शहरात बसव संस्कृती महामहोत्सव उत्साहात
समाजबांधवांच्यावतीने भव्य रथयात्रा : शिवबसवनगर येथे मेळावा
बेळगाव : राज्य सरकारने महात्मा बसवेश्वर यांना सांस्कृतिक नेते म्हणून घोषित केले आहे. याला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त बसव संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. लिंगायत मठाधीश महासंघ, जागतिक लिंगायत महासभा, शरण साहित्य परिषद, राष्ट्रीय बसव दल, लिंगायत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 11 वाजता बसव संस्कृती अभियान रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. यानंतर शिवबसवनगर येथील आर. एन. शेट्टी महाविद्यालयात विद्यार्थी व सार्वजनिक यांच्यातील संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध मठाधीश, मान्यवर सहभागी झाले होते. महात्मा बसवेश्वर यांचे तत्त्वज्ञान व सामान्य नागरिकांपर्यंत वचन साहित्य पोहोचविणे या उद्देशाने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सायंकाळी 4.30 वाजता कॉलेज रोडवरील लिंगराज महाविद्यालयापासून बसव संस्कृती महामहोत्सव रथयात्रेला प्रारंभ झाला. राणी चन्नम्मा सर्कलमार्गे कृष्णदेवराय सर्कल ते शिवबसवनगर येथील एस.जी.बी.आय.टी. महाविद्यालयापर्यंत रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेत महात्मा बसवेश्वर, अक्कमहादेवी यांच्यासह विविध संतांच्या वेषभूषा साकारण्यात आल्या होत्या. रथयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मोठ्या संख्येने समाजबांधवही सहभागी झाले होते. याप्रसंगी महाविद्यालय क्रीडांगणावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, जगद्गुरु डॉ. गंगामाताजी, डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामीजी, पं. शिवाचार्य महास्वामीजी, पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, सिद्धबसव कबीर महास्वामीजी, शरण श्री शिवलींग हेडे, बसवराज रोटी, डॉ. एस. एम. दोड्डमनी, अशोक भेंडिगेरी, अवक्का जोल्ले यांच्यासह विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, समाजबांधव व विद्यार्थी उपस्थित होते.