वर्धापनदिनानिमित्त बार असो.कडून विविध कमिट्यांची स्थापना
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनला यंदा 150 वर्षे पूर्ण होत असल्याने मोठ्या प्रमाणात वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. याबाबत चर्चा करून कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी गुरुवार दि. 31 रोजी जिल्हा कोर्ट कॉम्प्लेक्समधील टीव्ही हॉलमध्ये सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी 4 ते 5 ऑक्टोबर रोजी वर्धापन दिन साजरा करण्यासह विविध कमिट्या स्थापन करण्यात आल्या. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बार असोसिएशनमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची सूचना करण्यात आल्याने यावेळी सुधारित बायलॉ सर्वांनुमते पारित करण्यात आला. जिल्हा कोर्ट कॉम्प्लेक्समधील टीव्ही हॉलमध्ये गुरुवारी पार पडलेल्या बार असोसिएशनच्या सर्वसाधारण बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. एस. एस. किवडसण्णावर होते. वर्धापन दिन कार्यक्रम 4 व 5 ऑक्टोबर रोजी साजरा करण्याबाबत बैठकीत शिक्कमोर्तब करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटी, आर्थिक, त्याचबरोबर इतर विविध कमिट्यांची स्थापना करण्यात आली. ज्या कोणाला कमिटीत सहभागी होऊन काम करायचे आहे, त्यांना संधी दिली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बार असोसिएशनमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार बैठकीत चर्चा करून नवीन बायलॉला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार यापुढे दोन उपाध्यक्षपदांपैकी एका पदावर महिला, खजिनदारपदी महिला, कमिटीतील 7 सदस्यांपैकी तीन महिला वकिलांना स्थान दिले जाणार आहे, असे महत्त्वपूर्ण निर्णय सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अॅड. बसवराज मुगळी, अॅड. शीतल रामशेट्टी, जनरल सेक्रेटरी अॅड.यल्लाप्पा दिवटे, सहसचिव अॅड. विश्वनाथ सुलतानपुरी यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकीलवर्ग उपस्थित होता.