गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलचा होणार कायापालट
पीव्हीजी कंपनीचा प्रस्ताव : अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न, रहदारी पोलिसांसह माजी नगरसेवकांकडून सर्कलची पाहणी
बेळगाव : गोवावेस येथील बसवेश्वर सर्कल अपघातांचा काळ ठरत आहे. योग्यप्रकारे सिग्नल दिसत नसून सर्कलमधून वाहने हाकताना अडथळे येत असल्याचे निवेदन काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापौरांना दिले होते. याची दखल घेत बुधवारी पीव्हीजी ग्रुप सर्कलचा विकास करण्यासाठी पुढे सरसावला आहे. रहदारी पोलिसांच्या समवेत सर्वांनी बसवेश्वर सर्कलची पाहणी करून सूचना नोंदविल्या.
अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या गोवावेस सर्कलची बुधवारी पाहणी करण्यात आली. शहापूर, आरपीडी सर्कल, महात्मा फुले रोड व रेल्वे स्टेशन रोड असे चार रस्ते एकाच ठिकाणी येतात. परंतु योग्यरित्या सिग्नल दिसत नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अपघात झाले आहेत तेथे पाहणी करण्यात आली. पोलीस अधिकारी व महानगरपालिकेने सर्कलच्या विकासाचा आराखडा दिल्यास त्याप्रमाणे सुशोभीकरणाचे काम केले जाणार असल्याचे पीव्हीजी ग्रुपने स्पष्ट केले.
पीव्हीजी ग्रुपचे संचालक प्रसन्ना घोटगे यांच्या संकल्पनेतून सर्कलचा विकास केला जाणार आहे. सर्कलमध्ये यापूर्वी पाण्याचे कारंजे होते. परंतु रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना पाणी कनेक्शन व वीज कनेक्शन तोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, राजू पवार, पीव्हीजी ग्रुपचे व्यवस्थापक नंदकुमार कंग्राळकर, अशोक नेसरीकर, रहदारी पोलीस स्थानकाचे सीपीआय बसवनगौडा पाटील, पीएसआय अभिषेक नाडगौडा, हवालदार संतोष भावी, पिंटू पाटील, रमेश गस्ती, विनय राजगोळकर यासह इतर उपस्थित होते.
निवेदनाला आले यश
बसवेश्वर सर्कल येथे मागील दोन वर्षांत तीन ते चार जणांना जीव गमवावा लागला आहे. भरधाव वाहनांना सिग्नल दिसत नसल्यामुळे तसेच मुख्य सर्कलमध्ये वाहने योग्यरित्या वळत नसल्यामुळे हे अपघात होत असून सर्कलचा विकास करावा, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापौर मंगेश पवार यांना बुधवार दि. 19 नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेऊन बुधवारी पीव्हीजी ग्रुपने सर्कलच्या विकासाचा प्रस्ताव मांडला आहे.