बडोद्याचे टी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
20 षटकांत 349 धावांचा डोंगर : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रचला इतिहास : युवा फलंदाज भानू पनियाची 51 चेंडूत 134 धावांची तुफानी खेळी
वृत्तसंस्था/इंदोर
जागतिक क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की 300 धावा करणे म्हणजे खूप कठीण होते. अनेक संघ 250 च्या जवळपास गेल्यावरही सामने जिंकायचे. पण आता काळ खूप बदलला आहे. आता वनडे सोडा, टी-20 मध्ये सुद्धा 300 पेक्षा जास्त धावा झालेल्या सामन्यात टी-20 इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या करण्याबरोबरच, बडोद्याने एका टी-20 डावात सर्वाधिक 37 षटकार मारण्याचा विक्रमही केला. याशिवाय टी-20 सामन्याच्या एका डावात षटकार आणि चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 294 धावांचा विक्रमही नोंदवला गेला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासात 300 हून अधिक धावांची ही पहिलीच धावसंख्या होती. याआधी या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या पंजाबने गेल्या हंगामात म्हणजेच 2023 मध्ये केली होती. आंध्र प्रदेशविरुद्ध सामन्यात पंजाबने 20 षटकांत 275/6 धावा केल्या होत्या.
गुरुवारी असाच काहीसा प्रसंग भारतातील स्थानिक क्रिकेटमध्ये घडला आणि काही क्षणात तो वर्ल्ड रेकॉर्ड देखील झाला. सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी बडोदा आणि सिक्कीमचे संघ आमनेसामने होते. बडोदा संघ प्रथम फलंदाजीला उतरला, तेव्हा असा चौकार-षटकारांचा पाऊस पडला की तब्बल 20 षटकांत 349 धावांचा डोंगर उभा राहिला. यासह बडोद्याने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च अशी धावसंख्या उभारली.
या सामन्यात बडोद्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 5 बाद 349 धावा केल्या. यादरम्यान, भानू पनियाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 51 चेंडूत 5 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने नाबाद 134 धावा केल्या. भानूने केवळ चौकार आणि षटकारांच्या जोरावर 20 चेंडूत 110 धावा केल्या. या डावात त्याचा स्ट्राइक रेट 262.75 इतका होता. पनियाने 20 चेंडूत अर्धशतक आणि 42 चेंडूत शतक पूर्ण करून त्याची प्रतिभा सिद्ध केली. इंदोरच्या मैदानात त्याने तुफानी फटकेबाजी करताना सिक्कीमविरुद्ध आपले पहिले शतक झळकावले. पनियाशिवाय शिवालिक शर्मा (55), अभिमन्यू सिंग (53) आणि विष्णू सोलंकी (50) यांनी झटपट अर्धशतके झळकावली. शाश्वत रावतने 43 धावांचे योगदान दिले.
बडोद्याचा 263 धावांनी दणदणीत विजय
विजयासाठी दिलेल्या 350 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिक्कीमला 7 बाद 86 धावा करता आल्या. बडोद्याच्या भेदक गोलंदाजीसमोर सिक्कीमच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. रॉबिन लिम्बोने सर्वाधिक 20 धावा केल्या तर अंकूर मलिकने नाबाद 18 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले. बडोद्याने हा सामना 263 धावांनी विजय मिळवताना दणदणीत विजयाची नोंद केली.
अभिषेक शर्माचे 28 चेंडूत शतक
राजकोट : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने मेघालयविरुद्ध शानदार फलंदाजी करत सर्व विक्रम मोडीत काढले. अभिषेक शर्माने अवघ्या 28 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. जे की टी 20 मध्ये भारतीयाद्वारे संयुक्त सर्वात वेगवान शतक ठरले आहे. अभिषेकने उर्विल पटेलने आठ दिवसांपूर्वी 27 नोव्हेंबरला केलेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अभिषेकने पहिल्या 10 चेंडूत 44 धावा केल्या होत्या. त्याने अवघ्या 14 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही अभिषेकची बॅट शांत राहिली नाही. त्याने 28 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शेवटी 29 चेंडूत 106 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याने आपल्या एकूण खेळीत 8 चौकार आणि 11 षटकार मारले. अभिषेकने 106 पैकी 98 धावा केवळ चौकारांच्या जोरावर केल्या. या नाबाद शतकी खेळीसह त्याने अनोखा विक्रमही आपल्या नावे केला. मागील आठवड्यातच गुजरातचा यष्टिरक्षक फलंदाज उर्विलने त्रिपुराविरुद्ध 28 चेंडूत शतक झळकावले होते.
टी-20 मध्ये बडोद्याच्या सर्वाधिक धावा
टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता, ज्यांनी या वर्षी ऑक्टोबरमध्ये झांबियाविरुद्ध 344 धावा केल्या होत्या. पण आता बडोदा संघ टी-20 सर्वात मोठ्या धावसंख्येच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
- बडोदा 349/5 वि सिक्किम - 2024
- झिम्बाब्वे 344/4 वि गाम्बिया - 2024
- नेपाल 314/3 वि मंगोलिया - 2023
- भारत 297/6 वि बांगलादेश ा 2024
- टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या - 349
- एका टी-20 डावात सर्वाधिक षटकार - 37
- एका टी-20 डावात चौकार-षटकाराच्या मदतीने सर्वाधिक धावा - 294
- सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या.
संक्षिप्त धावफलक
बडोदा 20 षटकांत 5 बाद 349 (शाश्वत रावत 43, अभिमन्यूसिंग रजपूत 53, भानू पनिया नाबाद 134, शिवालिक शर्मा 55, विष्णू सोलंकी 50, रोशन कुमार व तमंग प्रत्येकी दोन बळी) सिक्कीम 20 षटकांत 7 बाद 86 (रॉबिन लिम्बो 20, अंकुर मलिक नाबाद 18, महेश पिथ्य, निनाद राठवा प्रत्येकी दोन बळी).