बशुदेवचा पाठलाग करणारी कार जप्त
बेळगावचे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात
पणजी : सांत इस्तेव टोलटो येथे फेरीबोट धक्क्यावरुन कार थेट नदीत बुडाल्याच्याप्रकरणात सदर कारचा पाठलाग करणारी कार ओल्ड गोवा पोलिसांच्या हाती लागली आहे. हुबळी येथे ती कार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे जाऊन पोलिसांनी ती कार आणि दोघांना अटक केली आहे. यासीम गौस (32, बेळगाव) आणि सलमान गौस (28, रुक्मिणीनगर-बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना आवश्यक त्यावेळी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना देऊन सोडण्यात आले आहे.कारसह नदीत बुडालेल्या बशुदेव भंडारी याचे तपासकाम सुरु आहे. 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास कार नदीत गेली होती. ती बुशदेव चालवत होता. त्यात बसलेल्या युवतीने पोहून किनारा गाठला होता. जप्त केलेली कार वास्को येथील असून ती बेळगावच्या एका व्यक्तीला
विकण्यात आली होती. अपघाताच्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी कारमालकाचे मित्र यासीर आणि सलमान हे गोव्यात कॅसिनोत खेळण्यासाठी आले होते. मध्यरात्री बेळगाव परताना बुशदेव आणि त्यांच्या कारचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर बशुदेवने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यासीम आणि सलमान यांनी त्यांचा पाठलाग केला. अखेर बशुदेव आणि त्याची मैत्रिण कारसहित कुंभारजुवे नदीत गेली होती. बशुदेव हा गुजरातमधील आहे. बशुदेव भंडारी याचा भाऊ नारायण भंडारी (गुजरात) यांनी याबाबत ओल्ड गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भान्यासंच्या कलम 351 (3), 126 (2) अंतर्गत अज्ञात संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुऊ आहे.