बाप्पाना त्यांच्या भक्तांनी शास्त्राला धरून वागलेलं आवडतं
अध्याय अकरावा
कायिक, वाचिक व मानसिक हे तपाचे स्थूल प्रकार झाले. पुढे माणसाच्या मूळ स्वभावानुसार तो कसा वागू शकतो हे बाप्पांनी सात्विक, राजस आणि तामस तपाच्या विवरणातून सांगितले. आपल्या भक्ताचा उद्धार व्हावा म्हणून बाप्पा प्रत्येक गोष्टीत त्याचं वागणं, त्याचे आचारविचार शास्त्राला धरून कसे होतील याबाबत मार्गदर्शन करत आहेत. याप्रमाणे वागत गेल्यास भक्ताचाच फायदा आहे. ज्या भक्तांना याची जाणीव आहे ते निश्चित यानुसार वागून बाप्पांचं मन जिंकून घेतात.
मनुष्य निरनिराळ्या प्रसंगात दान देत असतो. पुढील श्लोकातून ते त्याचे सात्विक, राजस व तामस हे फरक स्पष्ट करताना ते म्हणाले, गरजू व्यक्तीला केलेले दान सत्पात्री दान असते. त्यात ते तिर्थस्थळी, चांगल्या मुहूर्तावर, निरपेक्षतेने केलेले असेल त्याला सात्विक दान असे म्हणतात. देवालय, विद्यालय, औषधालय, अन्नदान अशा ठिकाणी कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलेले दान परम कल्याणकारी दान म्हणतात. अशा प्रकारच्या दानाने ईश्वर प्रसन्न होतो. काही लोक त्यांचा त्या दानातून मिळणाऱ्या फळाच्या आशेने किंवा नावलौकिक मिळावा, समाजात मान वाढावा या अपेक्षेने दान करतात ते राजस दान होय. तसेच असे दान देताना ते स्वखुशीने दिलेले नसल्याने दान करताना मनाला क्लेश होत असतात. आपल्या संपत्तीतील काही भाग कमी झाला हे दु:ख त्यामागे असते. काही वेळा मनात नसले तरी घरातील मंडळींच्या इच्छेनुसार पण नाईलाजाने दान दिले जाते तेही राजस दान या सदरात मोडते. थोडक्यात परतफेडीची अपेक्षा ठेऊन, मनाला क्लेश देऊन नाईलाजाने दिलेले दान हे राजस दान होय. पुढील श्लोकात तामस दानाबद्दल बाप्पा सांगत आहेत.
अकालदेशतोऽपात्रेऽवज्ञया दीयते तु यत् ।
असत्काराच्च यद्दत्तं तद्दानं तामसं स्मृतम् ।। 9।।
अर्थ- अकाली आणि अस्थानी अवज्ञापूर्वक अपात्राचे ठिकाणी जे दान दिले जाते अथवा तिरस्काराने जे दान दिले जाते त्याला तामस दान म्हणतात.
विवरण- सत्पात्री, योग्य स्थळी, योग्य काळी आणि श्रद्धेने दिलेले दान सात्विक असते तर वैयक्तिक फायद्यासाठी मनाला क्लेश देऊन किंवा नाईलाजाने दिलेले दान राजस होय. त्याउलट अपात्री, अकाली, घेणाऱ्याचा अपमान करून, त्याला तुच्छ लेखून दिलेले दान हे तामस दान होय.
एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असली की, आपण तिचं मन राखायचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीला जे आवडतंय तसं वागायचा प्रयत्न करतो. आपण सर्व बाप्पांचे भक्त आहोत. मग बाप्पाना आवडतंय तसं आपलं वागणं हवं. बाप्पांना त्यांच्या भक्तांनी शास्त्राला धरून वागलेलं आवडतं म्हणून आपणही तसंच वागायचा प्रयत्न करूयात. जो शास्त्राला धरून वागतो त्यांची वर्तणूक नेहमीच सात्विक होत असते. दानाचे तीन प्रकार आपण बघितले. त्यातील सात्विक दान श्रेष्ठ कसे तेही समजून घेतले. आता पुढील श्लोकात बाप्पा ज्ञानाचे तीन प्रकार सांगणार आहेत.
ज्ञानं च त्रिविधं राजन्शृणुष्व स्थिरचेतसा ।
त्रिधा कर्म च कर्तारं ब्रवीमि ते प्रसंगतऽ ।। 10 ।।
अर्थ- हे राजा, आता तीन प्रकारचे ज्ञान स्थिर चित्ताने ऐक. तीन प्रकारचे कर्म आणि तीन प्रकारचे कर्ते हेही मी ओघाने सांगतो.
पूर्वजन्मीच्या कृत्यानुसार व याजन्मीच्या संस्कारानुरूप माणसाचा स्वभाव तयार होतो. अर्थातच प्रत्येकाची पूर्वकर्मे व याजन्मी होणारे संस्कार वेगवेगळे असल्याने प्रत्येकाचा स्वभाव निराळा असतो, म्हणूनच व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण तयार झाली असावी. साहजिकच प्रत्येकाला निरनिराळ्या कर्माच्या प्रेरणा स्वभावातून मिळत असतात. यातूनच ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार पहायला मिळतात.