बँकिंग, धातू क्षेत्रांनी बाजाराला सावरले
सेन्सेक्स 694 अंकांनी मजबूत : आशियातील सकारात्मक वातावरणाचा लाभ
मुंबई :
चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक सकाळच्या दरम्यान प्रभावीत झाले होते. मात्र बंद होताना बाजार वधारुन बंद झाला आहे. यामध्ये सेन्सेक्स 694 अंकांनी वधारला आहे. तसेच मुख्य क्षेत्रांपैकी बँकिंग आणि धातू क्षेत्रातील समभाग चमकले आहेत. तसेच आशियाई बाजारातील सकारात्मक ट्रेंडमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मंगळवारच्या सत्रात सुरुवातीच्या व्यवहारात घसरण होऊनही सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. बीएसई सेन्सेक्स मंगळवारी दिवसअखेर 694.39 अंकांच्या वधारासह निर्देशांक 79,476.63 वर बंद झाला आहे. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज 217.95 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 24,213.30 वर स्थिरावला.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर सर्वाधिक 4.73 टक्क्यांच्या वधारासह बंद झाला. तसेच टाटा स्टील, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स प्रामुख्याने तेजीसह बंद झाले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी 1.46 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय आयटीसी, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, इन्फोसिस, एल अँड टी, सनफार्मा यांचे समभाग घसरले.
बाजारातील उसळीचे कारण?
बाजारातील सूत्रांनुसार, यूएस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी, गुंतवणूकदारांनी हेवीवेट फायनान्शिअल स्टॉक्स खरेदी केले जे बाजाराला आधार देत होते.
जागतिक बाजारपेठेतून
आशियाई बाजारात टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग सकारात्मक राहिले. त्याच वेळी, युरोपीय बाजार तेजीत व्यवहार करत होते, तर अमेरिकन शेअर बाजार सोमवारी घसरत बंद झाले. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराची विक्री सुरू ठेवली आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी 4,329.79 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केली, असे एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.