गणेशभक्तांना चढला बाप्पाचा ‘फिवर’!
सर्वत्र उत्साह अन् आनंदी आनंद : खरेदीसाठी बाजारापेठा फुलल्या,आज हरितालिका, उद्या श्रीगणेशपूजा
पणजी : राज्यात गणेशचतुर्थीचा ‘फिवर’ भक्त मंडळींना चढला असून आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत घराघरात गणेशमूर्ती पोहोचतील. उद्या शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त श्रीगणेशाच्या पुजेला प्रारंभ होईल. राज्यात या उत्सवानिमित्त सर्वांचीच धावपळ सुरू झाली आहे. बाजारपेठांमध्ये चतुर्थीनिमित्त लागणारी फळफळावळ, भाजी, गणपतीसमोरील सजावटीस लागणारे साहित्य खरेदीसाठी एकच गर्दी उसळली आहे. राज्यातील बहुतांश रस्त्यांवर ‘ट्रॅफिक जॅम’ होत आहे. गोव्यातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ‘चवथ’साठी जनतेची धावपळ सुरू आहे. आज सायंकाळपर्यंत घराघरांमध्ये चित्रशाळेतून गणपती पोहोचतील. राज्य सरकारने शाळांना एक आठवडा सुट्टी जाहीर केली आहे. उत्सव शनिवारी सुरु होत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची दोन्ही दिवसांची सुट्टी वाया गेली आहे.
बाजारापेठा गेल्या फुलून
गणेशोत्सवासाठी राज्यातील सर्व बाजारपेठा सजलेल्या आहेत. साहित्य खरेदीसाठी माणसांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गोव्यातील पारंपरिक गणेशचतुर्थी उत्सवात गणपतीसमोर फार मोठी आरास तथा देखावा उभारला जातो गणपतीच्या मस्तकावर वा थोडे पुढे माटोळी बांधली जाते. यामध्ये गोव्यातील रानफळे, माडावरून उतरलेले नारळ, नारळांची पेण, केळीचा घड, पोफळीचा कातरा, तोरींग, चिबुड, कांगला, घागऱ्या, सिताफळे, चिकू, पेरु तसेच अनेक फळभाज्या गोव्यात तयार होतात त्या बांधल्या जातात.
पावसाच्या विश्रांतीमुळे उत्साह
गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त पणजी, म्हापसा, पेडणे, डिचोली, सांखळी, होंडा, वाळपई, फोंडा, सांगे, केपे, काणकोण, वास्को, कुडचडे आदी बाजारपेठांमध्ये नागरिकांची एकच गर्दी उसळलेली दिसून आली. पावसाने गुरुवारी विश्रांती घेतल्याने अनेकांना गणपतीसमोरची आरास तयार करणे, बाजारातून साहित्य आणणे, गणेशमूर्ती आणणे शक्य झाले आहे. काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळी गणेशमूर्ती घरात पोहोचतील.
आज हरितालिका पूजन
गणेश चतुर्थीच्या पूर्वदिनी म्हणजेच आज शुक्रवारी विवाहित महिला हरितालिकेची महापूजा करतात. त्यात मातीचे शिवलिंग असते व त्याची महापूजा केली जाते. महिला आपल्या पतिदेवासाठी दीर्घ आयुष्य देवाकडे मागतात. त्यासाठी संपूर्ण दिवस कडक उपास केला जातो. गणेशचतुर्थीदिनी हरितालिकेचे विसर्जन केले जाते व त्यानंतर उपवास सोडला जातो.
पावसाचा पारंपरिक फुलांना फटका
पावसामुळे राज्यात पारंपरिक फुले फुलली नाहीत. अनेक ठिकाणी तुळशीची झाडे देखील अति पावसामुळे खराब झाली. त्यामुळे तुळशी, पारंपरिक फुलांबरोबरच शेजारील राज्यातून येणाऱ्या झेंडू, मोगरा, शेवंती इत्यादी फुलांना गोव्यात मागणी वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात दुर्वा मात्र गोव्यात सर्वत्र उपलब्ध आहेत. यावर्षी अतिपाऊस पडल्याने पोफळीला लागलेली सुपारी तथा बेडे गळून पडल्याने शेतकरी बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले असले तरी देखील अत्यंत महागड्या दरात बेड्यांचा घड (शिपटे)ची विक्री केली जातेय.
भाज्यांचे दर भिडले गगनाला
गणेशचतुर्थी उत्सवात भाज्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत. तरीदेखील उत्सवासाठी भक्तगणांमधील उत्साह कमी झालेला नाही. खाद्यपदार्थ, भाज्या, फळे व फुलांचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. त्यातल्यात्यात खाद्य तेलांचे दरही गगनाला भिडलेले आहेत.