंड जिल्ह्यात रेल्वेस्थानक आहे. ग्वाल्हेर रेल्वे स्थानकावरून बस किंवा टॅक्सीद्वारे देखील येथे पोहोचता येऊ शकते. सर्व जिल्हे बससुविधेद्वारे चांगल्याप्रकारे जोडले गेले आहेत. पर्यटक स्वत:चे खासगी वाहन किंवा भाड्याच्या वाहनाद्वारे तेथे पोहोचू शकतात.
- संकलन : उमाकांत कुलकर्णी