नारळ उत्पादक, विक्रेत्यांना बाप्पांचा आशिर्वाद...रोज दीड लाख ‘श्री’फळांची उलाढाल...
गणेशोत्सवात तीनपट आवक : रोज 5 ट्रक नारळांची विक्री : मोदक, तोरण, नवसासाठी भाविकांकडून नारळांची मोठी खरेदी : यंदा दरात 30 टक्क्यांनी वाढ
इम्रान गवंडी कोल्हापूर
सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या थाटात झाली आहे. आकर्षक सजावटीसह बाप्पांची मनोभावे पुजा करायची तर सर्वप्रथम श्रीफळाला महत्व आहे. गणेशोत्सवात नवस, तोरण, पूजेसाठी नारळाची मोठी खरेदी केली जात आहे. उत्सव काळात रोज दीड लाख नारळांची उलाढाल होत असून त्याची आवकही तीन पटीने वाढली आहे. यंदा दरामध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नारळ उत्पादक, विक्रेते, व्यापाऱ्यांना बाप्पांचा आशिर्वाद मिळाला असुन उत्सव काळात कोट्यावधींची उलाढाल होत आहे. शहरात रोज 4 ते 5 ट्रक नारळांची आवक होत आहे. घाऊक दरात शेकड्यामागे 35 ते 40 रूपयांची वाढ झाली आहे. 12 ते 13 रूपये प्रतिनग असणारा नारळ 15 ते 16 रूपये झाला आहे. याची किरकोळ बाजारात 20 ते 22 रूपये प्रतिनगाने विक्री सुरू आहे.
गणरायाला 21 मोदकांच्या नैवेद्याशिवाय उत्सवाची पूर्तता होत नाही. या मोदकाला खास कर्नाटकी नारळाच्या खोबऱ्याचा खिस लागतो. कर्नाटकी नारळाच्या खोबऱ्याला जाडी अधिक असते. त्याचा दरही नियमित नारळापेक्षा अधिक आहे. शेकडा 1800 ते 2 हजार असा घाऊक बाजारात दर आहे. किरकोळ बाजारात 20 ते 25 रुपये प्रतिनग दराने हा नारळ विकला जातो. तोरण व गणरायाला वाहण्यासाठी तामिळनाडूतील शेंडीवाल्या नारळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. घाऊक बाजारात याचा दरही शेकडा एक हजार 50 रुपये इतका आहे. दक्षिण भारतातून आवक
शहरात दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून नारळाची आवक होत आहे. गणेशोत्सवासाठी व्यापाऱ्यांनी नारळांचे अॅडव्हान्स बुकींग करून ठेवले असल्याने वेळेत व आवश्यक नारळांची आयात होत आहे. नवा आणि जुना असे दोन प्रकारचे नारळ बाजारात येतात. शेकडा 1 हजार ते 1500 या भावांत त्यांची खरेदी व्यापारी करतात.
उत्पादक, विक्रेते, व्यापाऱ्यांना बाप्पांचा आशिर्वाद
गणेशोत्सवात शहरी व ग्रामीण भागासह परजिल्ह्यातून भाविक गणेश दर्शनासाठी येत आहेत. लाडक्या बाप्पांचे दर्शन घेवून कोणी एक नारळ, कोणी पाच नारळ ते 21 नारळाचे अख्खे तोरणच गणरायाच्या चरणी अर्पण करत आहेत. त्यामुळे शहरातील मोठमोठ्या मंडळासमोर सध्या नारळांचे ‘डोंगर’ उभे राहिले आहेत. बाप्पांचे आवडते खाद्य म्हणजे मोदक घरोघरी बनवले जातात. त्यासाठीसुद्धा खोब्रयाचा वापर केला जातो. यामुळे एकूणच नारळाची मागणी वाढली आहे.
नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत उलाढाल
गणेशोत्सव काळात नारळांना मागणी वाढली आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव, दिवाळी, दसरा सण येत आहेत. या काळातही नारळांना मागणी असते. त्यामुळे पुढील काळातही याची उलाढाल वाढणार आहे.
यंदा दरात वाढ
गणेशोत्सवात घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून खरेदी केली जात आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा नारळाच्या दरात 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा नारळांची मागणी वाढली आहे. याची आवकही तीनपटीने वाढली आहे.
रोहन नासिपुडे, नारळाचे व्यापारी