‘बटेंगे तो कटेंगे’ चे संघाकडून समर्थन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिंदूंनी एकत्रितरित्या मतदान न केल्यास त्यांचीच मोठी हानी होऊ शकते, असा इशारा देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा संदेश हिंदूंना दिला आहे. या संदेशावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या विधानाचे समर्थन केले असून हे विधान हिंदूंना योग्य दिशा दर्शविणारे आहे, अशा अर्थाचे प्रतिपादन केले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा विपरीत अर्थ काढण्यात आला असून विरोधी पक्ष या विधानावरुन अपप्रचार करीत आहेत. या विधानाचा अर्थ ‘एकात्मतेत शक्ती असते’ असा आहे. कोणताही समाज फुटीने ग्रासला तर त्याचे सामर्थ्य कमी होऊन तो प्रभावहीन होतो. हिंदू समाजाच्या संदर्भातही हे सत्य आहे त्यामुळे हिंदू समाजाच्या सर्व घटकांनी आपल्यातील मतभेद विसरुन सर्व क्षेत्रांमध्ये एकत्रितरित्या उभे राहण्याची आवश्यकता आहे. हे न केल्यास हिंदू समाजालाच वाईट परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा योग्य तो अर्थ हिंदू घेतील. सध्या देशात हिंदूंना तोडण्याचे काम काही देशविरोधी शक्ती करीत असून त्यांचे कुटील डावपेच हाणून पाडण्याची आवश्यकता आहे, अशा आशयाचे वक्तव्य संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. त्यांनी संघाच्या देशभरातील कार्याविषयी माहितीही पत्रकारांना दिली.