सायबर हल्ल्यामुळे बँका, एटीएम ठप्प
300 हून अधिक वित्तसंस्था प्रभावित, वेगवान कार्यवाहीमुळे हल्ल्याचा प्रसार नियंत्रणात
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताच्या बँकिंग व्यवस्थेवर गुरुवारी झालेल्या एका मोठ्या सायबर हल्ल्यात 300 हून अधिक बँका, वित्तसंस्था आणि एटीएम तसेच युपीआय सेवा ठप्प होण्याची घटना घडली आहे. तथापि, केंद्र सरकारच्या नियंत्रक संस्थानी वेळीच वेगाने पावले उचलल्याने काही वेळातच या सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. या सायबर हल्ल्याचा परिणाम 300 हून अधिक बँका आणि वित्तसंस्थांवर काही काळ झाला. तथापि हे प्रमाण एकंदर बँकिंग सेवेच्या केवळ 0.5 टक्के इतकेच होते. या सायबर हल्ल्याची व्याप्ती मोठी बनली नाही, कारण त्वरित हा हल्ला रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘सी-एज टेक्नॉलॉजीज’वर हल्ला
भारताच्या बँकिंग व्यवस्थेचे काम ‘सी-एज टेक्नॉलॉजीज’ या संस्थेकडे आहे. याच व्यवस्थेवर हा सायबर हल्ला करण्यात आला. भारताच्या बँकिंग व्यवस्थेत बिघाड निर्माण व्हावा आणि देय सेवांमध्ये खंड पडावा अशा हेतूने तो करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते. तथापि, भारताची डिजिटल बँकिंग व्यवस्था भक्कम असल्याने हल्ल्याचा प्रभाव रोखता येणे शक्य झाले, असेही स्पष्ट करण्यात आले.
असा रोखला हल्ला
या सायबर हल्ल्यामुळे काही बँका प्रभावित झाल्या आहेत, हे लक्षात येताच भारतीय राष्ट्रीय देय महामंडळाने (एनपीसीआय) त्वरित पावले उचलली. बँकांचे देय व्यवहार सांभाळणाऱ्या ‘सी-एज’ टेक्नॉलॉजीज’शी असणारा बँकांचा संपर्क त्वरित तोडण्यात आला. त्यामुळे सायबर हल्ल्याची व्याप्ती केवळ काही बँकांपुरतीच मर्यादित राहिली. हल्ल्याचा परिणाम पसरला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
परिणाम काय झाला...
ज्या बँका हल्ल्याच्या प्रभावात होत्या, त्यांच्या ग्राहकांना काहीकाळ मोठ्या समस्या निर्माण झाल्या. एटीएममधून पैसा काढणे, तसेच युपीआयच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करणे हे व्यवहार अचानक बंद झाले. बँकांची इतर संगणकसंबंधित कामेही बाधित झाली. काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
शहर भागात समस्या नाही
मोठी शहरे आणि महानगरे यांच्यामधील बँकांवर या हल्ल्याचा प्रभाव पडला नाही. मुख्यत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील बँका प्रभावित झाल्या. अशा साधारणत: 1,500 बँक शाखा किंवा वित्तसंस्था देशात आहेत. पण एकंदर बँक संख्येच्या तुलनेत ही संख्या फारशी नाही. तसेच, या बँकांपैकीही मोजक्या बँकांवरच प्रभाव पडला होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
प्रभाव जाणवत राहणार
ज्या बँका मुख्य डिजिटल व्यवस्थेपासून तोडण्यात आल्या आहेत, त्यांना आणखी काही काळ त्रास जाणवणार आहे. कारण तेथील व्यवस्था पूर्ववत करण्यास काही काळ लागण्याची शक्यता आहे. अशा बँकामध्ये होणारे पैशाच्या देवघेवीचे व्यवहार आणखी काही काळ अडथळ्यांमध्ये राहू शकतात. बँक नियंत्रण व्यवस्थेने आता या हल्ल्यामुळे झालेल्या हानीची गणना करण्याचे काम हाती घेतले आहे.
धोका रोखण्यासाठी ऑडिट
या हल्ल्याच्या प्रभावातील बँकांचे कामकाज त्वरित पूर्वपदावर यावे, यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट हाती घेण्यात आले आहे. ज्या छोट्या बँकांकडे आपत्कालीन सुरक्षेची व्यवस्था किंवा अशी व्यवस्था करण्यासाठी लागणारे स्रोत नाहीत, त्यांना नियंत्रक संस्थांकडून साहाय्य केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरुन जाण्याचे किंवा गोंधळात पडण्याचे कारण नाही, असे आवाहन करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने मात्र अद्याप हल्ल्यासंबंधी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.