बडोद्याने चमत्कार केला अन्
रोमांचक सामन्यात मुंबईचा धुव्वा उडवला : रणजी चषकातील पहिल्याच सामन्यात मुंबईचा पराभव
वृत्तसंस्था/ बडोदा
अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, श्रेयस लाड, शम्स मुलाणी, तनुष कोटियन अशी मुंबईची संपूर्ण प्लेइंग इलेव्हन पाहिल्यास कोणत्याही संघाला घाम फुटेल. या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाला पराभूत करण्याची ताकद आहे. पण असे असतानाही कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखालील बडोद्याने अप्रतिम कामगिरी करत मुंबईचा 84 धावांनी धुव्वा उडवला आहे. वडोदरा येथील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रणजी चषकातील पहिल्याच सामन्यात मुंबईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
रणजी चषकातील पहिल्या सामन्यात बडोद्याने पहिल्या डावात 290 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 214 धावांच करु शकला. यानंतर 76 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात बडोद्याचा संघ 185 धावांत गारद झाला व मुंबईला विजयासाठी 262 धावांचे टार्गेट मिळाले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 177 धावांवर ऑलआऊट झाला. बडोद्याने शानदार कामगिरीच्या जोरावर 42 वेळ चॅम्पियन मुंबईला तब्बल 26 वर्षानंतर नमवण्याची किमया साधली. सामनावीर भार्गव भट्टने 10 विकेट्स घेत बडोद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
भार्गव भट्टचे 6 बळी, मुंबई पराभूत
बडोद्याला दुसऱ्या डावात 185 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईला विजयासाठी 262 धावांचे लक्ष्य मिळाले. तिसऱ्या दिवशी पृथ्वी शॉ आणि हार्दिक तोमोरच्या विकेट्स गमावल्यानंतर मुंबईने 2 बाद 42 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरुन मुंबईने चौथ्या दिवशी खेळायला पुढे सुरुवात केले. डावातील चौथ्याच षटकात रहाणेला (12) भार्गवने बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. हार्दिक तोमोरही 6 धावांवर रनआऊट झाल्याने मुंबईची 4 बाद 63 अशी स्थिती झाली होती.
भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेला श्रेयस अय्यर, सिद्धेश लाडसह मुंबईचा डाव पुन्हा रुळावर आणण्यात यशस्वी ठरला. या दोघांनी 41 धावांची भर घातली पण भार्गव भट्टच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर 30 धावा काढून बाद झाला. यानंतर शम्स मुलाणी व शार्दुल ठाकुरही पाठोपाठ बाद झाल्याने मुंबईचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. 137 धावांत 8 विकेट गमावलेल्या सिद्धार्थ लाडने (94 चेंडूत 59) मुंबईला निश्चितपणे 177 धावांपर्यंत नेले. मात्र त्याची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. मुंबईचा संघ 48.2 षटकांत 177 धावांवर ऑलआऊट झाला. भार्गव भट्टने 55 धावांत 6 बळी घेत बडोद्याच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
बडोदा पहिला डाव 290 व दुसरा डाव 185,मुंबई पहिला डाव 214 व दुसरा डाव 48.2 षटकांत सर्वबाद 177 (आयुष म्हात्रे 22, श्रेयस अय्यर 30, सिद्धेश लाड 59, भट्ट 6 बळी, पृथ्या 2 बळी).
26 वर्षानंतर मुंबईला हरवले
रणजी चषकातील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबईला बडोद्याने 84 धावांनी पराभूत केले. या विजयानंतर बडोद्याचा कर्णधार कृणाल पंड्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आनंदोत्सव साजरा केला. गेली 26 वर्षे आम्ही मुंबईविरुद्ध विजयाची वाट पाहत होतो आणि तो आज मिळाला. या संघाचा सार्थ अभिमान आहे, अशी पोस्ट कृणाल पंड्याने केली आहे. 1998-99 साली बडोद्याने मुंबईला नमवले होते यानंतर तब्बल 26 वर्षानंतर बडोद्याने हा कारनामा केला आहे.
महाराष्ट्र-जम्मू सामना अनिर्णीत, गोवा, हरियाणा, रेल्वेचे विजय
श्रीनगर येथे झालेला जम्मू काश्मीर व महाराष्ट्र यांच्यातील सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जम्मूला 3 तर महाराष्ट्राला 1 गुण मिळाला. गोवा, हरियाणा, रेल्वे, तामिळनाडू आणि सिक्कीम यांनी रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये विजयाने सुरुवात केली आहे. पहिला सामना गोव्याने मोठ्या फरकाने जिंकला. गोव्याने मणिपूरचा 9 गडी राखून पराभव केला. तर हरियाणाने बिहारचा एक डाव आणि 43 धावांनी पराभव केला. रेल्वेने चंदीगडचा 181 धावांनी पराभव केला. तमिळनाडूनेही सौराष्ट्रचा एक डाव आणि 65 धावांनी पराभव केला. नागालँडने अरुणाचल प्रदेशचा एक डाव आणि 290 धावांनी पराभव केला. सिक्कीमने मिझोरानचा 137 धावांनी पराभव करत आपले खाते उघडले.