कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काहीही करून भक्ताचं कल्याण करायचा चंगच बाप्पांनी बांधलाय

06:30 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्व कर्मे मला अर्पण कर म्हणजे तुला मोक्षप्राप्ती होईल ह्या अर्थाचा तत्रापि त्वमशक्तश्चेत्कुरु कर्म मदर्पणम् । मामनुग्रहतश्चैवं परां निर्वृतिमेष्यसि ।। 12।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. गणेशगीतेत बाप्पांनी राजा वरेण्याला केलेल्या उपदेशामागे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन घडवून आणणे हा मुख्य उद्देश आहे कारण मानवी जीवनाचे ते सर्वोच्च ध्येय होय, किंबहुना मनुष्य योनीत जीवाचा होणारा प्रवेश केवळ ह्या आणि ह्याच कारणासाठी असतो असं म्हंटलं तरी चालेल. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन घडवून आणण्यात जे जे अडथळे येतात त्याबद्दल बाप्पा सांगत आहेत. त्यातील पहिला अडथळा म्हणजे मनुष्य स्वत:ला कर्ता समजत असतो, दुसरा अडथळा म्हणजे त्याला समोर दिसणारे जग हे खरे वाटत असते आणि त्याच्या ह्या घट्ट समजाला धरून आयुष्यभर तो विचार करत असतो आणि त्याला अनुरूप हालचाली करत असतो.

Advertisement

अर्थात स्वत:चा स्वार्थ साधून घेणे हा ह्यामागील प्रमुख उद्देश असतो. ह्यात माणसाच्या मन आणि बुद्धीचा सिंहाचा वाटा असतो. असा माणूस व्यवहारात उत्तम म्हणून सिद्ध होतो पण अध्यात्मात स्वत:च्या बुद्धीने कार्य करायचे नसून संतांच्या सांगण्यानुसार वागायचे असते. त्यासाठी माणसाने मन आणि बुद्धीचा वापर करणे थांबवावे म्हणून बाप्पांनी मन आणि बुद्धी मला अर्पण कर असे सांगितले. हे सहजी शक्य नसल्याने ते जमत नसेल तर अभ्यास आणि योगाचा पर्याय सांगितला. तेही जमत नसेल तर बाप्पांनी वरेण्यापुढं करत असलेली सर्व कर्मे त्यांना अर्पण करण्याचा पर्याय ठेवलाय. कारण अभ्यासाचं ‘महात्म्य’ भगवंत जाणून आहेत. पण या अभ्यासाचा तिटकारा असणारेही बरेचजण आहेत. आपण सर्व त्यांचीच लेकरे आहोत त्यामुळे कोण कसा, कोण कसा, हे सर्व ते चांगलेच जाणून आहेत,

Advertisement

पण त्यांना सर्व सारखेच! सर्वांचाच उध्दार व्हावा, अशी त्यांची इच्छा असते. म्हणून भगवंत पुढे सांगतायत, ठीक आहे तुला जमत नाहीये नं, मग राहूदे अभ्यास, इतकेच काय इंद्रियांचा संयमसुद्धा करू नकोस, भोगांचा त्याग करू नकोस, जातीचा अभिमान बाळगलास तरी चालेल. सगळ्याची तुला मोकळीक दिलेली आहे पण कुलधर्म निष्ठापूर्वक आचर, नैतिकतेनं वाग आणि असं करत असताना फक्त एक कर, मन, वाणी आणि देह यांच्यामार्फत जी कर्मे घडतील ती मी केलीयत असं म्हणू नकोस. सर्वाचा कर्ता करविता मी आहे हे ध्यानात ठेव. असं करणं तुझ्याही फायद्याचं आहे. कसं ते बघ, कामात काही कमी झालं, उणीव राहिली तर भगवंताची इच्छा असं म्हणून तू नामानिराळा राहू शकतोस. माळी जसं नेईल तसं पाणी मळ्यातनं वहात जातं. त्याप्रमाणे अर्धवट, अपुरी, पूर्ण जशी होतील तशी कर्मे मला अर्पण करत जा म्हणजे झालं!

असं जर करत गेलास तर अंतिमत: तू माझ्या सायुज्यसदनास येशील. आपलं काम उत्तम करायचा प्रयत्न करणे, निषिद्ध कर्मे टाळणे सतत माझं स्मरण करणे असं तू कर. हे जमत नसेल तरी हरकत नाही पण निदान केलेली कर्मे मीच केली असा अभिमान तरी बाळगू नकोस. केलेलं कर्म मला अर्पण करत गेलास तर त्यानुसार येणाऱ्या पाप पुण्याच्या बंधनातून तू मुक्त होशील व तुझे नवीन प्रारब्ध तयार होणार नाही हा माझा त्यामागील उद्देश आहे हे लक्षात घे. तसेच मी कर्ता आहे हा तुझा समजही हळूहळू नाहीसा होईल. अभ्यास करण्याचा माणसाला एकवेळ कंटाळा येईल पण कर्म केल्याशिवाय तो गप्प बसू शकत नाही हे लक्षात घेऊन बाप्पा भक्ताला कर्म मला अर्पण कर असा उपदेश करत आहेत. जेव्हा बाप्पांना अर्पण करायच्या उद्देशाने भक्त कर्म करेल तेव्हा ते हमखास सत्कर्मच असेल हेही नक्की आहे. हे लक्षात घेऊन बाप्पांनी हा पर्याय भक्तापुढे ठेवला आहे. काहीही करून भक्ताचं कल्याण करायचा त्यांनी चंगच बांधलाय.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article