धरण निर्मितीला बसुर्ते ग्रामस्थांचा विरोध
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : सुपीक जमीन जाणार असल्याने प्रशासनाने धरण बांधण्याचा निर्णय मागे घ्यावा
बेळगाव : बसुर्ते (ता. बेळगाव) येथे नव्याने धरणाचे बांधकाम करण्यात येणार आहे. परंतु या धरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित करण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने जिल्हा प्रशासनाने धरण बांधण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी बसुर्ते ग्रामस्थांतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. बसुर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी बुधवारी जिल्हाधिकारी तसेच जि. पं. सीईओ व पाणीपुरवठा मंडळाला निवेदन देऊन आपला विरोध दर्शविला. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. बसुर्ते गावामध्ये यापूर्वी एक धरण असतानाही पुन्हा आणखी एका धरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. या धरणासाठी मंजुरीही मिळाल्याचे सांगितले जात असल्याने यामुळे स्थानिक शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय
बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनाही निवेदन देण्यात आले. बुडाचा अध्यक्ष या नात्याने आपण शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहचवू असे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून आपण या संदर्भात पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
200 हून अधिक एकर जमीन भूसंपादनाची शक्यता
अंदाजे 200 हून अधिक एकर जमिनीचे भूसंपादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना भूमीहीन होण्यापासून वाचवा अशी विनंती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी माजी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, पुंडलिक पावशे, पुंडलिक मोरे, नेताजी बेनके, बसवंत बेनके, रमेश घुमटे, भरमा सावंत, विजय सावंत, लक्ष्मण घुमटे, मल्लाप्पा बेनके, दत्ता बेनके, सुरज सुतार, लक्ष्मी कुराडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.