For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भंडाऱ्याच्या उधळणीत बसरीकट्टी महालक्ष्मी रथोत्सव

11:34 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
भंडाऱ्याच्या उधळणीत बसरीकट्टी महालक्ष्मी रथोत्सव
Advertisement

यात्रेला भाविकांची अमाप गर्दी : अक्षतारोपण, ओटी भरणे, रथोत्सव उत्साहात

Advertisement

वार्ताहर /सांबरा

बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला असून बुधवारी अक्षतारोपण, ओटी भरणे, रथोत्सव आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कार्यक्रमांमध्ये हजारो भाविक लक्ष्मीदेवीचा जयजयकार करत सहभागी झाले होते. त्यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी पहाटे अक्षतारोपणासाठी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर अक्षतारोपण होऊन देवीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी देवीचे दर्शन व हक्कदारांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. आकर्षक रथामध्ये देवी विराजमान झाली होती. भंडाऱ्याची उधळण करत रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी लक्ष्मीदेवीचा जयघोष करण्यात येत होता. सायंकाळच्या सुमारास देवी गदगेवर विराजमान झाली. हा देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गुरुवार दि. 15 व शुक्रवार दि. 16 रोजी भाविकांनी एकाच मार्गाने न येता पर्यायी रस्त्यांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बसरीकट्टी गावाला जाण्यासाठी शिंदोळी क्रॉसपासून मुख्य रस्ता आहे. तसेच मुतगा येथूनही पर्यायी रस्ता आहे. हलगा परिसरातील भाविकांसाठीही पर्यायी रस्ता आहे. सध्या यात्रेनिमित्त स्टॉल्स, पाळणे, खेळण्यांची दुकाने, हॉटेल्स आदी दाखल झाले आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मारीहाळ पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisement

यात्राकाळात पाणीटंचाई

सध्या यात्रेच्या तोंडावर गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ टँकरने पाणी मागवून घेत आहेत. मात्र, या संधीचा फायदा घेत परगावच्या काही टँकरचालकांकडून जादाची रक्कम लाटण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित खात्याकडून यात्रा काळात सुरळीत पाणीपुरवठा करावा व यात्रा काळातील पाणीटंचाई त्वरित दूर करावी, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.