अवजड वाहतुकीला आळा घालण्यासाठी बॅरल उभारणी
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अडथळ्यांमुळे डोकेदुखी
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डने अवजड वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यावर लोखंडी कमानीनंतर आता लोखंडी बॅरल ठेवले आहेत. यामुळे अवजड वाहतूक रोखली जाईल की नाही, हे माहिती नाही. परंतु, यामुळे अपघात मात्र वाढले आहेत. ग्लोब थिएटर कॉर्नर व गांधी स्मारक अशा दोन्ही ठिकाणी बॅरल ठेवण्यात आल्याने वाहतूक करणे अवघड झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कॅम्प परिसरात अनेक शाळा आणि रहिवासी वसाहती आहेत. शहरातून हिंडलग्याच्या दिशेने जाणारी वाहने कॅम्प भागातूनच ये-जा करत होती. बऱ्याच वेळा अपघात झाल्याने पालकांकडून अवजड वाहतूक रोखण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत कॅन्टोन्मेंटने अवजड वाहतूक बंद करण्यासाठी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. तसेच ग्लोब थिएटर कॉर्नर व गांधी स्मारक या ठिकाणी लोखंडी कमानी उभारल्या.
काही दिवसांपूर्वीच कदंबा बसने धडक दिल्याने यातील एक कमान मोडली. तसेच दुसऱ्या कमानीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटने आता या ठिकाणी लोखंडी बॅरल ठेवले आहेत. परंतु, हे बॅरल चुकविताना दुचाकीसह चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. विशेषत: सकाळी व संध्याकाळी शाळेच्या वेळेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून हे बॅरल डोकेदुखीचे ठरू लागले आहेत. अवजड वाहतूक रोखण्यासाठी इतर पर्याय राबविणे गरजेचे आहे. परंतु, बॅरलमुळे अपघात होत असून ते त्वरित हटवावेत, अशी मागणी होत आहे. बॅरल लावल्याने अवजड वाहतूक कशी काय रोखली जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समोरील वाहन बॅरलमधून पुढे गेल्याशिवाय दुसरे वाहन पुढे जात नसल्याने गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीही होत आहे.