Kolhapur Crime : बनावट सोने तारण ठेवून बँकेची 83 लाखांची फसवणूक
बँकेच्या अधिकृत सोनारासह सात खातेदारांवर गुन्हा
कोल्हापूर : बँकेच्या सोनारानेच बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकेची ८३ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी बँकेचा सोनार आणि कर्जदार अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सोनाराने कर्जदारांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर बनावट सोने ठेवून फसवणूक केल्याचे बँकेच्या तपासणीत समोर आले. याबाबतची फिर्याद बँकेचे व्यवस्थापक निरज शिवाजी देशमुख (वय ३८ रा. ताराबाई पार्क) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.
बँकेचे अधिकृत सोनार दीपक गोपाळ देवरुखकर (रा. सणगर गल्ली, मंगळवार पेठ) यांच्यासह सुरेखा सुरेश डावरे (रा. रणदिवे गल्ली, कसबा बावडा), दीपा दीपक देवरुखकर (रा. सणगर गल्ली, मंगळवार पेठ), संग्राम भिमराव पाटील (रा. रणदिवे गल्ली, कसबा बावडा), आराध्या बाळासो जाधव (रा. रेंदाळ ता. हातकणंगले), संजय दत्तात्रय पिसाळे (रा. मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ), विक्रम अशोक डंबे (रा. मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ) या कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजारामपुरी येथील करूर वैश्य बँकेमध्ये संशयीत आरोपी दीपक देवरुखकर हे अधिकृत सोनार आहेत. २४ मे २०११ पासून तो बँकेचे काम पाहत आहेत. त्याने नातेवाईक आणी मित्रपरिवारांच्या नावाने स्वतःचे सोने बँकेत तारण ठेवले.
२५ साधारणपणे दीड किलो सोने २०२४ मध्ये सहा कर्जदारांच्या नावावर बँकेमध्ये गहाण ठेवले. त्या सोन्यावर बँकेकडून ८३ लाख ३६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. बँकेचे सन २०२४ सालाचे ऑडिट करत असताना सोने बनावट असल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी बँकेच्या व्यवस्थापक निरज देशमुख यांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली. संबंधीत कर्जदारांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली असता, सदरचे सोने देवरुखकरचेच असल्याचे समोर आले. तसेच यावरुन उचलेली रक्कमही त्यानेच वापरल्याचे सहा कर्जदारांनी सांगितले. या सर्वांना कर्ज फेडण्यास मुदत देण्यात आली,
मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न आल्यामुळे याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे देण्यात आला. याची चौकशी करुन याबाबतचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे करत आहेत.
मित्र नातेवाईकांच्याच नावावर कर्ज
दीपक देवरुखकर हा सोनार असून त्याचे मंगळवार पेठेत दुकान आहे. त्याने आपली पत्नी, बहीण, नातेवाईक आणी मित्रपरिवारांच्या नावावरच बँकेत खाते उघडून बनावट सोने तारण ठेवून ८३ लाख रुपयांचे कर्ज उचलले.
बँकेची, मित्रांची फसवणूक
दीपक देवरुखकर याने बँकेसह, मित्र, नातेवाईकांचीडी फसवणूक केली आहे. दीपक देवरुखकर याने बँकेला खोटे सोने खरे असल्याचे भासविले. त्याबाबतचे प्रमाणपत्र दिले. त्याचसोबत नातेवाईकांच्या नावावर खोटे सोने ठेवून कर्ज घेतले तसेच कर्जाची रक्कमही स्वतःचा वापरली. बँकेने सर्व कर्जदारांना याबाबतचे पत्र देवून कर्ज मुदतीत भरण्याचे पत्रही दिले होते.